श्री लोटस डेव्हलपर्सचा येणार आयपीओ, 729 कोटी उभारणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मुंबईतील उच्चभ्रूंसाठी बांधकाम प्रकल्प राबवणारी कंपनी श्री लोटस डेव्हलपर्स यांचा आयपीओ 30 जुलै रोजी बाजारात सादर केला जाणार आहे. 792 कोटी रुपये आयपीओअंतर्गत उभारले जाणार असून महत्त्वाचे म्हणजे या कंपनीमध्ये बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांनी गुंतवणूक केलेली आहे. त्यामध्ये शाहरुख खान, अमिताभ बच्चन, ऋतिक रोशन, अजय देवगन, एकता कपूर, सारा अली खान, राजकुमार राव आणि टायगर श्रॉफ यांचा समावेश आहे.
आयपीओसंबंधी...
30 जुलैला आयपीओ खुला होऊन 1 ऑगस्ट रोजी बंद होणार आहे. समभागाची इशू किंमत 140 ते 150 रुपये प्रति समभाग असणार आहे. आयपीओअंतर्गत कंपनी 5.28 कोटी नवे ताजे समभाग सादर करेल. बीएसई आणि एनएसईवर कंपनीचे समभाग 6 ऑगस्ट रोजी सूचीबद्ध होतील अशी माहिती देण्यात आली आहे.
डिसेंबर 2024 मध्ये कंपनीने प्रीआयपीओ प्लेसमेंटच्या माध्यमातून 400 कोटी रुपये उभारले होते. यामध्ये एकट्या प्रसिद्ध गुंतवणूकदार आशिष कचोलीया यांनी 50 कोटी रुपये गुंतवले आहेत. कंपनीचे मुंबईमध्ये लक्झरी आणि अल्ट्रालक्झरी प्रकारातील बांधकाम प्रकल्प कार्यरत आहेत. मुख्यरीत्या ही कंपनी पुनर्विकास मॉडेल या आधारावर फ्लॅट्स आणि ऑफिस विकसित करते. श्री लोटस डेव्हलपर्स यांच्या प्रकल्पातील खरेदी केलेले फ्लॅटस् अभिनेते भाड्याने सुद्धा देतात.