लक्ष्मीपूजनाच्या खरेदीची धामधूम
झेंडू, ऊस, खातेकीर्द वह्यांची मागणी वाढली : फटाक्यांची खरेदी
बेळगाव : दीपोत्सवाला सुरुवात झाली असून मंगळवारी लक्ष्मीपूजन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पूजेच्या साहित्याने बाजारपेठ फुलल्याचे दिसून आले. विशेषत: लाल-पिवळ्या रंगांच्या झेंडूंनी बाजारपेठ सजली होती. त्याचबरोबर ऊस, केळी, पूजेचे साहित्य खरेदीसाठीची लगबग दिसून आली. वसुबारसपासून दिवाळीला प्रारंभ झाला. सोमवारी नरकचतुर्दशीचे अभ्यंगस्नान करण्यात आले. मंगळवारी लक्ष्मीपूजन केले जाणार आहे. दुकाने, कार्यालये, कारखान्यांमध्ये लक्ष्मीपूजन होणार असल्याने सोमवारी दुपारनंतर खरेदीसाठी बेळगाव बाजारपेठेत गर्दी झाली होती. नारळ, अगरबत्ती, कापूर, लक्ष्मीदेवीच्या चांदीच्या मूर्ती, तोरण, फळे-फुले, ऊस आदींची खरेदी केली जात होती. पूजेसाठी लागणारे बत्तासे ठिकठिकाणी विक्री केले जात होते.
पूजेसाठी लागणारी पाच फळे, ऊस, झेंडूची फुले, केळी, कोहळे, केळीची पाने यासह इतर साहित्य विक्री केले जात होते. दिवाळीच्या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचा समजला जातो तो झेंडू.त्यामुळे शहरासह उपनगरांमध्ये ठिकठिकाणी विविध रंगांमधील झेंडू दिसून आला. झेंडूच्या माळांबरोबरच फुले वजनावरदेखील विक्री केली जात होती. त्याचबरोबर फटाक्यांची आतषबाजी करण्यासाठी फटाक्यांची खरेदी केली जात होती. सोमवारी शासकीय सुटी असल्यामुळे नोकरदार मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाजारात दाखल झाले होते. बाजारपेठेमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्याचबरोबर मंगळवारी होणाऱ्या लक्ष्मीपूजनासाठी दुकानांची साफसफाई करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी व्यापारीवर्गाची धामधूम दिसून आली.