कांदोळी येथे आगीत दुकान जळून खाक
दाम्पत्य जखमी; सुमारे 8 लाखाची हानी : दुकानातील दोन गॅस सिलिंडरचा स्फोट
म्हापसा : कांदोळी सेबेस्तियानवाडा येथील पॅरी जनरल स्टोअरला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत परेरा कुटुंबीयांचे भुसारी दुकान जळून खाक झाले. आग लागताच दुकानातील दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत वृद्ध दुकान मालक दाम्पत्य किरकोळ जखमी झाले. आगीत अंदाजे 8 लाख ऊपयांपेक्षा जास्त मालमत्तेची हानी झाली. पिळर्ण अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. दुकान रस्त्याच्या बाजूलाच असल्याने काही काळ वाहतूक खोळंबली. ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी 11.52 च्या सुमारास घडली. लॉरेन्स परेरा (68) व इस्बिन परेरा (62) अशी जखमी दाम्पत्याची नावे आहेत. दुकानातील वीज उपकरणांमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. ही आग विझवण्याच्या प्रयत्नात वृद्ध परेरा दाम्पत्य जखमी झाले. आग विझवत असतानाच दुकानातील दोन गॅस सिलिंडरचा भडका उडाला आणि आगीने संपूर्ण दुकान वेढले. मिळालेल्या माहितीनुसार हे दाम्पत्य दुकानात काहीतरी शिजवत असतानाच ही आग लागली असल्याचे सांगण्यात आले. त्यात आगीचा भडका उडाला व आग सर्वत्र पसरली.