दुकानदारांशिवाय चालतात दुकाने
होत नाही चोरीची एकही घटना
भारत हा अनोखा देश आहे. देशाच्या प्रत्येक शहर आणि राज्यात तुम्हाला कुठली तरी अशी गोष्ट दिसून येईल, जी पाहून तुम्हाला देश अद्भूत असल्याची जाणीव होते. भारतातील एका राज्यात दुकाने तर आहेत, परंतु त्यात दुकानदार नसतात. तरीही तेथे सामग्रीची कधीच चोरी होत नाही.
मिझोरामच्या ऐझोलपासून काही किलोमीटर अंतरावर छोटे शहर असून त्याचे नाव सेलिंग आहे. या शहरात ‘नगाह लोउ ड्वार कल्चर’ नावाच्या एका प्रथेचे पालन केले जाते. ज्याच्या अंर्तत महामार्ग, रस्त्याच्या कडेला छोटी दुकाने तयार केली जातात, परंतु त्या दुकानांमध्ये कुठलाच दुकानदार नसतो. याद्वारे येथील लोक केवळ सामग्रीच नव्हे तर ज्ञानही वाटत असतात.
या दुकानांची चर्चा सोशल मीडियावर वारंवार होत असते. दुकाने विश्वासाच्या आधारावर चालतात आणि लोक परस्परांमध्ये विश्वासाची भावना जागवू इच्छितात. या दुकानांमध्ये फळे, भाज्या, मासे इत्यादी खाद्यपदार्थ विकतात. या सामग्रीच्या बाजूला दर लिहिलेला असतो, खरेदीदाराने दुकानात ठेवलेल्या पिशवीत पैसे ठेवून सामग्री नेणे अपेक्षित असते.
ही दुकाने चालविणारे लोक गरीब शेतकरी असतात, त्यांना स्वतःचे घर चालविण्यासाठी शेती करावी लागते. अशा स्थितीत ते दुकानावर बसून राहिल्यास शेती करण्यासाठी त्यांच्याकडे वेळच उरणार नाही. याचमुळे या दुकानांमध्ये कुणीच बसून राहिलेला नसतो. एकीकडे आता लोकांना स्वतःच्या घरातही सीसीटीव्ही लावावे लागत आहेत. अशा स्थितीत या दुकानांकडे पाहून जगात आजही प्रामाणिक लोक आहेत याची प्रचिती येते.