श्रद्धा बांदेकर आणि सतीश पवार यांचा मालवण पोलिसांनी केला सन्मान
पर्यटकाची हरवलेली अडीच लाख किंमतीच्या सामानाची बॅग पोलिसांच्या केली होती स्वाधीन
मालवण । प्रतिनिधी
गुजरात येथील पर्यटकाची सुमारे अडीच लाख किंमतीच्या सामानाची बॅग इव्हनिंग वॉकसाठी गेलेल्या मालवण -कोळंब येथील श्रद्धा सुंदर बांदेकर यांना सापडली. त्यानंतर कुंभारमाठ येथील गॅरेज मेकॅनिक सतीश पवार यांच्या मदतीने मालवण पोलिसांना त्यांनी स्वाधीन केली . श्रद्धा बांदेकर आणि सतीश पवार यांच्या प्रामाणिकपणामुळे पर्यटकाला त्याची बॅग पुन्हा परत मिळाली. यामुळे मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कोल्हे यांच्या पुढाकारातून रेझिंग डे सप्ताहाचे औचित्य साधून श्रीमती श्रद्धा बांदेकर आणि सतीश पवार यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सन्मानपत्र शाल ,श्रीफळ, तसेच पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. बांदेकर आणि पवार यांच्या प्रामाणिकपणामुळेच मालवण पोलिसांना सदर बॅग त्याच्या मूळ मालकाला परत करण्यात यश आले व आपले कर्तव्य चोखपणे बजावता आले.या सत्कार प्रसंगी बोलताना श्री प्रवीण कोल्हे म्हणाले की श्रद्धा सुंदर बांदेकर आणि सतीश रमेश पवार ,यांनी एक आदर्श आणि जबाबदार नागरिक कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण समाजासमोर दाखवून दिले आहे .त्यामुळे त्यांचा संपुर्ण सिंधुदुर्ग पोलिस दलास अभिमान आहे असेही ते म्हणाले. यावेळी पोलिस उपनिरिक्षक आनंद यशवंते , पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत , उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्गचे अधिकारी श्री जाधव आणि हडी बीट अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री हेमंत पेडणेकर, सुशांत पवार तसेच इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.