For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओल्या चाऱ्याची टंचाई...सुक्या चाऱ्याचा भाव गगनाला...!

01:58 PM Mar 14, 2024 IST | Abhijeet Khandekar
ओल्या चाऱ्याची टंचाई   सुक्या चाऱ्याचा भाव गगनाला
Kolhapur news
Advertisement

अनिल पाटील सरूड

शाहूवाडी तालुक्यात ऊस तोडणी हंगाम संपल्याने ओल्या चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. ओल्या चाऱ्याच्या टंचाईमुळे जनावरांसाठी सुक्या चाऱ्याच्या मागणीत वाढ होऊ लागल्याने सुक्या चाऱ्याचा भाव गगनाला भिडला आहे.

Advertisement

तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतीबरोबरच दुग्धोत्पादन हा शेतीपूरक प्रमुख व्यवसाय आहे. शेतीतील वाढत्या उत्पादन खर्चामुळे तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे सध्या शेतकऱ्यांना शेतीव्यवसाय परवडत नाही. परिणामी, बहुंतांश शेतकरी जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळला आहे. मोठ्या शेतकऱ्यांसह छोटे शेतकरी तसेच शेतमजूरही दुग्ध व्यवसायावरच कुटुबांच्या गाडा चालवत आहेत. त्यामुळे तालुक्यात दुभत्या जनावरांची संख्या जास्त आहे.

तालुक्यात साडेतीन महिन्यांपूर्वी ऊस तोडणी हंगाम सुरु झाल्यानंतर जनावरांच्या चाऱ्यासाठी तुटलेल्या ऊसाचे वाडे मुबलक उपलब्ध होत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना ओल्या चाऱ्याची कमतरता भासली नाही. सध्या मात्र ऊस तोडणी हंगाम संपल्याने जनावरांसाठी ओल्या चाऱ्याची टंचाई जाणवू लागली आहे. ऊसाचा पाला व मका पडक काढणी योग्य होईपर्यंत पुढील महिनाभर तरी तालुक्यात ओल्या चाऱ्याची कमतरता राहणार आहे. याला पर्याय म्हणून शेतकरी सुक्या चाऱ्याकडे वळला आहे.

Advertisement

गवत, भाताचे पिंजार, शाळूचा कडबा, कडबाकुट्टी आदी सुका चारा खरेदी करू लागला आहे. परिणामी, सुक्या चाऱ्याची मागणी वाढल्याने त्याच्या किमतीही वाढल्या आहेत. सुका चारा जाग्यावर खरेदी करावयाचा झाल्यास गवताची पेंडी सरासरी 4ते 5 रुपये तर शाळू कडब्याची पेंडी 30 ते 35 रुपयें, कडबा कुट्टी 15 ते 20 रुपये प्रति किलो आहे. भाताच्या पिंजराच्या एका ट्रॉलीची किंमत अडीच ते तीन हजार रूपयांइतकी आहे. ओल्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना सुक्या चाऱ्यासाठी मागेल तेवढी किंमत देऊन जनावरांसाठी चारा खरेदी करावा लागत आहे.

गवत कापणीस मजुरांची टंचाई
अनेक शेतकऱ्यांची डोंगरावरील गवताची मजुराअभावी कापणी झालेली नाही. त्यामुळे डोंगरावर अजूनही गवत शिल्लक आहे. पहिल्यासारखे मजूर मिळत नसल्याने मजुरीत दुप्पट वाढ झाल्याचा परिणाम गवत दर वाढीवर झाला आहे.
अगोदरच खाद्यांचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या भेडसावणारी ओल्या व सुक्या चाऱ्याची टंचाई व गतवर्षीपेक्षा या चाऱ्याच्या दरात दुपटीने झालेल्या वाढीमुळे दुग्ध व्यवसायाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. चारा टंचाईमुळे दुध उत्पादनात घट होऊ लागल्याने उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालणे अवघड झाले आहे.

तात्यासो कदम, दुग्ध उत्पादक शेतकरी सरुड

शाहूवाडी तालुक्यातील पशुधन
तालुक्यात गाय वर्ग : 17 हजार 665
म्हैस वर्ग : 47 हजार 295,
एकुण पाळीव जनावरे : 64960

Advertisement
Tags :

.