सांबरा, निलजी भागात भक्तिभावाने श्री विसर्जन
वार्ताहर/सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागामध्ये शनिवारी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...च्या गजरामध्ये गणरायाचे विसर्जन उत्साहात केले. पूर्व भागातील बसवण कुडची, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, मुतगे, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनिहाळ, पंत बाळेकुंद्री, मोदगा, मारीहाळ, सुळेभावी, कणबर्गी, कलखांब, मुचंडी चंदगड, अष्टे, खनगाव आदी गावामध्ये शनिवारी सकाळपासून घरगुती गणपतींच्या विसर्जनाला प्रारंभ झाला होता. दुपारनंतर सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. सार्वजनिक गणेशमूर्तींचे तलाव व विहिरीच्या ठिकाणी गणपतीचे विसर्जन करण्यात येत होते. विसर्जनासाठी प्रत्येक गावामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवला होता .एकंदरीत पूर्वभागामध्ये शांततेत गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली
कणबर्गी येथे 45 हून अधिक सार्वजनिक गणपतींचे विसर्जन
कणबर्गी येथे मनपाच्या वतीने खास गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी निर्माण केलेल्या तलावामध्ये परिसरातील 45 हून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मुर्तींच्या विसर्जनासाठी मनपाने क्रेनची व्यवस्था केली होती. रविवारी सकाळी दहापर्यंत मूर्तींचे विसर्जन करण्यात येत होते.
बाळेकुंद्री खुर्द परिसर
गणेशभक्तांनी पारंपरिक पध्दतीने व भक्तीमय वातावरणात पूर्व भागातील बाळेपुंद्री खुर्द, मोदगा, होनिहाळ, पंत बाळेपुंद्री, मारीहाळ, सुळेभावी, हुदली आदी गावात शनिवारी फटाक्यांच्या आतषबाजीत, बेंजो व इतर वाद्यांच्या गजरात गणपती बाप्पा मोरय्या...अशा जयघोषात विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देण्यात आला. सार्वजनिक मंडळांनी फटाक्यांची आतषबाजी करत परिसर दणाणून सोडला.