श्रावणमासाची चाहूल; फळे, फुले खरेदीला जोर
श्रावणाच्या निमित्ताने शहर-उपनगरांतील विविध मंदिरांची स्वच्छता-डागडुजी : आज दीप अमावास्या : उद्या पहिला शुक्रवार
बेळगाव : येत्या शुक्रवार दि. 25 रोजी श्रावणमासाची सुरुवात होत आहे. व्रत-वैकल्यांचा महिना अशी श्रावणाची ओळख असून या महिन्यात महिलांबरोबर पुरुषवर्गही उपवास करीत असतात. श्रावणाच्या निमित्ताने शहर आणि उपनगरांतील विविध मंदिरांची स्वच्छता व डागडुजी करण्याचे काम मागील दोन दिवसांपासून सुरू होते. गुरुवारी अवसेची अमावास्या असून तिला दीप अमावास्या असेही म्हटले जाते. दिव्यांची स्वच्छता करून त्यांचे पूजन करण्याचा हा दिवस घरोघरी आचरणात आणला जातो.
श्रावण महिन्यात सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवशी वार पाळण्याची प्रथा असून महिलांबरोबर पुरुषही वार करीत असतात. यंदा श्रावण महिन्यात 5 शुक्रवार, 5 शनिवार, 4 सोमवार, 4 मंगळवार, 4 रविवार आले आहेत. येत्या मंगळवार दि. 29 रोजी नागपंचमी व मंगळागौर पूजनही आहे. नवविवाहिता पाच वर्षे मंगळागौरचे पूजन करत असतात. यावर्षी 29 जुलै, 5, 12 आणि 19 ऑगस्ट हे मंगळागौर पूजनासाठीचे दिवस आहेत. श्रावणात अनेकजण सत्यनारायणाची पूजा करीत असतात.
श्रावण महिन्याची चाहूल लागताच शहर आणि उपनगरांतील बाजारपेठेत फुले, फळे, पूजा साहित्य, फराळाचे साहित्य यांची रेलचेल वाढली आहे. ग्राहकवर्गही बाजारात खरेदीसाठी दाखल होत आहेत. विशेषत: सायंकाळी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होताना दिसत आहे. गुरुवारी अमावास्या असून पूजेसाठी लागणारे साहित्य तसेच कोहळा खरेदी करताना अनेकजण दिसून येत होते. कोहळ्याचा दर 100 ते 150 रुपयेपर्यंत असून लहान-मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते.
बुधवारी बाजारपेठेचा फेरफटका मारला असता फुलांची आवक वाढल्याचे दिसून आले. फुले, फळे, पूजा साहित्याच्या दराचा अंदाज घेण्यात आला. पाच फळांचा संच 100 रुपये दराने उपलब्ध होता. सफरचंद 200 ते 300 रु. किलो, डाळिंब 100 ते 200 रु. किलो, मोसंबी 60 ते 80 रु. किलो, पेरू 60 रु. किलो, सीताफळ 100 रु. किलो, चिकू 100 रु. किलो, वेलची केळी 100 रु. किलो, जवारी केळी 100 रु. किलो, हायब्रीड केळी 50 ते 60 रु. डझनप्रमाणे उपलब्ध होती. विविध प्रकारची शेवंती फुले 300 रुपये किलो दराने उपलब्ध होती. हार 40 ते 100 रु. प्रति नग, गुलाब 200 रु. किलो, केवडा कणीस 150 ते 250 रु. एक नग, सत्यनारायण पूजा साहित्य 150 ते 200 रुपये बॉक्स याप्रमाणे उपलब्ध होते. सायंकाळी पावसाने उघडीप दिल्याने बाजारात खरेदीसाठी गर्दी दिसून आली.