बसवण कुडची येथे श्री बसवाण्णा यात्रेस प्रारंभ
आंबील गाड्यांची भव्य मिरवणूक : हर हर महादेवचा गजर- गुलालाची उधळण, भाविकांची गर्दी
वार्ताहर/सांबरा
बसवण कुडची येथे सोमवार दि. 24 रोजी श्री बसवाण्णा, श्री कलमेश्वर व श्री ब्रह्मदेवाच्या यात्रेला अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ झाला असून सायंकाळी आंबील गाड्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हर हर महादेवचा गजर करत गुलालाची उधळण करण्यात येत होती. आंबील गाड्यांच्या मिरवणुकीनिमित्त बैलांना सजविण्यात आले होते. आंबिल गाडा मिरवणुकीमध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निलजी येथील आंबील गाडेही या यात्रेमध्ये दरवर्षी सहभागी होतात. गावानजीकच्या गाडेमार्गावर आंबील गाड्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आंबिल व घुगऱ्या वाटण्यात आल्या. आंबील गाड्यांची मिरवणूक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. रात्री आठनंतर चव्हाट गल्ली बेळगाव येथून जोतिबाच्या मानाच्या देवदादा पालखीचे मंदिराकडे आगमन झाले. यावेळी विधिवत पूजन करून इंगळ्यांच्या विधीला प्रारंभ करण्यात आला. रात्री श्री बसवाण्णाचा विवाह सोहळा पार पडला. रात्री उशिरापर्यंत अनेक धार्मिक विधी पार पडले.
मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई 
यात्रेनिमित्त मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर मंदिर परिसरात अनेक खेळण्यांची दुकानेही थाटण्यात आली आहेत. यात्रेनिमित्त गावामध्ये महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यांची डागडुजी केली असून ठिकठिकाणी पथदीप बसविण्यात आले आहेत व स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे.
आज इंगळ्यांचा कार्यक्रम
मंगळवार दि. 25 रोजी भर यात्रा असून मंदिरात सकाळी ऊद्राभिषेक, पूजा आदि कार्यक्रम होतील. तर सायंकाळी इंगळ्यांचा कार्यक्रम होणार आहे. येथील इंगळ्यांची यात्रा सर्वत्र प्रसिद्ध असून या यात्रेला दरवर्षी हजारो भाविकांची गर्दी असते.