प्रशासनाच्या अटींवर बोगद्यातील लघु वाहतूक सुरू
किनारपट्टीवासियांकडून समाधान : 8 ऑक्टोबरला थर्ड पार्टीकडून पुन्हा एकदा बोगद्यांची पाहणी
कारवार : अनेक वाद विवाद आरोप-प्रत्यारोप बैठका, चर्चा आणि आंदोलनानंतर शेवटी येथील राष्ट्रीय हमरस्ता क्रमांकवरील चार बोगदे अटींवर लघु वाहनांच्या वाहतुकीसाठी जिल्हा प्रशासनाने खुले केले. त्यामुळे किनारपट्टीवासियांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वरील कारवार आणि बिणगा दरम्यानचे चार बोगदे याचवर्षी वाहतुकीसाठी खुले केले होते. जुलै महिन्यात किनारपट्टीवर झालेल्या अतिवृष्टीमुळे बोगद्यामध्ये गळती दिसून आली होती. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य यांच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाने बोगद्यातून होणारी वाहतूक बंद केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने आयआरबी या बांधकाम कंपनीकडे बोगदा सुरक्षितता पत्राची मागणी केली होती. सदर कंपनीने फीटनेस सर्टीफिकेट दिले होते. तरीसुद्धा बोगद्यातून होणारी वाहतूक बंद ठेवली होती. त्यामुळे सत्तारूढ पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी दरम्यान आरोप-प्रत्यारोप झाले होते. आणि बोगदे वाहतुकीसाठी खुले करण्याची मागणी होत होती.
तरीसुद्धा जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली झाल्या नव्हत्या. शेवटी कारवार जिल्ह्याचे विधान परिषद सदस्य गणपती उळवेकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 29 सप्टेंबरला बोगद्यांच्या प्रवेशद्वारासमोर उग्र आंदोलन छेडण्यात आले होते. त्यावेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊन आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते. शेवटी जिल्हा प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली आणि दोन तीन दिवसात बोगद्यातील वाहतूक खुली करण्यात येईल, असे ठोस आश्वासन दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशसनाने सद्याला तरी लघु वाहनासाठी बोगदे वाहतुकीसाठी अटींवर खुले केले आहे. दरम्यान 8 ऑक्टोबर रोजी थर्ड पार्टीकडून पुन्हा एकदा बोगद्यांची पाहणी करण्यात येणार आहे. नियोजित पाहणीवेळी राष्ट्रीय हमरस्ता प्राधिकारच्या आणि आयआरबी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सक्तीने हजर राहिले पाहिजे, अशी अट घालण्यात आली आहे.