तुळशी विवाहानिमित्त खरेदीला जोर
बेळगाव : शनिवार व रविवारी कार्तिक एकादशी साजरी झाल्यानंतर सोमवारपासून (दि. 3) तुळशी विवाहाला सुऊवात होणार आहे. तुळशी विवाहाच्या निमित्ताने ऊस, झेंडुची फुले, फूलमाळा, आवळा, चिंच, सौभाग्यवायन यासारखे साहित्य मागील दोन दिवसांपासून बाजारपेठेत दाखल झाले असून खरेदी जोरात सुरू आहे. शहरातील काकतीवेस, शनिवार खूट, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, नरगुंदकर भावे चौक, शनिमंदिर रोड, भेंडीबाजार आदी स्थळांवर तुळशी विवाहासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. रविवारी सुटीचा दिवस व पावसानेही उघड़ीप दिल्याने बाजारपेठेत सायंकाळी अधिक गर्दी झाली होती. बुधवारी (ता. 5) कार्तिक पौर्णिमा असून शहापूर परिसरात पौर्णिमेला व्यापारी, दुकानदारांकडून लक्ष्मीपूजन होत असते. येथील व्यापाऱ्य़ांनी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आस्थापनांची स्वच्छता, रंगरंगोटी चालविली आहे. शहापुरातील बाजारपेठेतही तुळशी विवाह व लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य दाखल झाले आहे.