स्वातंत्र्य दिनासाठी खादीचे कपडे खरेदी करा!
पंतप्रधानांची ‘मन की बात’: 15 ऑगस्टच्या भाषणासाठी विषय-मुद्दे पाठविण्याचीही सूचना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर ‘मन की बात’ कार्यक्रमाचा 112 वा भाग रविवारी पहिल्यांदाच प्रसारित झाला. यामध्ये पंतप्रधान मोदींनी पॅरिस ऑलिम्पिक, मॅथ्स ऑलिम्पियाड, आसाम मोईदम, टायगर डे, जंगलांचे संवर्धन आणि स्वातंत्र्य दिनावर भाषण केले. तसेच हातमागावरील कपड्यांबाबत चर्चा करत येत्या स्वातंत्र्य दिनासाठी हातमागावर तयार करण्यात आलेल्या खादीच्या कपड्यांची खरेदी करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले. दरवषी 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जातो. या दिवसाचे उचित औचित्य देशवासियांनी साधावे असे पंतप्रधान म्हणाले. तसेच 15 ऑगस्टच्या भाषणासाठी विविध विषयांवरही पंतप्रधानांनी सूचना मागवल्या.
मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी गणित ऑलिम्पियाड विजेत्यांशी संवाद साधला. यावषी इंग्लंडमध्ये 65 व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भारतातील 6 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या ऑलिम्पियाडमध्ये भारताने 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकले. मन की बात कार्यक्रमात मोदींनी चार विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या यशामागील गुपिते उलगडण्याचा प्रयत्न केला.
आसाम मोईदममधील अहोम राजघराण्याची दफनभूमी 26 जुलै रोजी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आली. सांस्कृतिक श्रेणीमध्ये समाविष्ट असलेले मोईदम हे भारतातील 43 वे वारसास्थळ आहे. मोईदममध्ये अहोम राजे, राण्या आणि श्रेष्ठांची स्मारके आहेत. हेरिटेज साइट झाल्यानंतर येथे अधिक पर्यटक येतील. भविष्यात तुम्हीही इथे यावे. आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगूनच देश प्रगती करू शकतो, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
व्याघ्र संवर्धनावरही मार्गदर्शन
वाघांच्या संवर्धनाबाबतही पंतप्रधानांनी भाष्य केले. जगभरात व्याघ्र दिन दिमाखात साजरा केला जातो. भारतात वाघ हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. आम्ही कथा ऐकल्या आहेत. जंगलाच्या आजूबाजूचे लोक वाघासोबत राहतात. वाघांच्या संवर्धनासाठी अभूतपूर्व प्रयत्न केले जात आहेत. राजस्थानमध्ये ‘कुऱ्हाडी बंद’ पंचायत मोहीमेवर काम केले जात आहे. कुऱ्हाड घेऊन न जाण्याची, झाड न तोडण्याची शपथ स्थानिकांनी घेतली आहे. त्यामुळे वाघांसाठी वातावरण तयार होत आहे. जगातील सुमारे 70 टक्के वाघ आपल्या देशात आहेत, असे दाखले पंतप्रधानांनी दिले.
खादीचा अभिमान बाळगा!
हातमागाकडे जग आकर्षित होत आहे. अनेक कंपन्या ‘एआय’च्या माध्यमातून याचा प्रचार करत आहेत. हातमाग कपड्यांना आता खूप मागणी वाढत आहे. खादी व्यवसाय 400 टक्क्मयांनी वाढून 1.5 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तुमच्याकडे भरपूर कपडे असतील. तरीही स्वातंत्र्य दिनानिमित्त खादीचे कापड नक्कीच खरेदी करा, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
हर घर तिरंगा मोहीम
स्वातंत्र्यदिनाचा सोहळा आता केवळ दोन आठवड्यांवर राहिला आहे. हा दिवस आता ‘हर घर तिरंगा’ मोहीमेशी जोडलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून गरीब-श्रीमंत प्रत्येकजण या मोहीमेशी जोडला गेला आहे. लोक तिरंग्यासोबत सेल्फी पोस्ट करत आहेत. आता त्यात विविध प्रकारचे नवनवीन बदल होऊ लागले आहेत. आता कार आणि ऑफिसमध्ये तिरंगा झेंडे लावले जातात. पूर्वीप्रमाणेच याही वषी तिरंगा डॉट कॉमवर प्रत्येक घरात तिरंगासोबत सेल्फी अपलोड करा, असेही मोदी पुढे म्हणाले.