बाजारपेठेत खरेदीला उधाण
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची मोठी गर्दी
बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे खरेदीला उधाण आले असून नागरिक बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. रविवारी सुटीचा दिवस असल्याने गणपत गल्ली, पांगुळ गल्लीतील बाजारपेठेत नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. सजावटीसह गणरायाच्या स्वागतासाठी विविध साहित्य खरेदीला उधाण आल्याचे पहावयास मिळाले. गणेशोत्सव तोंडावर आल्याने विविध साहित्यांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. fिंवविध सजावटीचे साहित्य, रंगीबेरंगी तोरण, मकर, विविध प्रकारचे हार, आसन, रुद्राक्ष माळ, रडिमेड फेटा, फोममधील विविध आकर्षक सजावट, रेडिमेड फुलांचे हार आदी साहित्यांची नागरिकांकडून व्यापाऱ्यांकडे मागणी होत होती. व्यापारीही नागरिकांच्या मागणीनुसार सर्व साहित्य पुरवत असल्याचेही पहावयास मिळाले. गणपत गल्ली व पांगुळ गल्ली येथे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठी गर्दी असते. यामुळे वाहन बाजारपेठेत नेणे मुश्कील असते. मात्र व्यापाऱ्यांनी आधीच सर्व सज्जता ठेवल्याने त्यांना अडचणी निर्माण झाल्या नाहीत. तसेच बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने दुचाकीस्वारांना समस्या आल्या होत्या. दुचाकीस्वारही मिळेल त्या जागी आपली दुचाकी पार्क करून खरेदी केल्याचे दिसून आले. चौथा शनिवार व रविवार असे दोन दिवस सुटी असल्याने नागरिक सकाळपासूनच खरेदीला बाहेर पडले होते. ग्रामीण भागातील काही नागरिक आपापल्या वाहनाने तर काही नागरिक मिळेल वाहनाने खरेदीसाठी शहरात दाखल झाले होते. पावसाने उसंत घेतल्याने बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत.