For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीकृष्ण मायाममतेपासून अलिप्त होता

06:30 AM Jan 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रीकृष्ण मायाममतेपासून अलिप्त होता
Advertisement

अध्याय तिसावा

Advertisement

नाथमहाराज म्हणाले, ब्रह्मशाप मिळालेले यादव त्या शापानुसार आपापसातच लढू लागले. हातातली शस्त्रs बोथट झाल्यावर समुद्रकिनाऱ्यावरील गवतापासून तयार झालेले भाले त्यांच्या हाताला लागले. हीही मायेची योजनाच होती. आत्तापर्यंत अनेक शस्त्रांचे आघात होऊनही जे यादववीर जखमी झाले नव्हते ते ह्या भाल्यांच्या आघाताने अचेतन होऊन पडले. त्यातूनही जे महाशूर होते. त्यांची समजूत घालावी म्हणून श्रीकृष्ण धावून आला. तो त्यांना म्हणाला, हे ब्रह्मपाशाचे गवताचे भाले हातात धरू नका. हे युद्ध आता थांबवा. मी सांगतोय ते ऐका. श्रीकृष्ण असे जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचवेळी त्याचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेले यादव त्याच्या अंगावर धावून गेले. त्यांच्यामते त्यांची दुर्दशा कृष्णानेच केली होती. म्हणून ते म्हणत होते की, बलराम आणि हा, हेच आमचे मुख्य शत्रू आहेत. ह्या दोघांना आधी मारून टाकू. असे म्हणून आपल्या पालनपोषण करणाऱ्याला मारून टाकायला ते बिनदिक्कत तयार झाले. मद्यपानाने अत्यंत धुंद झालेल्या दुष्टबुद्धी यादवांनी वज्रासारखे कठीण असलेले भाले त्यांच्या बलदंड हातांनी पेलून धरले आणि तो यादव समुदाय आत्यंतिक त्वेषाने बलरामाच्या अंगावर धावून गेला. मद्यधुंद अवस्थेतील दुष्टबुद्धी यादवांचा समुदाय हातात वज्रासारखे कठीण भाले घेऊन चाल करून येत आहे हे पाहून बलरामाचा क्रोध अनावर झाला. आपल्या थोरल्या भावावर हल्ला करण्याचा यादववीरांचा आततायीपणा पाहून श्रीकृष्णाचाही क्षोभ झाला. त्यामुळे बलराम आणि हृषीकेशी दोघेही युद्धाला सज्ज झाले. त्यांनीही वज्रासारखे कठीण भाले हातात घेतले आणि ते वर्तुळाकार फिरवू लागले. त्या भाल्याच्या परिघात सर्व यादववीर सापडले. त्यांना जबरदस्त दणके बसून त्यांचे तुकडे तुकडे झाले. जणू दोघांनी काळशक्तीचे रूप घेतले होते. अशा पद्धतीने आपल्या कुळाचे निर्दालन झालेले पाहून आपले सर्व कर्तव्य पूर्ण झाले असे श्रीकृष्णाला वाटू लागले. उद्धवाला उपदेश करण्यापूर्वी श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार आहे हे समजल्यावर समस्त देव द्वारकेला त्याच्या दर्शनाला आले होते. त्यावेळी सर्व देवांनी त्याला आता अवतारकार्य समाप्त करून देवलोकी यावे अशी विनंती केली होती. त्यावेळी श्रीकृष्ण त्यांना म्हणाला होता की, तुमचे म्हणणे बरोबर आहे परंतु सध्या हे यादववीर फार माजले आहेत तशातच मी जर देवलोकी प्रयाण केले तर हे आणखीनच उन्मत्त होतील आणि प्रजेवर अनन्वित अत्याचार करतील. ते अनावर झाल्याने त्यांचा बिमोड करणे कुणालाच शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांचा नाश करायला मला पुन्हा अवतार घ्यावा लागेल. त्यापेक्षा ह्यांना आटोपूनच मी निजधामाला येतो. त्यानुसार सर्व घडत गेले. यादवांना ब्रह्मशाप मिळाला. त्यामुळे त्यांच्यात छळ कपट होण्यास सुरवात झाली. कृष्णमायेने त्यांच्या बुद्धीला सांगून सवरून ठकवले. मद्यपानाने उन्मत्त झालेले  यादव क्रोधाग्नीत भस्म झाले. ज्याप्रमाणे बांबूच्या वनात एखादी ठिणगी पडली तर ती ते संपूर्ण वन भस्मसात करून टाकते त्याप्रमाणे समस्त यदुकुल समूळ नष्ट झाले. अशाप्रकारे स्वत:च्या कुलातील उन्मत्त झालेल्या सदस्यांचा समूळ नाश करून श्रीकृष्ण सुखावला. एक कर्तव्य पार पडल्याचे समाधान त्याला वाटत होते. ज्याप्रमाणे माळी स्वत:च पेरणी करतो, पिकाचा सांभाळ करतो आणि शेवटी ते समूळ खणून काढतो, त्याप्रमाणे श्रीकृष्णाने यादवकुलाचा आधी प्रतिपाळ केला, त्यांच्यावर अतोनात प्रेम केले आणि वेळ आल्यावर शेवटी त्यांचाच समूळ नाश करून स्वत: मायाममतेपासून अलिप्त असल्याचे दाखवून दिले. जो जाणता असतो, सज्ञान असतो त्याला स्त्राr, पुत्रांसह कुलाचा नाश होत असताना त्यांच्याबद्दल ममता उपजत नाही त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे वर्तन होते.

क्रमश:

Advertisement

Advertisement
Tags :

.