यत्नाळ यांना हायकमांडकडून कारणे दाखवा
भाजपच्या केंद्रीय शिस्तपालन समितीकडून नोटीस : 10 दिवसांत उत्तर देण्याची सूचना
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्याविरोधात दंड थोपटलेल्या ज्येष्ठ आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांना अखेर पक्षश्रेष्ठींनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. राज्य भाजप नेतृत्त्वाविरुद्ध बंडखोरी करून वक्फ मालमत्तेविरोधात स्वतंत्र अभियान केलेल्या यत्नाळ यांना भाजपच्या केंद्रीय शिस्तपालन समितीचे सचिव ओम पाठक यांनी नोटीस बजावून 10 दिवसांत उत्तर देण्याची सूचना दिली आहे.
पक्षाचे ज्येष्ठ नेते असूनही तुम्ही भाजपच्या नेतृत्त्वाविरोधात करत असलेली वक्तव्ये आक्षेपार्ह आहेत. यापूर्वी दिलेला शब्द मोडून भाजपच्या नेतृत्त्वाविरुद्ध पुन्हा टीका करणे हे शिस्तीचे उल्लंघन आहे. त्यामुळे तुमच्यावर का कारवाई केली जाऊ नये, अशी विचारणा यत्नाळ यांना पाठविण्यात आलेल्या नोटिशीत करण्यात आली आहे. यापूर्वी अनेकवेळा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तेव्हा तुम्ही शिस्तीचे पालन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, बेशिस्त कायम ठेवून कलंकित झाला आहात. तुमचे ज्येष्ठत्व आणि पक्षासोबत दीर्घकाळ राहिल्याची बाब लक्षात ठेवून तुम्ही यापूर्वी दिलेल्या स्पष्टीकरणाविषयी केंद्रीय शिस्तपालन समितीने नरमाईची भूमिका घेतली होती. मात्र, पुन्हा उघडपणे वक्तव्ये करून पक्ष नेतृत्त्वाविरुद्ध खोटे व निराधार आरोप करणे पक्षाच्या नियमांविरुद्ध आहे. त्यामुळे तुमच्याविरुद्ध का कारवाई करू नये, याविषयी 10 दिवसांत स्पष्टीकरण द्यावे, अशी सूचना नोटिशीद्वारे देण्यात आली आहे.
विधानसभेच्या पोटनिवडणुकीनंतर वक्फच्या मुद्द्यावरून यत्नाळ यांनी उत्तर कर्नाटकातील 5 जिल्ह्यांमध्ये स्वतंत्रपणे अभियान सुरू केले. राज्यातील पक्षनेतृत्त्वावरही जोरदार टीका केली. याचवेळी विजयेंद्र यांच्या समर्थक गटानेही यत्नाळ यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी वरिष्ठांकडे केली होती. त्यामुळे राज्य भाजपमधील गटबाजीचे राजकारण चव्हाट्यावर आले. याच दरम्यान शुक्रवारी नवी दिल्लीत राज्य भाजपचे प्रभारी राधामोहनदास यांची भेट घेऊन यत्नाळ यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. तरी सुद्धा आमदार यत्नाळ यांनी रविवारी बेळगावमध्ये वक्फविरोधात मेळावा घेत राज्य नेतृत्त्वावर परखड टीका केली. वरिष्ठांनी दिल्लीला बोलावल्यामुळे ते दिल्लीलाही गेले.
उत्तर देईन : बसनगौडा पाटील-यत्नाळ
पक्षाच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर देईन. तसेच राज्य भाजपमधील वास्तविक स्थितीचा पत्रामध्ये उल्लेख करणार आहे. हिंदुत्त्वाच्या लढ्याविषयी मी कटिबद्ध आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन, वंश राजकारणाविरुद्ध आंदोलन, वक्फविरोधातील आंदोलनही सुरुच राहणार आहे. यातून माघार घेण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्टीकरण भाजप आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी दिले.
प्रतीक्षा करूया : बी. वाय. विजयेंद्र
आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांना भाजपच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. ते काय उत्तर देतात याविषयी प्रतीक्षा करूया. उत्तर देण्यासाठी त्यांना 10 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. तोपर्यंत प्रतीक्षा करणे योग्य ठरेल, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी दिली आहे.