खांद्यांनी कार खेचणारा ‘खंदा’
बुंदेलखंड भागातील सागर येथील एका युवकाने नवा विक्रम केला आहे. हा विक्रम त्याने भारतात केला नसून इटलीमध्ये जाऊन केला आहे. या युवकाने आपल्या खांद्यांच्या दोन्ही हाडांच्या साहाय्याने (शोल्डर ब्लेडस्) दोरी बांधून एक भारी भक्कम वजनाची कार खेचून दाखविली. हा प्रसंग तेथील चॅनेल-5 या वाहिनीवरच्या ‘लो शो डी रेकॉर्ड’ या कार्यक्रमात लाईव्ह दाखविण्यात आला.
या युवकाचे नाव अभिषेक असे आहे. लहानपणापासून त्याला असे अनोखे स्टंट करण्याचा छंद आहे. त्याने यावेळी इटलीत आपलाच जुना विक्रम मोडला आहे. त्याने यावेळी 1,294 किलो वजनाची कार 15 फुटापेक्षा जास्त अंतर अशा प्रकारे खेचून जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. यावेळी इटलीचे प्रसिद्ध टीव्ही अँकर आणि तेथील माजी खासदार गॅरी कोस्ट आणि गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे उपाध्यक्ष मॅक्रो फ्रिगेट्टी हे उपस्थित होते. या प्रसंगाचे चित्रण इटलीच्या मिलान शहरात फेब्रुवारी महिन्यात झाले होते. तर 18 एप्रिलला या चित्रणाचे प्रसारण करण्यात आले. अभिषेक याला यासाठी विशेषत्वाने आमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अभिषेकप्रमाणेच स्पेन, अर्जेंटिना, अमेरिका, पाकिस्तान, इंग्लंड, रोमानिया, जपान, इटलीसह अनेक देशांचे सर्वोत्तम विक्रमवीर बोलाविण्यात आले होते. या साऱयांच्या समोर अभिषेकने हा विक्रम केल्याने त्याचे जगभरात नाव झाले आहे. अभिषेक हा सागर येथील राजीव कॉलनीत राहणारा मध्यमवर्गिय युवक आहे. त्याने खांद्याने कार खेचण्याचे अनेक विक्रम यापूर्वीही केले आहेत.