For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरोपीला वेळेत हजर न केल्याने तपास अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस

12:20 PM Sep 22, 2025 IST | Radhika Patil
आरोपीला वेळेत हजर न केल्याने तपास अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस
Advertisement

मंगळवेढा  :

Advertisement

लक्ष्मी दहिवडी येथील एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयात वेळेत हजर न केल्याच्या प्रकरणी मंगळवेढा न्यायालयाने तपास अधिकारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद लातूरकर यांना "कारणे दाखवा नोटीस" बजावली आहे. या घटनेमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली असून जिल्हा पोलिस अधीक्षक या प्रकरणी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

घटनेचा तपशील लक्ष्मी दहिवडी येथील फिल्टर पाणी तयार करणाऱ्या कंपनीचे गेट तोडून, तेथील मशिनरी चोरी करण्याचा प्रयत्न 5 डिसेंबर 2024 रोजी झाला होता. या प्रकरणात जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख आणि अन्य आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Advertisement

सुमारे आठ महिन्यांनी पोलिसांनी आरोपीला अटक करून मंगळवेढा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने 18 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र, कोठडी संपल्यानंतर 24 तासांच्या आत आरोपीला न्यायालयात हजर करणे अपेक्षित असतानाही, आरोपीला वेळेत न्यायालयात सादर करण्यात आले नाही.

आरोपी भैय्या देशमुख यांचे वकील अ‍ॅड. रामलिंग कोष्टी यांनी न्यायालयात तक्रार अर्ज सादर करत तपास अधिकारी विनोद लातूरकर यांनी पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या रिमांडच्या वेळी देखील कोर्टाची वेळ व नियमानुसार प्रक्रिया पाळलेली नाही, असे नमूद केले.
त्यांनी अधिकाऱ्यांवर "अक्षम्य विलंब आणि न्यायालयाच्या सूचना दुर्लक्षित करण्याचे आरोप" करत न्याय प्रक्रियेला अडथळा निर्माण होत असल्याचे दाखवले.

त्याचबरोबर, 18 सप्टेंबर रोजी आरोपीला सायंकाळी 4.45 वाजता आणले गेले होते, आणि 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजे 24 तास उलटल्यानंतरही आरोपीला न्यायालयात हजर केले नव्हते. यामुळे पोलिसांनी आरोपीला बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले असून, आरोपीच्या घटनात्मक हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला.

याप्रकरणी न्यायालयाने तपास अधिकारी विनोद लातूरकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याआधीही न्यायालयाने आरोपीला वेळेत हजर करण्याबाबत तोंडी सूचना दिली होती. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून आले.

तक्रारीत असेही नमूद करण्यात आले की, आरोपीला हजर करताना तपास अधिकारी स्वतः गैरहजर होते आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांद्वारे आरोपीला पाठवण्यात आले. ही बाब न्यायालयाच्या नियमावलीचे उल्लंघन ठरते.

मंगळवेढा पोलिस ठाण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच न्यायालयाकडून तपास अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली गेली आहे. त्यामुळे पोलिस खात्यात मोठी खळबळ उडाली असून, कामचुकार अधिकाऱ्याला आता शिस्तभंगाची कारवाई भोगावी लागू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement
Tags :

.