कर्ले गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई
पाण्यासाठी नागरिकांना करावी लागतेय भटकंती : ग्रामपंचायतीमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा : ग्रा. पं.ने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
वार्ताहर/किणये
सध्या तालुक्यात जोरदार मान्सूनला सुरुवात झाली आहे. अनेक गावांतील पाण्याची समस्या मिटली आहे. मात्र तालुक्याच्या पश्चिम भागातील कर्ले गावात गेल्या आठ दिवसापासून पाणी नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. गावात पाणीपुरवठा सुरळीत केला जात नाही. याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. गावातील पाणी समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्यांशी फोनद्वारे चौकशी करून माहिती घेतली असता त्यांनी असे सांगितले की, गावात पाणीपुरवठा होत नसल्याने एका कूपनलिकेचे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मात्र गेल्या दोन दिवसापासून आम्ही टँकरमधून ग्रामपंचायतीद्वारे पाणीपुरवठा करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
नळांना पाणी येत नसल्याने नागरिक वैतागले
माणसाच्या आयुष्यातील पाणी हा मुख्य घटक आहे. पाणी हेच जीवन मानले जाते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणसाच्या आयुष्यात पाणी पाहिजेच असते. मात्र कर्ले गावात पाणी येत नसल्यामुळे नागरिक अक्षरश: वैतागले आहेत. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. काही ठिकाणी सार्वजनिक नळ आहेत तर काही गल्ल्यांमध्ये घरगुती नळ बसवण्यात आली आहेत. मात्र या नळांना पाणी येत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. गावातील रवळनाथ मंदिराजवळ जलजीवन योजना राबविण्यात आली. मात्र ती पूर्णपणे ठप्प झाली आहे. या जलजीवन योजनेचे पाणीच आम्हाला मिळाले नाही. केवळ कागदासाठी आणि पैशांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
कूपनलिकांमध्ये बिघाड
रवळनाथ मंदिराच्या बाजूला असलेल्या एका झऱ्याचे पाणी गावासाठी पुरवण्यात येते. ते पाणी दोन टाक्यांमध्ये सोडले जाते आणि त्या टाक्यांच्या माध्यमातून गावात पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्यात या कूपनलिकेचे पाणी कमी पडते. त्यामुळे गावातीलच एका व्यक्तीच्या कूपनलिकेचे पाणी गावासाठी वापरण्यात येत होते. आणि हे पाणी गेल्या एक वर्षापासून वापरण्यात येत होते. मात्र त्या कूपनलिकांमध्ये काही बिघाड झाला असेल. त्यामुळे गेल्या 8 दिवसापासून गावात पाणीपुरवठा होत नाही. यामुळे आता कर्ले गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टचाई निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यायला हवा
आमच्या गावात गेल्या आठ दिवसापासून पाणीपुरवठा सुरळीत नाही. त्यामुळे पाण्यासाठी महिलांना आजूबाजूला असलेल्या शेत शिवारातील कूपनलिका व विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. लांबून पाणी आणावे लागत आहे. तसेच कदाचित नळाला पाणी आले तर केवळ एकच हंडा किंवा दोन हंडे पाणी मिळत आहे. त्यामुळे पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतचे याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. नागरी सुविधा पुरवण्यासाठी व गावच्या लोकांना पाणी देण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यायला हवा. तसेच गावात कूपनलिकांची खोदाई करावी.
- विठ्ठल देसाई
