For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीकृष्णाने भक्तांसह वैऱ्यांचाही उद्धार केला

06:30 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रीकृष्णाने भक्तांसह वैऱ्यांचाही उद्धार केला
Advertisement

अध्याय एकतिसावा

Advertisement

नाथमहाराज म्हणाले, जे हरीकीर्तन आवडीने करून त्यात श्रीकृष्णाच्या कीर्तीचे वर्णन करतात त्यांचा अहंकार सहजी नाहीसा होतो. ही गोष्ट सर्वांनी आपल्या मनावर कोरून ठेवावी आणि हरीकीर्तनाची संगत धरावी. ह्या कीर्तन करण्याने वा श्रवणाने बहुतेकांचे संसारातील येणेजाणे श्रीकृष्णाने बंद केले आहे. ज्याला कृष्णकीर्तिकीर्तनाची गोडी लागते त्याचा अहंकाराचा बांध श्रीकृष्ण फोडून टाकतो. त्यामुळे त्यांची पुढील आध्यात्मिक प्रगती गतीने होत राहते. म्हणून कृष्णकीर्तिचे वर्णन करणारी कीर्तन भक्ती करून ‘कृष्णपदवी’ स्वत:च मिळवावी. जन्मापासूनच ज्ञानघन असलेल्या श्रीकृष्णाचे चरित्र अतिपावन आहे. त्याच्या संगतीत राहून गवळ्याच्या अज्ञानी पोरांचा उद्धार झाला. त्याच्यावर प्रेम करून कित्येक गवळणी उद्धरून गेल्या. त्यांनी कृष्णाच्या श्यामसुंदरमूर्तीची अभिलाषा चित्तात दृढ धरली होती. सुंदरशी कृष्णमूर्ती पाहून गायीसुद्धा तिथल्या तिथे तटस्थ होत होत्या. जनावरांचासुद्धा कृष्णाच्या सोबत राहून त्याच्या संगतीमुळे उद्धार झाला मग गोपींचा उद्धार न होणे अशक्य होते. आणखीन पुढे सांगायचं म्हणजे गायी आणि गोपिकांचा उद्धार झाला ह्यातही काही आश्चर्य नाही कारण कृष्ण एव्हढा ज्ञानघन होता की, त्याच्या संगतीने वृन्दावनातल्या गवताच्या पात्यांचा, रोपांचा, झाडांचाही उद्धार झाला. त्याच्या संगतीत जे होते त्यांचा तर उद्धार झालाच पण ज्यांनी त्याच्याशी वैर पत्करले त्यांचाही त्याने उद्धार केला. स्वत:च्या स्तनात विष भरून घेऊन त्याचे प्राण हरण करण्यास पुतना आलेली होती पण तिला जेव्हा कृष्णाची संगती लाभली त्याक्षणी तिचा उद्धार झाला. कंस, शिशुपाल हे तर कृष्णाचे कट्टर वैरी होते. त्यांचे सगळे आयुष्य त्याचा द्वेष करण्यातच गेले परंतु त्याचा द्वेष करण्याच्या नादात त्याच्याशिवाय त्यांना इतर काही सुचेनासे झाले. त्यामुळे त्यांची सतत आठवण काढत ते त्याच्याशी इतके एकरूप झाले की त्यांची प्रत्यक्ष संगती लाभल्या लाभल्या त्यांचा उद्धार झाला. असे कृष्णाचे अनेक वैरी सतत त्याचे चिंतन करत कृष्णरूप झाले आणि त्यातूनच त्या सर्वांचा उद्धार झाला. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. इतकेच काय महाभारतीय युद्धात जे जे म्हणून कृष्णाच्या समोर मृत झाले ते सर्व मृत्यूसमयी त्याच्या केवळ दर्शनाने उद्धरून गेले. श्रीकृष्णाच्या अंगाला चंदन लावण्याच्या निमित्ताने कुबजेचा कृष्णाच्या अंगाचा स्पर्श झाला आणि त्या पवित्रपावन स्पर्शाने तिचा उद्धार झाला. उन्मत्त होऊन मस्तवाल झालेला कुवलयापीड श्रीकृष्णाला मारण्याच्या उद्देशाने त्याच्या अंगावर धावून आला. त्याच्या त्या धाडसामुळे त्याची मोक्षाची वाट सुकर झाली. श्रीकृष्णावर घाव घालण्याच्या निमित्ताने त्याचा श्रीकृष्णाशी संपर्क होण्याचे निमित्त होऊन त्याचा उद्धार झाला. श्रीकृष्णावर अरिष्ट ओढ्वूया ह्या उद्देशाने शिंगी राक्षस श्रीकृष्णाच्या अंगावर धावून आला. त्याच्या शिंगाला धरून श्रीकृष्णाने त्याचा बेत उधळून लावला आणि त्या शिंगी राक्षसाचा त्याने उद्धार केला. अघासुर राक्षसाने तर श्रीकृष्णाला बघता बघता गिळून टाकले होते परंतु श्रीकृष्णाने त्याला उभ्या उभ्या चिरून टाकले. त्यामुळे त्याचा उद्धार झाला. श्रीकृष्णावर लक्ष ठेवून बक राक्षस यमुनेच्या पाण्यात ध्यान लावल्याचे सोंग वठवत होता. त्यानेही संधी मिळताच श्रीकृष्णाला गिळून टाकले. त्याचेही दोन तुकडे करून टाकून श्रीकृष्णाने त्याचा उद्धार केला. तृणावर्त राक्षसाने चक्रीवादळ उठवून श्रीकृष्णाला घेरण्याचा प्रयत्न केला परंतु श्रीकृष्णाने त्याच वादळात त्याला भोवंडून टाकले. त्या वादळात अडकला असताना त्याला श्रीकृष्णाच्या अंगाचा स्पर्श झाला. त्याचे निमित्त होऊन त्याचा उद्धार झाला. अशी अनेक वैऱ्यांच्यावरही त्याने कृपा केली.

Advertisement
Advertisement
Tags :

.