परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रज्ज्वलना ‘कारणे दाखवा’
प्रतिनिधी/ बेंगळूर
हासनचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांनी मागील 28 दिवसांपासून विदेशात आसरा घेतला आहे. नोटीस बजावूनही ते एसआयटीसमोर हजर होत नसल्याने त्यांचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने प्रज्ज्वलना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. कोणत्या कारणासाठी विदेश प्रवास हाती घेतला?, विदेशातून केव्हा परत येणार?, अशी विचारणाही परराष्ट्र मंत्रालयाने केली असून माहिती द्यावी. तुमचा पासपोर्ट का रद्द करू नये, याचा 10 दिवसांत खुलासा करावा, अशी सूचना प्रज्ज्वलना देण्यात आली आहे. त्यामुळे अश्लील चित्रफिती आणि लैंगिक शोषण प्रकरणात आरोप असणाऱ्या खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याविरोधातील कारवाईचा फास आणखी आवळला जात आहे. प्रज्ज्वल यांच्याविरोधात न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याने तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या व एसआयटीने केंद्र सरकारला पत्र पाठविल्याने प्रज्ज्वल यांचा राजतांत्रिक पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. यासंबंधी परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. राज्य सरकारच्या विनंतीवरून पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
हेल्पलाईनवर आतापर्यंत 30 हून अधिक फोन
खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध अश्लील चित्रफिती आणि लैंगिक शोषण प्रकरणासंबंधी पीडितांना तक्रार दाखल करण्यासाठी एसआयटीने हेल्पलाईन सुरू केली होती. त्यावर आतापर्यंत 30 हून अधिक फोन आले आहेत. मात्र, आतापर्यंत कोणत्याही पीडित महिलेने तक्रार नोंदविलेली नाही. त्यामुळे एसआयटीने पुन्हा एकदा हेल्पलाईनद्वारे तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधून देखील तक्रार नोंदविता येणार आहे, असे एसआयटीने म्हटले आहे.