For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगुंदीत अवतरले श्री देव रवळनाथ!

11:45 AM May 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेळगुंदीत अवतरले श्री देव रवळनाथ
Advertisement

‘हर हर महादेव’च्या गजरात रवळनाथ मूर्ती प्रतिष्ठापना, कळसारोहण : मंदिराचा उद्घाटन सोहळा आज

Advertisement

आण्णाप्पा पाटील/बहाद्दरवाडी 

टाळ, मृदंग व पारंपरिक वाद्ये आणि हर हर महादेवाच्या गजरात बेळगुंदीचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कळसारोहण सोहळा बुधवारी सकाळी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाला. भक्तांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर श्री देव रवळनाथ विराजमान झाले. बेळगुंदीतील जागृत श्री रवळनाथ मंदिर लोकार्पण सोहळ्याला रविवारपासून सुरुवात झाली आहे. रविवारी विठ्ठल रखुमाई मंदिर येथून श्री रवळनाथ मूर्ती व कळसाची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अरभावी दगडातील एकमेव मंदिर बेळगुंदीतील रवळनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प गावकऱ्यांनी करून सर्वांच्या सहकार्यातून सुंदर मंदिर बांधले आहे. हे मंदिर पूर्णपणे अरभावी दगड व चिऱ्यामध्ये बांधल्यामुळे आकर्षक दिसत आहे. तालुक्यातील या दगडातील हे एकमेव मंदिर आहे.

Advertisement

बुधवारी पहाटे मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळ्याची जयत तयारी केली होती. मुक्तीमठ येथील श्री श्री शिवसिद्ध सोमेश्वर स्वामीजींच्या हस्ते श्री देव रवळनाथ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि अवघी बेळगुंदीनगरी रवळनाथाच्या जयघोषात रममान झाली. स्वामीजींचे स्वागत पाद्यपूजन करून करण्यात आले.  दुपारी गावातील सर्व माहेरवाशिणींचा विशेष सत्कार करण्यात आला. सायंकाळी आम्ही सवंगडी, सीमाभाग व चंदगड तालुका यांचा हरिपाठ कार्यक्रम झाला. यानंतर डॉ. विश्वनाथ पाटील महाराज यांचे प्रवचन झाले. यावेळी दीपोत्सव कार्यक्रमामध्ये महिला आरती घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रात्री कोगनोळी येथील हभप पूर्णानंद काजवे महाराज यांचे कीर्तन निरुपण झाले. गुरुवार दि. 15 रोजी सकाळी मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे ग्रामस्थ पंच कमिटीच्यावतीने कळविण्यात आले आहे.

बेळगुंदी येथील देव रवळनाथ मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासंदर्भात द. तरुण भारततर्फे विशेष पुरवणीचे मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात प्रकाशन करण्यात आले. देव रवळनाथाचा महिमा, देव रवळनाथाच्या पुरातन मंदिराची तसेच 1980 साली जीर्णोद्धार करण्यात आलेल्या मंदिराची व सध्याची सविस्तर माहिती तसेच गावातील विविध मंदिरे, गावचा इतिहास पुरवणीच्या माध्यमातून सविस्तर मांडण्यात आला आहे. या पुरवणीचे प्रकाशन करताना ग्रामस्थ पंच कमिटीचे दयानंद गावडा, शिवाजी बोकडे, रामचंद्र पाटील, यल्लाप्पा शहापूरकर, कल्लाप्पा बिजगर्णीकर, सुरेश पाऊसकर, अशोक पाटील, किरण मोटणकर, आप्पाजी शिंदे, नामदेव बाचीकर, कृष्णा गावडा, यल्लाप्पा बाचीकर, अशोक आमरोळकर, धुळाप्पा पाटील, परशराम शहापूरकर, सूर्यकांत चौगुले, महादेव बोकमूरकर, तुकाराम चव्हाण, खेमाणी तलवार, पुजारी नामदेव गुरव आदींसह तरुण भारतचे वार्ताहर आण्णाप्पा पाटील उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.