टीम इंडियाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे
वृत्तसंस्था/मुंबई
ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने भारत ‘अ‘ संघाची घोषणा केली. धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यापासून तिलक वर्मा भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. वनडे मालिकेला 30 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सुरुवात होईल. तर 3 आणि 5 ऑक्टोबर रोजी दुसरा व तिसरा सामना याच मैदानावर रंगणार आहे. टीम इंडिया सध्या आशिया कप 2025 स्पर्धेत खेळत आहेत. आशिया कप स्पर्धेत खेळत असलेल्या बहुतांश खेळाडूंना ऑस्ट्रेलिया अ विरूद्ध मालिकेत निवड करण्यात आली आहे. मात्र आशिया कपमुळे काही खेळाडूंना पहिल्या सामन्यात खेळता येणार नाही. त्यामुळे पहिल्या सामन्यासाठी अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि अर्शदीप सिंह या तिघांना संधी देण्यात आलेली नाही. हे तिघे आशिया कप फायनलनंतर भारतीय संघासोबत जोडले जाणार आहेत.
श्रेयस रेड बॉल क्रिकेटपासून काही काळ राहणार दूर
श्रेयस पुढील सहा महिने कसोटी क्रिकेटपासून दूर राहणार आहे. इंग्लंडमध्ये त्याच्यावर पाठीची शस्त्रक्रिया झाली होती आणि तो सावरला देखील होता, पण दीर्घ फॉर्मेट खेळताना त्याला पुन्हा एकदा स्नायूंचा त्रास जाणवला. म्हणूनच तो काळ स्वत:ची फिटनेस, सहनशक्ती आणि शारीरिक ताकद सुधारण्यासाठी वापरणार आहे. याच कारणामुळे त्याचा इराणी कपसाठी विचार करण्यात आलेला नाही.
पहिल्या वनडे सामन्यासाठी भारत अ संघ -
श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), रियान पराग, आयुष बडोनी, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, निशांत सिंधू, गुरजपनीत सिंग, युधवीर सिंग, रवी बिश्नोई, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), प्रियांश आर्य, सिमरजीत सिंग.
दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेसाठी भारत अ संघ -
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), रियान पराग, आयुष बडोनी, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, निशांत सिंधू, गुरजपनीत सिंग, युद्धवीर सिंग, रवी बिश्नोई, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), हर्षित राणा, अर्शदीप सिंग.