For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Cultural Kolhapur: श्री भगवद् गीतारहस्य प्रथम आवृत्तीची प्रत कोल्हापूरमध्ये

12:18 PM Aug 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
cultural kolhapur  श्री भगवद् गीतारहस्य प्रथम आवृत्तीची प्रत कोल्हापूरमध्ये
Advertisement

प्रकाशित झालेली प्रथम आवृत्तीची एक प्रत आजही कोल्हापूरात उपलब्ध आहे

Advertisement

By : सौरभ मुजुमदार 

कोल्हापूर : आज 1 ऑगस्ट, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा पुण्यतिथी दिवस. या महान देशभक्त व लेखकाने लिहिलेल्या अनेक ग्रंथांपैकी अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे ‘श्री भगवत् गीता रहस्य’. या विषयावर लिहिण्याचा योग म्हणजे याची प्रकाशित झालेली प्रथम आवृत्तीची एक प्रत आजही कोल्हापूरात उपलब्ध आहे.

Advertisement

ज्यांना गीता समजून घ्यावीशी वाटते त्यांनी लोकमान्य टिळकांचा हा ग्रंथ जरूर वाचावा. 1908 साली लोकमान्य टिळकांना ब्रह्मदेशातील मंडाले या तुरुंगात ठेवले. 1911 या काळात त्यांनी तुरुंगातच लिहिलेला हा ग्रंथ 1915 साली पुण्याच्या चित्रशाळा छापखान्यामध्ये छापून त्यांनी आपल्या घरामधून म्हणजेच केसरी ऑफिस येथून प्रसिद्ध केला.

या ग्रंथामध्ये स्वत: लिहिलेली 15 पानांची प्रस्तावना असून यात गीता रहस्य संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती उजेडात येते. श्रीमद्भगवद् गीता हा आपल्या धर्मग्रंथांपैकी एक अत्यंत तेजस्वी हिरा आहे. आत्मविद्येची गुढ व पवित्र तत्वे सुसुत्र शैलीत मांडणारा, शक्तीची ज्ञानाशी व व दोघांचीही व्यवहाराशी सुंदर जोड घालणारा निष्काम कर्तव्याचरणास प्रवृत्त करणारा दुसरा ग्रंथ वाङमयात सापडणे दुर्मीळ आहे.

गीता रहस्य’ टिळकांनी मंडाले कारागृहवासात लिहिला. ग्रंथ लेखनास 2 नोव्हेंबर 1910-11 (शके 1832 कार्तिक शुद्ध 1 ते फाल्गुन वद्य 30 च्या दरम्यान) रोजी प्रारंभ करून 900 पानांचा ग्रंथ 30 मार्च 1911 रोजी पाच महिन्यात त्यांनी पूर्ण केला. मूळ ग्रंथ शिसपेन्सिलीने लिहिलेल्या हस्तलिखिताच्या चार बाडांवरून तयार केला आहे. सोमवार 8 जून 1914 रोजी टिळकांची मंडालेतून सुटका झाली.

पुण्यास आल्यावर कित्येक आठवडे वाट पाहूनही मंडालेचा तुरुंग सोडण्यापूर्वी तेथील सामुग्रीसह तुरुंग अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केलेल्या हस्तलिखित वह्या सरकारकडून लवकर मिळण्याची चिन्हे दिसत नव्हती. दिवस लोटू लागल तसे सरकारच्या हेतूविषयी लोक साशंक होऊ लागले.

काहीजणांनी ‘सरकारचे लक्षण काही ठीक दिसत नाही, त्यांना या लिखाणांची कागदे परत न करण्याचा इरादा दिसतो?’ असे बोलून दाखवले. लोकमान्य मोठ्या खंबीरपणे म्हणत ‘भिण्याचे काही एक कारण नाही लिखाणाची कागदपत्रे सरकारचे ताब्यात असली तरी ग्रंथ माझे डोक्यात आहे.

फुरसतीचे वेळी निवांतपणे सिंहगडावर बसून ग्रंथ पुन्हा जशाच्या तसा लिहून काढीन.’ ही आत्मविश्वासाची तेजस्वी भाषा उतार वयातील म्हणजे अगदी साठीच्या घरात आलेल्या वयोवृद्ध लोकमान्यचीच आहे आणि ग्रंथ किरकोळ नसून गहन तत्वज्ञानविषयक असा भरभक्कम 900 पृष्ठांचा आहे.

याच गोष्टींवरून असे लक्षात येते की लोकमान्यच्या प्रवृत्ती पर प्रयत्न वादाची यथार्थ कल्पना तत्काळ येते. परंतु सुदैवाने पुढे सर्व कागदपत्रे सुरक्षित मिळाली व हा ग्रंथ नावारूपास आला. या ग्रंथाची प्रस्तावना स्वत: बाळ गंगाधर टिळक यांनी अधिक मास, वैशाख शके 1837 म्हणजेच 1915 रोजी लिहिलेली आहे.

त्यावरून खालील माहिती उजेडात येते. 1872 ला लोकमान्य यांचे वडील शेवटच्या दुखण्याने आजारी असताना भगवद्गीतेवरील भाषाविवृत्ती नावाची प्राकृत टीका त्यांना ती नियमीत वाचून दाखविण्याचे काम त्यांच्याकडे आले होते. तथापि वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी गीतेचा भावार्थ पूर्णपणे लक्षात येणे शक्य नव्हते.

परंतु लहान वयात मनावर घडलेले हे संस्कार टिकाऊ असल्यामुळेच पुढे भगवद्गीतेबद्दल टिळकांच्या मनात आवड निर्माण झाली व त्यांनी गीतेची अनेक पारायणे केली. परंतु प्रत्यक्षात हा ग्रंथ प्रसिद्ध येताना अनेक अडचणी आल्या होत्या. ग्रंथ छापण्यास तयार झाला. पण लढाईमुळे कागदाची उणीव पडली.

ती मुंबईमधील स्वदेशी कागदाच्या गिरणीचे मालक मेसर्स डी. पद्मजी आणि सन यांनी वेळेवर कागद पुरविल्यामुळे दूर झाली व गीतेचा हा मौल्यवान ग्रंथ चांगल्या स्वदेशी कागदावरच छापावयास मिळाला. सरते शेवटी चित्रशाळा छापखान्याचे मालक रा. रा. शंकर नरहर जोशी यांनी अत्यंत काळजीने व तातडीने ग्रंथ छपाईचे काम पूर्णत्वास नेले.

या प्रस्तावनेत स्वत: लोकमान्य टिळकांनी असे सांगितलेले आहे की संसारच मोक्षदृष्ट्या कसा केला पाहिजे व मनुष्यमात्राचे संसारातले खरे कर्तव्य काय याचा तात्विक दृष्ट्या उपदोष करण्यासाठी गीता शास्त्राची प्रवृत्ती झालेली आहे. हे प्राचीन शास्त्र शक्य तितक्या लवकर समजून घेतल्याखेरीज राहू नये, एवढीच शेवटची विनंती आहे...बाळ गंगाधर टिळक.

या महान पुरुषाच्या, देशभक्ताच्या पुण्यतिथी दिनी या मौल्यवान ग्रंथाच्या स्मृती जागृत झाल्या हीच खरी त्यांना आदरांजली कोल्हापूर संस्थानचे मानकरी कै. सखाराम गोपाळ मुजुमदार (आटेगांवकर राधानगरी सरकार) यांचे सासरे कै. एस. व्ही. उर्फ सखाराम विठ्ठल कुलकर्णी - वाळवेकर इनामदार यांच्याकडील अनेक ग्रंथसंपदे मार्फतच हा ग्रंथ कोल्हापुरात आला आहे. त्यांनी हा ग्रंथ पुणे येथील The Printing Agency, Bhdhwar Peth, Pune  येथून 13 जुलै 1915 रोजी खरेदी केलेला आहे. सध्या हा ग्रंथ अत्यंत सुस्थितीत व वाचनीय स्वरूपात संग्रहित आहे

Advertisement
Tags :

.