श्रेयस-इशान पुन्हा बीसीसीआयच्या केंद्रीय करारात
रोहित, विराट, बुमराह व जडेजा ए प्लस ग्रेडमध्ये कायम : अभिषेक, नितीश रेड्डी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती प्रथमच करार यादीत
वृत्तसंस्था/ मुंबई
बीसीसीआयने 2024-25 हंगामासाठी (1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025) टीम इंडियाच्या केंद्रीय करारांची यादी जाहीर केली आहे. यावेळी एकूण 34 खेळाडूंना बीसीसीआयचा केंद्रीय करार मिळविण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे, श्रेयस अय्यर आणि इशान किशन हे बीसीसीआयच्या केंद्रीय करारात परतले आहेत. गतवर्षी, दोघांनाही बीसीसीआयच्या करारातून वगळण्यात आले होते. याशिवाय, देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या अभिषेक शर्मा, हर्षित राणा, नितीश कुमार रे•ाr, वरुण चक्रवर्ती व आकाशदीप यांना प्रथमच करारबद्ध केले आहे. तसेच कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा हे ए प्लसमध्ये कायम राहतील.
गेल्या वर्षी श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना केंद्रीय करारातून वगळण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे देशांतर्गत क्रिकेट न खेळणे. जर एखाद्या खेळाडूचा राष्ट्रीय संघात समावेश नसेल तर त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळावे, असा आदेश बोर्डाने दिला होता. बोर्डाच्या आदेशानंतरही, श्रेयस आणि इशान त्यावेळी उर्वरित रणजी ट्रॉफीमध्ये खेळले नाहीत. बीसीसीआयच्या दणक्यानंतर मात्र श्रेयसने रणजी ट्रॉफीसह सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत शानदार कामगिरी केली. तसेच इशाननेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली चमक दाखवली. याचा फायदा या दोघांना झाला असून बीसीसीआयने त्यांना केंद्रीय करार यादीत पुन्हा स्थान दिले आहे.
युवा खेळाडूंना संधी
अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती हे पहिल्यांदाच बीसीसीआयच्या केंद्रीय करारात सामील झाले आहेत. या चौघांचाही क श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. वरुणने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 9 विकेट्स घेतल्या. नितीशने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये त्याच्या कामगिरीने प्रभावित केले. त्याच वेळी, अभिषेक शर्माने 12 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 200.48 च्या स्ट्राइक रेटने 411 धावा केल्या आहेत.
दरम्यान, या यादीत, मागील केंद्रीय करारात समाविष्ट असलेल्या 5 खेळाडूंना वगळण्यात आले आहे. ज्यामध्ये शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, जितेश शर्मा, केएस भरत आणि आवेश खान यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान अश्विनने निवृत्तीचा निर्णय घेतला होता. यामुळे या यादीत त्याचा समावेश करण्यात आला नाही.
बीसीसीआयची नवी करार यादी :
ग्रेड ए प्लस : रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.
ग्रेड ए : मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, ऋषभ पंत.
ग्रेड बी : सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर.
ग्रेड सी : रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान, नितीश कुमार रे•ाr, इशान किशन, अभिषेक शर्मा, आकाशदीप, वरुण चक्रवर्ती व हर्षित राणा.
34 खेळाडू अन् चार ग्रेड
बीसीसीआयच्या केंद्रीय करारात 34 खेळाडूंना 4 श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक खेळाडूला त्याच्या ग्रेडनुसार बीसीसीआयकडून वार्षिक रक्कम दिली जाईल. ए प्लस ग्रेड असलेल्या खेळाडूंना जास्तीत जास्त 7 कोटी रुपये दिले जातात. तर ए ग्रेड वनमध्ये 5 कोटी रुपये मिळतात. तर बी श्रेणीतील खेळाडूंना 3 कोटी रुपये मिळतील. तर सी ग्रेडमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना दरवर्षी 1 कोटी रुपये मिळतात.
रोहित, विराटचे स्थान अबाधित
टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले आणि त्यानंतर टेस्ट तसेच वनडे क्रिकेटमधूनही निवृत्त होण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा या सारख्या खेळाडूंना बीसीसीआयने ए प्लस ग्रेडमध्ये स्थान दिले आहे. आर. अश्विन निवृत्त झाल्याने त्याचा या यादीत समावेश नाही.