केपीसीसीवर हवा अध्यक्ष नवा!
वरिष्ठांकडे विनंती केल्याची मंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती
बेंगळूर : मलाच केपीसीसीचा अध्यक्ष बनवा अशी मागणी केलेली नाही. निवडणुकीत मते मिळवून देणाऱ्या लोकप्रिय नेत्याला प्रदेशाध्यक्ष बनविण्याची विनंती वरिष्ठांकडे केली आहे. केपीसीसीवर पूर्णवेळ अध्यक्ष नेमण्याची विनंती राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांच्याकडे केली आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. बेंगळूरमध्ये बुधवारी पत्रकारांशी ते बोलत होते. केपीसीसीला पूर्णवेळ अध्यक्ष आवश्यक आहे. आमदारांची मते जाणून शक्य तितक्या लवकर नवा प्रदेशाध्यक्ष नेमा. प्रदेशाध्यक्षपदी माझीच नेमणूक करा, अशी मागणी केलेली नाही. निवडणुकीत मते आणणाऱ्या लोकप्रिय नेत्याला अध्यक्ष बनवा. सध्या प्रदेशाध्यक्ष असणारे डी. के. शिवकुमार हेच या पदावर कायम ठेवणार की नाही, तेही हायकमांडने स्पष्ट करावे. विनाकारण निर्माण झालेल्या गोंधळावर पडदा टाकावा, अशी विनंती केली आहे, असेही सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
पक्षाच्या नवीन प्रदेशाध्यक्ष नेमणुकीबाबत हायकमांडने आमदारांचे मत विचारात घ्यावे. आमदारांचा पाठिंबा असणारे प्रदेशाध्यक्ष बनावेत. आम्हाला पूणवेळ अध्यक्ष हवे आहेत. सर्व ज्येष्ठ नेत्यांचेही हेच मत आहे. पक्षातील सर्व आमदारांची मते जाणून हायकमांडने आमदारांच्या इच्छेनुसार नव्या प्रदेशाध्यक्षाची नेमणूक करणे योग्य ठरेल, असेही ते म्हणाले. आम्ही मंत्री बनल्यानंतर पक्षासाठी वेळ देणे कमी झाले आहे. 2023 मध्ये जो वेग होता. तो आता राहिलेला नाही. त्यामुळेच नवा प्रदेशाध्यक्ष नेमण्याची आमची मागणी आहे. लोकसभा निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष बदलला जाणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले होते.
पुढील आठवड्यात जारकीहोळी दिल्लीला?
कर्नाटक काँग्रेसवर नवा प्रदेशाध्यक्ष नेमण्याची मागणी करणारे मंत्री सतीश जारकीहोळी हे हायकमांडच्या भेटीसाठी पुढील आठवड्यात नवी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. काही दिवसापूर्वीच त्यांनी बेंगळूरमध्ये राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांची भेट घेतली आहे. आता हायकमांडच्या भेटीसाठी ते पुढील आठवड्यात दिल्लीला जाणार असल्याचे समजते. त्यांच्यासोबत काही मंत्री देखील हायकमांडच्या भेटीसाठी जाण्याची शक्यता आहे.