सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची कमतरता
रुग्णांच्या संख्येत भर, पीजी डॉक्टरांकडून सेवा
बेळगाव : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमी होत असून कर्मचाऱ्यांची कमतरता भासते आहे. त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होतो आहे. उपलब्ध माहितीनुसार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 240 डॉक्टरांच्या भरतीसाठी सरकारची मंजुरी मिळाली आहे. प्रत्यक्षात सध्या 170 डॉक्टर कार्यरत असून 40 डॉक्टरांची कमतरता आहे. याचा परिणाम रुग्णसेवेवर होत असून रुग्णसंख्येत मात्र दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कोरोनापूर्वी उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या रोज 600 ते 700 इतकी होती. आता दीड हजार ते दोन हजार रुग्ण रोज उपचारासाठी येत आहेत.
1 हजार 40 खाटांच्या या इस्पितळात 950 हून अधिक बेड नेहमी फुल असतात. उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे बेड पुरत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढती आहे. नोकरीसाठी या इस्पितळात येणाऱ्या डॉक्टरांची संख्या कमी झाली आहे. कोणी यासाठी पुढे येत नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच गैरसोयीत भर पडली आहे. गेल्या सोळा वर्षांपासून बिम्समध्ये पदव्युत्तर विभाग नव्हते. आता 68 पीजीचे विद्यार्थी आहेत. उपचारासाठी सध्या त्यांचा उपयोग केला जात आहे. डॉक्टरांची कमतरता सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे, अशी माहिती बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांनी दिली.