महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा ‘श्रावण’

11:48 AM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

श्रावणाची सुरुवात सोमवारपासून होत असल्याने अधिक महत्त्व, व्रत-वैकल्यांना प्रारंभ : आठवड्यातील सातही वारांना धार्मिक महत्त्व : विविध सणांची रेलचेल

Advertisement

बेळगाव

Advertisement

श्रावण आला...

घन निळे होतील 

धरित्री हिरवा शालू नेसेल

इंद्रधनुचे सप्तरंग उमटतील

ऊन-पावसाचा खेळ सुरू होईल

आणि त्याचबरोबर विविध सण-वार, व्रत-वैकल्ये, नेम-नियम यांनाही सुरुवात होईल. श्रावण आहेच तसा खास. या महिन्यापासून अनेक व्रत-वैकल्यांना प्रारंभ होतो. आजही त्याचे पालन होत आहे. कोणत्याही व्रत-वैकल्यांना केवळ धार्मिक अधिष्ठान नसते तर त्याला शास्त्रीय किंवा वैज्ञानिक कारणेही असतात. हे काही असले तरी ‘माणसाइतके महत्त्वाचे काहीही नाही’ हे प्रथम लक्षात घ्यायला हवे. आपले बहुतेक सण-वार हे निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे अधिक आहेत. आणि कृतज्ञता हा तर मानवतेचा स्थायीभाव आहे. रविवारी दीप अमावास्या साजरी झाली. गटारी अमावास्या असे त्याचे विकृतीकरण चुकीचे आहे. दिवा हे तर प्रकाशाचे प्रतीक. त्याची पूजा या दिवशी करण्यात आली. आज पहिला श्रावण सोमवार. मुख्य म्हणजे श्रावणाची सुरुवात सोमवारपासून होत असल्याने त्याला अधिक महत्त्व आले आहे.

श्रावण सोमवार

या दिवशी सर्व शिवालयांमध्ये विशेष पूजा केली जाते. कारण सोमवार हा भगवान शंकराचा वार. दिवसभर उपवास करून गोरज मुहुर्तावर उपवास सोडला जातो. सोमवारी जोंधळ्याचा कोणताही पदार्थ खाल्ला जात नाही. एका सोमवारी तरी मलिदा आवर्जुन केला जातो. याचे कारण पावसामुळे आलेल्या गारव्यामध्ये गुळामुळे उष्णता निर्माण व्हावी, हे होय.

मंगळागौर

वास्तविक मंगळागौरीच्या खेळामुळे हे व्रत लोकप्रिय झाले आहे. आज आपण निसर्गाला ओरबाडून इतके काँक्रिटीकरण केले आहे की निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची पुन्हा गरज निर्माण होणार आहे. याचा अर्थ पर्यटन नव्हे तर निसर्गातील विविध वनौषधी वनस्पतींची, झाडांची माहिती करून त्याचा उपयोग जाणून घेणे हा त्याचा हेतू आहे. म्हणून तर मंगळागौरीला 16 प्रकारच्या पत्री सांगण्यात आल्या आहेत, जेणेकरून त्या आणण्यासाठी महिलांना निसर्गाच्या सानिध्यात राहता येईल. संयम हा आवश्यकच आहे. नववधूला त्याचे महत्त्व कळावे या हेतूने भोजन करताना नववधूंनी मौन धारण करून भोजन करावे, असा संकेत आहे.

श्रावण बुधवार

हा बृहस्पतीचा वार. श्रावणातील बुधवारी धनसंचय केल्या जाणाऱ्या पेटीवर, दारामागे किंवा धन-धान्य असणाऱ्या खोलीतील भिंतीवर चुन्याने दोन बाहुल्या रेखाटून त्यांची पूजा केली जाते.

श्रावण गुरुवार

या दिवशी विशेष असे काही व्रत नसले तरी दत्त आराधना आवर्जुन केली जाते.

श्रावण शुक्रवार

याला मात्र विशेष महत्त्व असून हा देवीचा वार म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. मुख्य म्हणजे पूरणाची आरती केली जाते. घरातील मुले आपल्या आईच्या पायावर डोके ठेवून तिचा आशीर्वाद घेतात आणि आई त्यांच्या मस्तकी अक्षता रोपण करते, जेणेकरून सर्व नकारात्मकतेपासून मुलांचे संरक्षण व्हावे. सायंकाळी दूध, साखर, फुटाण्याचा नैवेद्य दिला जातो. महालक्ष्मी सजविण्याचे अनेक प्रकार आहेत, जेणेकरून महिलांच्या कल्पनाविलासाला आणि कौशल्याला वाव मिळतो, हे सुद्धा महत्त्वाचेच.

श्रावण शनिवार

या दिवशी मुंजा (ज्याची मुंज झाली आहे) ला भोजनास बोलाविले जाते. तसेच पिंपळाच्या पानावर दहीभात ठेवून नैवेद्य दाखविला जातो. पाच घरांमध्ये हा दहीभात देण्याची प्रथा आहे. जेणेकरून पिंपळाच्या पानावर भूताखेतांचा वास असतो, त्यापासून संरक्षण व्हावे, ही त्यामागील श्रद्धा होय.

श्रावण रविवार

रविवार हा आदित्य नारायणाचा म्हणजेच सूर्याचा वार. दारासमोर सूर्याची प्रतिमा काढून तिची पूजा करून त्याची कृपादृष्टी सदैव राहो, अशी प्रार्थना केली जाते.

नागपंचमी

नाग हा शेतकऱ्यांचा कैवारी समजला जातो. किड-कीटक आणि बेडूक यांच्यापासून तो पिकाचे संरक्षण करतो. त्याच्याप्रती कृतज्ञभाव निर्माण व्हावा, त्याच्याबद्दलची भीती कमी व्हावी, तसेच आपण त्यांना उपद्रव दिला नाही तर कोणताही प्राणी निष्कारण मनुष्याच्या वाटेला जात नाही, हे अधोरेखित करण्यासाठी नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी कोणत्याही पदार्थाचे तळण केले जात नाही. उकडीवर भर असतो. म्हणजेच पावसाळ्यात अति तळण पदार्थ प्रकृतीला मानवणारे नाहीत, म्हणूनच उकडीचे कडबू केले जातात. घरासमोर नागांच्या प्रतिमा रेखाटल्या जातात. काही ठिकाणी आजही जमिनीवर निखारे ठेवून त्यावर कणकीचे मुटके भाजून खाल्ले जातात. षष्टी दिवशी भिजवलेले वाल विड्याच्या पानावर ठेवून विहिरीला नैवेद्य दाखविला जातो. याचे कारण पूर्वजांपैकी कोणाचा बुडून मृत्यू झाला असेल तर त्याला सद्गती लाभावी व पुन्हा अशा घटना होऊ नयेत यासाठी पाण्याप्रती दाखविलेला कृतज्ञभाव होय.

नारळी पौर्णिमा

पाणी म्हणजेच जीवन, पाण्याशिवाय मनुष्य आणि प्राणीमात्रांच्या जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे. समुद्रामुळे अनेकांना विविध प्रकारचा रोजगार मिळतो, प्रामुख्याने मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना. भरतीवेळी या समुद्राने रौद्ररुप घेऊ नये तसेच ज्याच्यावर आपले पोट चालते त्याच्याबद्दल कृतज्ञता म्हणून समुद्राला, नदीला श्रीफळ अर्पण करून कृतज्ञभाव दाखवला जातो.

राखी पौर्णिमा

नात्यातील भावबंध दृढ करणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा. भावाच्या मनगटी राखी बांधून सदैव आपल्या पाठीशी रहा, अशी इच्छा बहीण व्यक्त करते. काळानुरुप आता आपल्यासोबत ज्यांनी राहावे, धीर द्यावा, अशी अपेक्षा ज्यांच्याकडून आहे त्या सर्वांना राखी बांधण्याचा प्रघात सुरू झाला आहे. हा बदल स्वागतार्हच म्हणावा.

गोकुळाष्टमी

या दिवशी श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. डिंक, शेंगदाणे, चिरमुरे यासह विविध प्रकारचे गूळ घालून केलेले लाडू नैवेद्य म्हणून दाखविले जातात. प्रसाद म्हणून याचे सेवन केले जाते. म्हणजेच पौष्टिक घटक शरीरामध्ये जावेत, हा त्यामागचा हेतू आहे. या सणाचे वैशिष्ट्या म्हणजे या एकाच दिवशी आई आपल्या मुलाला वाण देते. अन्यथा सर्व व्रत-वैकल्ये, सणा-वारांमध्ये महिलांना अधिक महत्त्व दिले आहे. या सर्व व्रत-वैकल्यांमध्ये महिलांना हेतूत: गुरफटवून ठेवण्यात आले आहे, असाही सूर उमटला. मात्र आज चित्र बदलले आहे. हे सर्व केलेच पाहिजे अशी सक्ती फारशी दिसत नाही. तरुणीही स्वतंत्र विचाराच्या झाल्या आहेत. त्यामुळे ज्या गोष्टी किंवा जे सण वार आनंद देतात, परस्परांना जोडून घेतात ते करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. अर्थात पुन्हा माणसाइतके महत्त्वाचे काहीच नसल्याने ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ हेच महत्त्वाचे आहे.

माती ही जीवनदायिनी

नाग मूर्ती, गोकुळ मूर्ती, श्री मूर्ती, बेंदुरसाठीच्या बैलांच्या मूर्ती यामध्ये एक साम्य आढळते, ते म्हणजे या मूर्ती मातीपासून केल्या जातात. अत्यंत निर्धन व्यक्तीलासुद्धा त्याच्या इच्छेनुसार पूजा भाव जपता यावा, हा त्यामागील उद्देश आहे. परंतु माती ही जीवनदायिनी आहे. तिच्या प्रतीचा कृतज्ञभाव या सर्व व्रतांच्या आचरणामागे दडला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatsindhudurg
Next Article