श्रीमंती असावी तर अशी !
50 अब्जांचा महाल, सोन्याने जडविण्यात आलेले विमान
जगातील बहुतांश देशांमध्ये लोकशाही आहे, म्हणजेच जनतेकडून निवडण्यात आलेले सरकार तेथे असते. परंतु अद्याप काही देशांमध्ये राजेशाही कायम आहे. हे देश चालविण्याची जबाबदारी राजा किंवा सुल्तानांकडे असते. अशाच एका सुल्तानाला जगातील सर्वात धनाढ्या व्यक्ती मानले जाते. ब्रुनेईचे सुल्तान हसनल बोल्कियाह यांचे पूर्ण नाव हसनल बोल्कियाह इब्नी उमर अली सैफुद्दीन तृतीय आहे. ते सध्या 77 वर्षांचे आहेत. ब्रुनेई स्वत:च्या मोठ्या तेलसाठ्यांसाठी ओळखला जातो. या देशाची एकूण लोकसंख्या सुमारे साडेचार लाख इतकी आहे.
सुल्तान हसनल बोल्कियाह यांची एकूण संपत्ती 2 लाख 88 हजार कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे एक खासगी मालकीचे विमान असून ते सोन्याने जडविण्यात आलेले आहे. 3 हजार 359 कोटी रुपयांच्या या विमानात 959 कोटी रुपयांहून अधिक मूल्याची सामग्री असून सोन्याच्या वॉश बेसिनचा देखील समावेश आहे. हे सर्व पाहून कुणीही श्रीमंती असावी तर अशी असेच म्हणेल.
गॅरेजमध्ये 7 हजार आलिशान कार्स
फरारी, लॅम्बोर्गिनी, पोर्श, बेंटले, रॉल्स रॉयस, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जग्वार, लँड रोव्हर, ऑडी अशा अनेक कंपन्यांच्या आलिशान कार्स ब्रुनेई सुल्तानच्या गॅरेजची शोभा वाढवितात. 183 लँड रोव्हर, 275 लॅम्बोर्गिनी, 350 हून अधिक बेंटले कार्स त्यांच्याकडे आहेत. याचबरोबर कारशी निगडित सर्व आलिशान ब्रँड्सची 100 हून अधिक मॉडेल्स त्यांच्या ताफ्यात आहेत. ब्रुनेईच्या सुल्तानाकडे 7 हजारांहून अधिक आलिशान कार्सचे कलेक्शन आहे.
सर्वात मोठा महाल
ब्रुनेईच्या या सुल्तानाचा महाल जगातील सर्वात मोठा महाल आहे. याला ‘इस्ताना नुरुल इमान पॅलेस’ या नावाने ओळखले जाते. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये देखील याचे नाव नोंद आहे. 20 लाख चौरस फूटात फैलावलेल्या या आलिशान महालात एकूण 1700 हून अधिक खोल्या, 257 हून अधिक बाथरुम्स, मोठमोठे स्वीमिंग पूल, कार्ससाठी शेकडो गॅरेज आहेत.
बंगाल टायगर पाळण्याची किमया
ब्रुनेईच्या सुल्तानांकडे स्वत:चे प्राणिसंग्रहालय देखील असून यात त्यांनी जवळपास 30 बंगाल टायगर्स पाळले आहेत. याचबरोबर अनेक पक्षी आणि इतर प्राणी या प्राणिसंग्रहालयात आहेत. या प्राण्यांना तेथे विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. हसनल बोल्कियाह यांनी 2017 मध्ये राजा म्हणून 50 वर्षे पूर्ण केली होती. ते ब्रुनेईचे 29 वे सुल्तान आहेत. 1984 मध्ये इंग्रजांची राजवट संपुष्टात आल्यापासून ते देशाचे पंतप्रधान म्हणूनही कार्यरत आहेत.