श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर पुण्यतिथी उत्सवाची महाप्रसादाने सांगता
तीन दिवस चाललेल्या उत्सवामध्ये लाखो भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा घेतला लाभ : महाप्रसादाला भाविकांची गर्दी : भाविक परतीच्या मार्गाला
वार्ताहर/सांबरा
श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या 120 व्या पुण्यतिथी उत्सवाची शुक्रवारी महाप्रसादाने सांगता झाली. महाप्रसाद घेण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. तर तीन दिवस चाललेल्या उत्सवामध्ये लाखो भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. महाप्रसाद घेण्यासाठी भक्तांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. सर्व भक्तांना आमराई व मंदिर परिसरामध्ये पंगतीमध्ये बसविण्यात आले होते. दुपारी बारा वाजता पूजन करून व आरती म्हणून महाप्रसाद वाटपाला सुरुवात करण्यात आली. अनेक भक्त श्रींचे दर्शन व महाप्रसाद घेऊन परतीच्या मार्गाला लागले होते तर अनेक भाविक महाप्रसाद घेण्यासाठी बाळेकुंद्रीत दाखल होत होते. त्यामुळे येणाऱ्या व जाणाऱ्या भक्तांमुळे मुख्य रस्त्यावर गर्दी झाली होती. रहदारी सुरळीत करण्यासाठी पोलिसांना बरेच परिश्रम घ्यावे लागले. दुपारी तीन वाजता आमराईमध्ये प्रेमानंद टिपरी कार्यक्रम पार पडला. यावेळी अनेक पंतभक्तांनी टिपऱ्या खेळल्या. तर सायंकाळी सहा वाजता श्रींची पालखी आमराईतील पूज्यस्थानी जाऊन गावातील वाड्याकडे पोहचली व उत्सवाची सांगता झाली. यात्रेसाठी राज्य परिवहन मंडळाने सुरू केलेल्या बससेवेचा भाविकांना चांगलाच लाभ झाला.