For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मृत व्यक्तींची नावं मतदारयादीत असावी का?

07:00 AM Jul 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
मृत व्यक्तींची नावं मतदारयादीत असावी का
Advertisement

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांचा सवाल : बिहारमधील एसआयआरवरून राजकीय वादाची पार्श्वभूमी

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सखोल तपासणी (एसआयआर) अभियानावरून विरोधी पक्षांकडून होत असलेल्या विरोधादरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी या प्रक्रियेचे जोरदार समर्थन केले आहे. निवडणूक आयोगाने मृत्युमुखी पडलेले व्यक्ती, बनावट मतदार ओळखपत्रधारक आणि विदेशी नागरिकांना मतदारयादीत सामील करण्याची अनुमती द्यावी का, असा सवाल त्यांनी केला आहे. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी एसआयआर अभियानाच्या विरोधात तीव्र भूमिका मांडली आहे. मृत्युमुखी पडलेल्या लोकांची नावं मतदारयादीत कायम ठेवण्याची अनुमती आयोगाला दिली जावी का? खोटे ओळखपत्र असलेल्या लोकांना मतदानाची अनुमती द्यावी का? विदेशी नागरिकांना मतदारयादीत सामील करावे का, असे सवाल ज्ञानेश कुमार यांनी उपस्थित केले आहेत. एक शुद्ध अणि अचूक मतदारयादी लोकशाहीच्या यशाचा पाया असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.

Advertisement

आयोगाकडून आकडेवारी

एसआयआर अभियानाच्या अंतर्गत आतापर्यंत 56 लाख मतदार अयोग्य आढळून आले आहेत. यात 20 लाख मृत मतदार, 28 लाख असे मतदार जे बिहारमधून स्थलांतरित झाले आहेत, तर दोन ठिकाणी नोंदणी असलेले 7 लाख मतदार आणि थांगपत्ताच लागू न शकलेले 1 लाख मतदार सामील आहेत. निवडणुक आयोगाने अशा लोकांची नावे मतदार यादीतून हटवावी का नको, असा सवाल ज्ञानेश कुमार यांनी विचारला.

पारदर्शक प्रक्रियेचा दावा

एसआयआर अभियान पूर्णपणे पारदर्शक असून याचा उद्देश एक शुद्ध मतदारयादी तयार करणे आहे. बिहारच्या मतदारांनी या अभियानात उत्साहाने भाग घेतला आहे आणि आतापर्यंत 57.48 टक्के गणना अर्ज एकत्र करण्यात आले आहेत. 2003 च्या मतदार यादीत सामील 4.96 कोटी मतदारांना कुठलेही अतिरिक्त दस्तऐवज सादर करण्याची गरज नाही. तर उर्वरित 3 कोटी मतदारांना स्वत:ची जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी 11 सूचीबद्ध दस्तऐवजांपैकी एक जमा करावे लागणार आहे. आयोगाकडून पारदर्शक प्रक्रियेच्या माध्यमातून तयार केली जाणारी अचूक मतदारयादी निष्पक्ष निवडणूक आणि मजबुत लोकशाहीचा पाया नाही का? कुठल्या न कुठल्या वळणावर, आम्हा सर्वांना आणि भारताच्या सर्व नागरिकांना राजकीय विचारसरणी बाजूला ठेवत या महत्त्वपूर्ण प्रश्नांवर एकत्रितपणे गंभीर विचार करावा लागेल, असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षांची रणनीति

एसआयआर प्रक्रिया न रोखल्यास राज्यात आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याची धमकी बिहारमधील विरोधीपक्षनेते आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी दिली होती. लोकांची इच्छा आणि आमच्या सहकाऱ्यांचे म्हणणे जाणून घेतल्यावर निर्णय घेणार आहोत. राज्याची निवडणूक पक्षपातपूर्ण करविण्यात आली किंवा कोण किती जागा जिंकणार हे पूर्वीच ठरविले गेल्यास अशा निवडणुकीत सहभागी होण्याचा फायदा काय, असे प्रश्नार्थक विधान तेजस्वी यादव यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.