For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीची लढाई

06:29 AM Jan 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीची लढाई
Advertisement

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे अखेर बिगुल वाजल्याने राजधानीतील रणसंग्रामाला आता खऱ्या अर्थाने सुऊवात झाली आहे. येत्या 5 फेबुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून, दीड कोटी मतदारांच्या हातात दिल्लीचे भविष्य असेल. अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत असली, तरी खरी लढत ही आप आणि भाजपमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. हे बघता नवी दिल्लीचे राजकारण कोणत्या वळणाने जाणार, हे पाहणे महत्त्वाचे असेल. दिल्लीमध्ये विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत. मागच्या तीन निवडणुकांमध्ये दिल्लीवर प्रामुख्याने आम आदमी पक्षाचे वर्चस्व राहिल्याचे दिसून येते. 2011 च्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून जन्मलेल्या आपने मागच्या 15 वर्षांत दिल्लीसह देशाच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान मिळविले आहे. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत आपने तब्बल 67 जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले. तर 2020 च्या निवडणुकीत 62 जागांवर सरशी साधत आपने विजयाचा झेंडा फडकवला. या पार्श्वभूमवर केजरीवाल यांचा आप आता पुन्हा निवडणुकीला सामोरा जात आहे. अर्थात आत्तापर्यंतचा इतिहास आपच्या बाजूने असला, तरी या निवडणुकीत त्यांची खऱ्या अर्थाने कसोटी लागेल. कथित मद्य घोटाळा, माजी मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह अन्य नेत्यांवर झालेली अटकेची कारवाई यामुळे आपच्या प्रतिमेवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसते. याशिवाय मागच्या तीन टर्ममध्ये सत्तेत असल्याने अॅन्टी इन्कबन्सी पॅक्टरचाही पक्षाला सामना करावा लागेल, अशी चिन्हे दिसतात. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या मतदारांनी आप आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांना साफ झिडकारले. तर भाजपाच्या पारड्यात भरभरून मते टाकली. लोकसभेत मोदी आणि विधानसभेत केजरीवाल हा दिल्लीकरांचा मागच्या काही वर्षांत ट्रेंड राहिला आहे. तथापि, बदलते संदर्भ लक्षात घेता यात बदल होईल का, हे पहावे लागेल. गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीवर कब्जा करण्यासाठी भाजपानेही जोरदार तयारी चालवली आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर ‘आप’ला घेरण्याचे धोरण आणि डावपेच भाजपने अवलंबले आहे. पंतप्रधान मोदी यांनी तर आप म्हणजे आपदा अर्थात आपत्ती असल्याचे विधान करीत या पक्षावर थेट हल्लाबोल केल्याचे पहायला मिळते. तर ‘आप’नेही भाजपा हेच संकट असल्याचा पलटवार केला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या या फैरी बघता पुढच्या टप्प्यात हे शाब्दिक युद्ध चांगलेच रंगण्याची शक्यता आहे. ‘आप’ने आपल्या सर्वच्या सर्व जागांवरील उमेदवार जाहीर केले आहे. तर काँग्रेसनेही आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केल्याचे दिसून येते. भाजपाने 29 जागांवरील उमेदवार जाहीर केले असून, त्यांच्या दुसऱ्या यादीबाबत प्रतीक्षा असेल. विधानसभेची लढाई जिंकण्यासाठी आपने प्रामुख्याने महिलांवर लक्ष केंद्रित केलेले दिसते. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना हे त्याचेच प्रतीक मानावे लागेल. त्यानुसार महिलांना मासिक एक हजार ऊपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पुन्हा सत्तेत आल्यास 2100 ऊपये इतकी मदत देण्यात येणार असल्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. असे असले, तरी दिल्ली सरकारच्या वित्त विभागाने या योजनेच्या खर्चाबाबत चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे पुजाऱ्यांना मासिक 18 हजार ऊपये भत्ता देण्याची घोषणा करून आपने धार्मिक कार्डही पुढे केले आहे. भाजपाच्या कडव्या हिंदुत्वाला सॉफ्ट हिंदुत्वाने उत्तर देण्याचा केजरीवाल यांचा नेहमीच प्रयत्न असतो. या निवडणुकीतही भाजपाचे आव्हान मोडून काढण्यासाठी त्यांनी हीच रणनीती वापरल्याचे दिसते. मागच्या दहा पंधरा वर्षांचा विचार केला, तर या कालावधीत ‘आप’ने नक्कीच काही जनहितकारक कामे केली. दिल्लीतील सरकारी ऊग्णालये, शाळांचे ऊपडे बदलले. वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सोयीसुविधा लोकांना सवलतीत पुरवल्या. याचा फायदा सरकारची लोकप्रियता वाढण्यात झाला, हे नाकारता येत नाही. परंतु, काँग्रेस आणि भाजपने ‘आप’च्या सगळ्या घोषणा कशा फसव्या असतात, हे सांगण्याचा सपाटा चालवला आहे. काँग्रेसनेही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ‘प्यारी दीदी’ नावाची योजना आणली असून, सत्तेत आल्यास महिलांना 2500 ऊपये देण्याची घोषणा केली आहे. तर दिल्लीत रस्ते, मेट्रोसह वेगवेगळे मोठे प्रकल्प हे केंद्र सरकारनेच आणल्याचा दावा भाजपाने केला आहे. मात्र, आप सरकार या विकासकामांमध्ये अडथळा वा आपत्ती आणत असल्याची टीकाही शीर्षस्थ नेतृत्वाकडून केली जात आहे. मागच्या 25 वर्षांत भाजपाला दिल्लीत सरकार स्थापन करता आलेले नाही. केंद्रात भाजपचे सरकार असूनही दिल्लीत पक्ष सत्तेपासून वंचित असल्याची खंत नेतृत्वास आहे. त्यामुळे या खेपेला काहीही करून दिल्लीवर झेंडा फडकवायचाच, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा निर्धार आहे. त्यादृष्टीने दिल्लीत भाजपाने जोरदार कंबर कसली आहे. अलीकडेच महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यात भाजपाने निर्भेळ यश मिळवत सत्ता सोपान गाठला. आता राजधानी दिल्लीवर भगवा फडकविण्यासाठी भाजपाने नवी रणनीती आखली आहे. आप आणि काँग्रेस यांच्यातील वादाचा पक्षाला कसा फायदा होईल, याकडे भाजपाचे लक्ष असेल. दिल्लीची मॅजिक फिगर 36 इतकी आहे. हा आकडा पार करणे, हे तिन्ही पक्षांपुढचे मोठे आव्हान असेल. महाराष्ट्राच्या निवडणुकीत ईव्हीएमचा मुद्दा गाजला. अनेक पक्षांकडून निवडणुकीच्या पारदर्शकतेबद्दल शंका उपस्थित करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून ईव्हीएममध्ये कोणत्याही छेडछाडीला वा शंकेला वाव नसल्याचे म्हटले आहे. दिल्लीतील मतदार हा मुळात सूज्ञ म्हणून ओळखला जातो. कुठे मोदी मॉडेल  स्वीकारायचे आणि कुठे केजरीवाल, हे त्यांनी मागच्या काही दिवसांत दाखवून दिले. आता विधानसभेची लढाईदेखील या दोन मॉडेलमध्येच असल्याचे पहायला मिळते. सद्सद्विवेकबुद्धीने मतदान करणारा दिल्लीचा हा मतदार नेमके कुणाला मतदान करतो, हे आपल्याला 8 फेब्रुवारीलाच कळणार आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.