बाजारपेठेत खरेदीची धूम
आकाशदिवे, पणत्या, सजावटीच्या वस्तूंना मोठी मागणी : सोने खरेदीला तेजी
प्रतिनिधी/ बेळगाव
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत शनिवारी दिवसभर गर्दीचा ओघ वाढता राहिला. वस्त्रप्रावरणे, सोने, सजावटीच्या वस्तू, आकाशदिवे, पणत्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी उसळली होती. वस्त्रप्रावरणाच्या दुकानांमध्ये तर दुपारनंतर लांबचलांब रांगा लागल्या. ज्या दुकानांमध्ये विशेष सवलत, गिफ्ट जाहीर करण्यात आल्या आहेत, त्या दुकानांमध्ये तुडुंब गर्दी झाली होती. शहरातील मोठ्या शोरूम्सपासून लहान दुकानांमध्ये गर्दीचा ओघ कायम होता. शिवाय रस्त्यावरील विक्रेत्यांकडेसुद्धा खरेदी सुरू असल्याचे पहायला मिळाले. आज रविवारीही सुट्टीचा दिवस असल्याने बाजारपेठेत प्रचंड गर्दी होणार आहे
सोने महागले तरी सोन्याच्या दागिन्यांच्या शोरुम्समध्ये, पेढ्यांमध्ये सोने खरेदीसाठी झुंबड उडाली होती. दिवाळी आणि लग्नसराई यामुळे सोने खरेदी तेजीत झाली. अर्थात सराफी बाजारपेठांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. चांदीच्या दागिन्यांनाही मागणी होती. लग्नसराई व सण म्हणून सोने खरेदी झाली तरी गुंतवणूक म्हणूनही सोन्याची खरेदी करण्यात आली. दरम्यान बाजारपेठेमध्ये पूजेसाठी लागणारी फळे, कारीट, आंब्याची पाने, शेवंती, झेंडूची फुले यांची आवक वाढली असून ठिकठिकाणी ग्रामीण भागातील विक्रेते हे साहित्य घेऊन बसले आहेत. याशिवाय आकाशदिवे, पणत्या, रांगोळ्या, तोरण, रांगोळीचे छाप, विद्युतमाळा यांचीही खरेदी झाली. बेळगावमध्ये गोव्यातील ग्राहकही खरेदीसाठी येत असल्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नेहमीपेक्षा दुप्पटीने गर्दी वाढली. अर्थात दिवाळीचे महत्त्वचं तसे असल्याने प्रत्येकजण आपल्या मनाजोगती खरेदी करण्यात मग्न होतात.
बाजारपेठेत कोट्यावधींची उलाढाल
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाला उधाण आले आहे. गेल्या चार दिवसांत सर्वत्र सजावटीचे साहित्य, किल्ल्यांवरील सैनिक, कपडे खरेदी या माध्यमातून आतापर्यंत कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली आहे. तसेच साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या बलिप्रतिपदा अर्थात पाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी नवीन वस्तू, वाहन, सोने खरेदीचे नियोजनही करण्यात आले आहे.
वसुबारस, धनत्रयोदशी उत्साहात
शुक्रवारी वसुबारस तसेच शनिवारी धनत्रयोदशी सर्वत्र उत्साहात साजरी झाली. आता सोमवारी नरक चतुर्दशी असून मंगळवारी सायंकाळी लक्ष्मीपूजन होणार आहे. वसुबारसने दिवाळीला सुरुवात झाली. घरे, दुकाने, कार्यालये आकाशदिवे तसेच विद्युत रोषणाईने उजळून गेली आहेत. घरांसमोर आकर्षक रांगोळ्या काढलेल्या दिसत आहेत. एकूणच यंदाच्या दिवाळीत सर्वत्र उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे.
लक्ष्मीपूजनाची लगबग
दरवर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजनाचे महत्त्व आहे. मंगळवारी सायंकाळी सहानंतर घरोघरी तसेच दुकांनामध्ये लक्ष्मीपूजन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपूजनाचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे.
वाहतुकीची कोंडी
बाजरपेठेतील गर्दीमुळे सातत्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा सामनाही करावा लागला. ही वाहतूक कोंडी नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक उडाली. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी गणपत गल्लीच्या प्रवेशापाशी तसेच धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, यंदे खूट येथेही बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केला होता.