श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड यांचा शतकी धमाका
रणजी ट्रॉफी : पहिला दिवस मुंबईचा, ओडिशाविरुद्ध 385 धावा
वृत्तसंस्था/ मुंबई
येथील शरद पवार क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीतील सामन्याचा पहिला दिवस मुंबईने गाजवला. गेल्या काही काळापासून भारतीय संघाबाहेर असलेल्या श्रेयस अय्यरचे नाबाद दीडशतक व सिद्धेश लाडच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने 90 षटकांत 3 बाद 385 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अय्यर 152 तर लाड 116 धावांवर खेळत होता. दुसरीकडे, अंगीकृष रघुवंशी आणि आयुष म्हात्रे या दोघांनीही मोलाचे योगदान दिले मात्र कॅप्टन अजिंक्य रहाणे अपयशी ठरला.
प्रारंभी, ओडिशाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. ओडीशाच्या सूर्यकांत प्रधानने मुंबईला पहिला झटका दिला. सूर्यकांतने आयुष म्हात्रेला 18 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट केले. यानंतर अंगीकृष रघुवंशी व सिद्धेश लाड या दोघांनी 135 धावांची महत्वपूर्ण भागीदारी साकारली. दोघांनाही एकेरी दुहेरी धावांवर भर देत संघाचे दीडशतक फलकावर लावले. मैदानावर स्थिरावलेली ही जोडी बिप्लव समंत्रयने फोडली. त्याने रघुवंशीला बाद करत ओडिशाला मोठे यश मिळवून दिले. रघुवंशीने 124 चेंडूत 13 चौकार व 3 षटकारासह 92 धावांचे योगदान दिले. शतकापासून मात्र तो वंचित राहिला. यानंतर आलेल्या कर्णधार रहाणेला भोपळाही फोडता आला नाही.
श्रेयस, सिद्धेशची धमाकेदार खेळी
सलग दोन विकेट गेल्याने मुंबईची 3 बाद 154 अशी स्थिती झाली होती. रहाणे गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर श्रेयस फलंदाजीला आला. मैदानात येताच त्याने फटकेबाजी सुरू केली आणि यंदाच्या रणजी हंगामातील सलग दुसरे शतक ठोकले. सिद्धेश लाड व श्रेयस अय्यर या दोघांनीही चौथ्या विकेटसाठी 231 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. अय्यरने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 15 वे शतक झळकावताना 164 चेंडूत 18 चौकार व 4 षटकारासह नाबाद 152 धावा फटकावल्या. दुसरीकडे, सिद्धेशनेही 14 चौकारासह नाबाद 116 धावा करत त्याला मोलाची साथ दिली. श्रेयस व सिद्धेश या दोघांनीही ओडिशाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मुंबईने 90 षटकांत 3 गडी गमावून 385 धावा केल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक : मुंबई पहिला डाव 90 षटकांत 3 बाद 385 (रघुवंशी 92, आयुष म्हात्रे 18, रहाणे 0, सिद्धेश लाड खेळत आहे 116, श्रेयस अय्यर खेळत आहे 152, समंत्रय 2 तर प्रधान 1 बळी).
श्रेयस अय्यरचे यंदाच्या हंगामातील दुसरे शतक
29 वर्षीय श्रेयस अय्यरने या वर्षी फेब्रुवारी 2024 मध्ये विशाखापट्टणम येथे शेवटचा कसोटी सामना खेळला होता. इंग्लंडविरुद्ध सामन्यात तो फ्लॉप ठरला होता, तेव्हापासून भारतीय कसोटी संघापासून तो बाहेर आहे. अय्यर या मालिकेत चांगली कामगिरी करू शकला नाही आणि त्यानंतर त्याची बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध निवड झाली नाही. त्यानंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठीही त्याला टीम इंडियात स्थान मिळाले नाही. पण हा रणजी हंगाम अय्यरसाठी खूप महत्त्वाचा असेल. यंदाच्या हंगामात सलग दुसरे शतक झळकावून त्याने टीम इंडियात पुनरागमन करण्याचा दावा केला आहे.
केरळच्या जलज सक्सेनाची रणजी ट्रॉफीत ऐतिहासिक कामगिरी
थुंबा, केरळ : देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिग्गज खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळच्या 37 वर्षीय जलज सक्सेनाने यंदाच्या रणजी हंगामात ऐतिहासिक अशी कामगिरी केली आहे. रणजी करंडक स्पर्धेच्या इतिहासात 6000 हून अधिक धावा व 400 हून अधिक विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. केरळ विरुद्ध उत्तर प्रदेश या लढतीत त्याने ही कामगिरी साकारली. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करणाऱ्या केरळने भेदक गोलंदाजीच्या जोरावर उत्तर प्रदेशला 162 धावांवर गुंडाळले. सक्सेनाने यूपीचा डावखुरा फलंदाज नितीश राणाला यष्टिचीत करून 400 वा विकेट घेण्याचा पराक्रम केला. सक्सेनाने यानंतर लवकरच त्याची पाचवी विकेट घेतली. रणजी करंडक स्पर्धेत त्याने आतापर्यंत 29 वेळा पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, 37 वर्षीय सक्सेना हा रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील 400 विकेट्सचा टप्पा गाठणारा केवळ 13 वा गोलंदाज आणि ही कामगिरी करणारा एकमेव सक्रिय क्रिकेटपटू आहे.
रणजी ट्रॉफीतील यशस्वी अष्टपैलू खेळाडू
- जलज सक्सेना - 6028 धावा, 401 विकेट्स
- सुनील जोशी - 4116 धावा, 479 विकेट्स
- साईराज बहुतुले - 4426 धावा, 405 विकेट्स
- मदनलाल - 5270 धावा, 351 विकेट्स
- ऋषी धवन - 4576 धावा, 342 विकेट्स
इतर रणजी सामन्यातील निकाल
- सेनादल 4 बाद 239 वि महाराष्ट्र, पुणे
- हिमाचल 6 बाद 263 वि विदर्भ, नागपूर
- पश्चिम बंगाल 5 बाद 259 वि कर्नाटक, बेंगळूर
- उत्तर प्रदेश 162 वि केरळ 2 बाद 82, थुंबा
- गोवा 3 बाद 322 वि मिझोराम, अहमदाबाद
- बडोदा 4 बाद 157 वि त्रिपुरा, आगरतळा.