Cultural Kolhapur: जगणं शिकवणारा श्रावणातला कुळाचार जोगवा, काय आहे अख्यायिका
ओला जोगवा म्हणजे शिजवलेल्या अन्नाचा देखील जोगवा मागितला जातो
By : प्रसन्न मालेकर
कोल्हापूर : कोल्हापूर भागात किंबहुना सर्वच देवी उपासकांकडे एक पूर्वापार प्रथा पार पाडली जाते. मात्र अलीकडे प्रतिष्ठा, संकोच अशा अनेक घटकांमुळे ही प्रथा मागे पडत चालली आहे, ती म्हणजे जोगवा. श्रावणातल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीच्या विशेषत: रेणुका किंवा भवानीच्या नावाने घरच्या कर्त्या स्त्रीने जोगवा मागण्याची पद्धत अनेक घरांमध्ये रूढ आहे. परंतु बदललेल्या सामाजिक परिस्थितीमुळे शिक्षण आणि आर्थिक स्थितीमुळे हा कुळाचार हळूहळू बंद होत चालला आहे.
अलीकडे फक्त देवीचे किंवा खंडोबाचे दास म्हणजे जोगती किंवा वाघे मुरळी आराधी हेच जोगवा मागत असले तरी हा कुळाचार गृहस्थांनादेखील आहे. श्रावणातल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी उपवास करून जवळपासच्या पाच घरांमध्ये जोगवा मागणे हा जोगवा मागताना दारातूनच ‘....चा जोगवा’ म्हणून हाक दिली जाते.
इथं रिकाम्या जागेत ज्या देवीचा नावाने जोगवा मागितला जातो तिचे नाव घेण्याची पद्धत आहे पूर्वीच्या काळी घराची संपत्ती परिस्थितीत सुधारावी, मूलबाळ जगावे, अशा अनेक कारणासाठी जोगवा मागण्याचा नवसदेखील केला जायचा. ज्या दिवशी जोगवा मागायचा त्यादिवशी उपवास करून मिळालेल्या धान्याचा स्वयंपाक केला जातो काही ठिकाणी ओला जोगवा म्हणजे शिजवलेल्या अन्नाचा देखील जोगवा मागितला जातो.
त्या स्वयंपाकाचे वाटे करून एक देवाला एक गाईला आणि एक स्वत:साठी, काही परंपरेत गुरु आणि अतिथी असे पाच वाटे केले जात. सगळ्यांना अन्न देऊन मग शेवटी आपण त्यातला भाग ग्रहण केला जातो. देवीच्या नावाने मागितलेला जोगवा हा जोगवा म्हणून, तर अशीच पद्धत खंडोबाच्या उपासनेमध्ये वारी मागण्याची आहे.
फरक इतकाच की देवीचा जोगवा हा शक्यतो महिला मागतात काही ठिकाणी पुरुषही मागतात. तर खंडोबाची वारी ही प्राधान्यता पुरुष मागत असतात. विचार केला तर या लोक विलक्षण प्रथेमागे एक सामाजिक कारण आहे. जोगवा मागताना आपले सांपत्तिक परिस्थिती विसरून लोकांच्या दारामध्ये मूठभर अन्नासाठी उभे राहावे लागते, अशा वेळेला जरी आपल्या घरी भरपूर असले तरी याचक वृत्ती स्वीकारल्यामुळे मनाला आलेला संपत्तीचा अहंकार एका क्षणात निघून जातो.
देणारा हा नेहमीच वरचढ ठरतो हे लक्षात येतं. आपल्याकडे जे सुख आहे त्याची किंमत काढायची असेल तर पाच मुठी धान्यासाठी दारोदार फिरायला लागतं हे लक्षात येतं. तेव्हा पक्वान्नाचं का नसेना पण भाजी भाकरीचं ताट आपल्याला रोज उपलब्ध आहे, याबद्दल आपल्या भाग्याचे आपल्यालाच कौतुक वाटतं.
याउलट जर एखाद्याची संपत्ती परिस्थिती चांगली नसेल तर मागितलेले दान हे स्वत:साठी नसून देवीच्या नावानं आहे, हे लक्षात आल्यावर त्याच्या स्वाभिमानाला कमीत कमी धक्का बसतो. तर देणारा हे आपण याचकाला दिलं, यापेक्षा देवीला दिलं या भावनेने या दानाकडे बघतो.
त्यामुळे देणाऱ्यालाही एक आत्मिक समाधान मिळतं. समाधानाची व्याख्या करणं हे प्रत्येकाच्या वैयक्तिक अवस्थेवर अवलंबून असते. पण नेमकं समाधान कशात शोधायचं, हे शिकवणारा हा परंपरागत कुळाचार म्हणजे जोगवा.
अहंकार होऊ नये म्हणून...
लग्नकार्यात देखील गोंधळा वेळेला नवदाम्पत्याला पाच घर जोगवा मागवा लागतो. या प्रसंगात मागितलेला हा जोगवा नव्या दाम्पत्याला याची शिकवण देतो की तुमचा संसार हा फक्त तुम्हा दोघांचा नाही तर या आणि अशा अनेक लोकांच्या सहकार्याने तुमचा संसार भरणार आहे.
समाजात राहायचं असेल तर समाजाच्या रितीभातीला आपलंसं करून एकमेकांशी स्नेह जोडला तर आनंदाचे जीवन जगता येते हे सांगण्यासाठी हा गोंधळातला जोगवा. थोडक्यात काय तर असलेल्या गोष्टीचा अहंकार होऊ नये आणि नसलेल्या गोष्टीची लाज वाटू नये यासाठी नेमून दिलेला हा कुळाचार म्हणजे जोगवा.