श्रेयस अय्यर ‘आयसीयू’तून बाहेर, गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान झेल टिपताना प्लीहाला दुखापत झालेल्या श्रेयस अय्यरला सिडनी येथील आयसीयूमधून बाहेर हलवण्यात आल्याने टीम इंडियाने मोठा सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. बीसीसीआयने त्याची प्रकृती आता स्थिर आणि सुधारत असल्याची पुष्टी केली आहे.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या तिसऱ्या सामन्यादरम्यान बरगडीच्या दुखापतीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यानंतर भारताचा एकदिवसीय उपकर्णधार श्रेयस अय्यरला अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करावे लागले होते. अॅलेक्स कॅरीला बाद करण्यासाठी बॅकवर्ड पॉइंटवरून मागे धावत असताना एक शानदार झेल घेणाऱ्या अय्यरला या प्रक्रियेत त्याच्या डाव्या बरगडीला दुखापत झाल्याचे दिसून आले होते आणि शनिवारी ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर लगेचच त्याला ऊग्णालयात दाखल करण्यात आले होते. बीसीसीआयने एका निवेदनात प्लीहाला दुखापत झाल्याचे उघड केले आहे.
25 ऑक्टोबर रोजी सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरच्या डाव्या बरगडीच्या खालच्या भागात दुखापत झाली होती. त्याला अधिक तपासणीसाठी ऊग्णालयात नेण्यात आले होते. स्कॅनमध्ये प्लीहाला दुखापत झाल्याचे दिसून आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तो वैद्यकीयदृष्ट्या स्थिर आहे आणि तो बरा होत आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम सिडनी आणि भारतातील तज्ञांशी सल्लामसलत करून त्याच्या दुखापतीच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारतीय संघाचे डॉक्टर श्रेयसच्या दैनंदिन प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी सिडनीमध्ये राहतील, असे बीसीसीआयच्या निवेदनात म्हटले आहे.
श्रेयस गेल्या काही दिवसांपासून आयसीयूमध्ये आहे. वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर अंतर्गत रक्तस्त्राव आढळून आला आणि त्याला ताबडतोब दाखल करावे लागले, असे या घटनेची माहिती असलेल्या एका सूत्राने नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितले. रक्तस्त्राव झाल्यामुळे संसर्गाचा प्रसार थांबवणे आवश्यक असल्याने तो बरा झाल्यावर दोन ते सात दिवस निरीक्षणाखाली राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर अय्यरच्या तब्येतीच्या महत्त्वाच्या निकषांत चढ-उतार दिसून आल्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने तातडीने कृती केली. ‘टीम डॉक्टर आणि फिजिओने कोणताही धोका पत्करला नाही आणि त्याला ताबडतोब ऊग्णालयात नेले. आता परिस्थिती स्थिर आहे, परंतु ती प्राणघातक ठरू शकली असती. तो एक धाडसी लढवय्या खेळाडू असून तो लवकरच यातून बरा होईल’, असे सूत्राने पुढे सांगितले. सुऊवातीला अय्यरला सुमारे तीन आठवडे खेळण्यापासून दूर राहावे लागणार अशी अपेक्षा होती, परंतु आता जी परिस्थिती दिसून येत आहे ती पाहता बरे होण्याचा कालावधी जास्त असू शकतो.
‘अंतर्गत रक्तस्त्राव झाला असल्याने त्याला बरे होण्यासाठी निश्चितच अधिक वेळ लागेल आणि त्याला स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यासाठी निश्चित किती वेळ लागेल हे सांगणे कठीण आहे’, असे सूत्राने सांगितले. या 31 वर्षीय खेळाडूला भारतात परतण्याच्या दृष्टीने तंदुऊस्त घोषित करण्यापूर्वी किमान एक आठवडा सिडनीतील ऊग्णालयात राहावे लागण्याची अपेक्षा आहे. अय्यर भारताच्या टी-20 संघाचा भाग नाही.
श्रेयसचे आई-वडील जाणार ऑस्टेलियाला
भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यावेळी भारताच्या वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीचा झेल घेताना जखमी झाला होता. त्याच्या बरगडीला दुखापत झाल्याने त्याला अंतर्गत रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे श्रेयसला सिडनी येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तो आता आयसीयूतून बाहेर आला असला तरी मुलाची काळजी वात असल्याने त्याचे आई-वडील सिडनीला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी त्यांनी तातडीने व्हिसा मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. व्हिसा मंजूर झाल्यानंतर ते सिडनीला प्रयाण करतील, असे सांगण्यात आले.