पर्येत श्रीभूमिका कालोत्सवाला गालबोट
दगडफेक, दंडुक्यांनी मारहाणीच्या प्रकाराने तणाव : गावकर, माजिक महाजन गटाचे भाविक जखमी,पोलिसांनाही मारहाण, अनेक पोलिस जखमी,देवस्थान परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप
वाळपई : गेल्या तीन महिन्यांपासून पर्ये येथील श्री भूमिका देवीच्या मंदिरात धार्मिक हक्कावरून गावकर - राणे माजिक या महाजनांच्या गटांदरम्यान निर्माण झालेली वादाची ठिणगी काल बुधवारी पुन्हा एकदा पडली. कालोत्सव साजरा करण्यावरून वाद उफाळून आला. पोलिसांवर तसेच देवस्थानाच्या सभागृहामध्ये बसलेल्या भाविकांवर दगडफेक झाली. काहींना दंडुक्याने मारहाण झाली. गावकर व राणे समाजाचे 25 पेक्षा जास्त महाजन आणि 15 पेक्षा जास्त पोलिस जखमी झालेले आहेत. निरीक्षक अनंत गावकर यांना जबर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते. हिंसक वातावरण तयार करणे, मारामारी करणे, दगडफेक करणे या संदर्भात 38 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आल्यानंतर दुपारपर्यंत तणावपूर्ण शांतता होती. देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.
गावकर समजाची तक्रार
गावकर समाजाने आपल्याला इतर समाजाकडून मारहाण झाल्याची तक्रार वाळपई पोलिसस्थानकावर दाखल केलेली आहे. काही शस्त्रधारी मंडळीने पोलिसांसमक्ष मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश करून गावकर समाजाच्या महाजन पुऊष व महिला भगिनींना मारहाण करण्याचा प्रकार घडला. याची सरकारने चौकशी करावी. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याऐवजी निष्काळजीपणा का केला, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. बुधवारी 15 व गुऊवारी 16 रोजी देवस्थानचा पारंपरिक कालोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे मंदिर परिसरात मंगळवारपासून पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. बुधवारी सकाळपासून देवस्थानच्या कालोत्सवाच्या धार्मिक प्रक्रियेला सुऊवात झाली. भाविक देवदर्शन घेत होते. गावकर महाजन गटाच्या भाविकांनी देवदर्शनाचा लाभ घेतला. त्यावेळी तणावाचे वातावरण निर्माण होऊ लागले. गावकर व राणे या दोन्ही समाजाच्या भाविकांना तेथे उपस्थित असलेल्या इतर समाजाच्या भाविकांनी रोखले. तेथील काही वस्तू तेथून बाजूला केल्या. कुंकू व देवीला उदबत्त्या लावण्यापासून त्यांना वंचित करण्यात आले. यामुळे त्या वादाला ठिणगी पडली, अशी माहिती उपलब्ध झालेली आहे.
पोलिसांनी अडविले दोन्ही समाजांना
गावकर व राणे समाजाचे भाविक व महाजन देवीच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये गेले असता त्यांना पोलिसांनी अडविले. यामुळे या वादाला ठिणगी पडली. पोलिसांनी अडविल्यामुळे या समाजाचे सर्वजण मोठ्या प्रमाणात देवस्थानामध्ये दाखल झाले आणि ते गर्भकुडीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळी पोलिसांनी कडे करून त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिस व भाविक यांच्यामध्ये झटापट झाली. गावकर व राणे समाजाच्या मंडळींनी सभागृहामध्ये निदर्शने केली. देवस्थानामध्ये असलेला हक्क आम्हाला द्या, आम्हाला न्याय द्या, अशी मागणी या मंडळीकडून करण्यात येत होती.
मामलेदारांनी निवाडा दिला नाही
दरम्यान या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार गेल्या जवळपास तीन महिन्यापासून भूमिका देवस्थानाच्या मान सन्मानावरून गावकर राणे माजीक यांच्या दरम्यान वाद सुरू आहे. दिवाळीमधील तुळशीच्या वृंदावनावरून हा वाद उफाळून आला होता. त्यानंतर गौळण काला साजरा करताना या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. गावकर समाजाने 15 व 16 जानेवारी रोजी होणाऱ्या कालोत्सवात हक्क देण्याची मागणी त्यांनी सत्तरी मामलेदाराकडे केली होती. दोन दिवसांपूर्वी याबाबत मामलेदारांनी बैठक घेऊन गावकर समाजाचे म्हणणे ऐकून घेतले, मात्र निवाडा दिला नाही.
सर्वांनाच केली दंडुक्यांनी मारहाण
पोलिसांसमक्ष दगडफेक झाली. शांततेने निदर्शन करणाऱ्या गावकर समाजाच्या मंडळींना दंडुक्याने जोरदार मारहाण झाली. यामुळे समुदाय खवळला व जीव वाचवण्याच्या आकांताने सैरावरा पळापळ सुरू झाली. सभोवताली परिसरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. प्रमुख रस्त्यापर्यंत मारहाण करण्यात येत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. महिला भगिनी जीवाच्या आकांताने पळत होत्या. त्यांच्यामागे दगडफेक व दंडुक्यातून मारहाण करीत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. यावेळी गावकर मंडळीतील काही ज्येष्ठ महिला व नागरिक धावताना पडले, तरीही त्यांनासुद्धा मारहाण करण्यात आली.
पोलिसांनीही मारहाण केल्याचा दावा
गावकर व राणे समाजाच्या काही मंडळींनी मंदिराच्या दरवाजाच्या मध्यभागी बसून निदर्शने सुरु ठेवली होती. ज्यावेळी सभागृहामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळी बचाव करण्यासाठी मंदिराचा दरवाजा बंद करण्यात आला. पोलिसांनी सदर दरवाजा फोडून त्या मंडळींना बाहेर काढले. पोलिसांनीही यावेळी त्यांना मारहाण केली, असा दावा गावकर समाजाच्या मंडळीकडून करण्यात आलेला आहे.
माजिक समाजाच्या दोघांना मारहाण
माजिक समाजाचे दोघेजण मंदिराच्या गर्भकुडीमध्ये तीर्थ घालण्यासाठी होते. हीच संधी साधून त्यांनाही बऱ्याच प्रमाणात झोडपून काढल्याची माहिती हाती आलेली आहे. त्यांनी पळ काढल्यामुळे त्यांचा जीव वाचला.
अनेक पोलिसही जखमी
दगडफेकीमध्ये पोलिस मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. काहींनी साखळी सरकारी सामाजिक ऊग्णालयात तर काहींनी खाजगी इस्पितळामध्ये उपचार घेतल्याचे समजते. काही पोलिसांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचे समजले. डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी सभागृहामध्ये ठाण मांडून परिस्थितीचा सामना केला.
दोघे गंभीर जखमी गोमेकॉत दाखल
गावकर व राणे या दोन्ही समाजाच्या 25 पेक्षा जास्त जणांना मारहाण करण्यात आली. अनेकांच्या डोक्याला व हातपायांना जखमा झाल्या आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. साखळी सरकारी सामाजिक ऊग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्यानंतर त्या दोघांना पुढील उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले आहे. मंदिराच्या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ज्यादा पोलिस कुमक मागविण्यात आलेली आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात फौजफाटा दाखल झाला होता. त्यानंतर कडक बंदोबस्तात कालोत्सवाला सुऊवात झाली. संपूर्ण मंदिराच्या सभोवताली पोलिसांचे कडे करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत तणावपूर्ण शांतता होती. दरम्यान काही महाजनांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधून त्यांना या संदर्भाची माहिती दिलेली आहे. दरम्यान पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याबद्दल भाविकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पर्येत कोणतही तणाव नाही : डॉ. देविया
स्थानिक आमदार डॉ. देविया राणे यांनी सांगितले की पर्येमध्ये सध्यातरी शांततामय वातावरण आहे. तणावाची परिस्थिती नाही. कालोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात भाविक दर्शन घेत आहेत. आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. देवस्थानामध्ये कुणालाही कायदा हातात घेता येत नाही. पारंपरिक पद्धतीने जी प्रक्रिया करायची आहे ती केली जात आहे. मान सन्मानाची प्रक्रिया न्यायाच्या प्रक्रियेचा भाग आहे.