विश्वचषक नेमबाजी : तिसरा टप्पा आजपासून
इलावेनिलच्या कामगिरीवर लक्ष, तीन भारतीय नेमबाजांचे पदार्पण
वृत्तसंस्था / म्युनिच
आयएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेला येथे मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत भारताचे तीन नेमबाज पहिल्यांदाच आपला सहभाग दर्शवित आहेत. त्याच प्रमाणे महिला नेमबाज इलाव्हेनिल व्हॅलेरव्हेन हिच्या कामगिरीवर लक्ष लागले आहे.
या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पुरुष आणि महिलांच्या विभागातील 10 मी. एअर रायफल नेमबाजी प्रकाराची अंतिम फेरी होईल. 2025 च्या नेमबाजी हंगामातील ही तिसरी विश्वचषक नेमबाजी स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी अखिल भारतीय रायफल संघटनेने 22 सदस्यांचा संघ पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दुहेरी ऑलिम्पिक विजेती मनु भाकर आणि किरण जाधव यांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारताचे हे दोन्ही अव्वल नेमबाज वैयक्तिक गटात भाग घेणार आहेत. मंगळवारी या स्पर्धेत 10 नेमबाज क्रीडा प्रकारापैकी 4 क्रीडा प्रकारांतील बाद फेरी आणि पात्रता फेऱ्या होतील.
या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी नेमबाजीच्या दोन क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकासाठी लढती होतील. भारताचे तीन नेमबाज पहिल्यांदाच या स्पर्धेच्या माध्यमातून विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आपले पदार्पण करीत आहेत. महिलांच्या विभागात राष्ट्रीय विजेती अनन्या नायडू तर पुरुष विभागात आदित्य मालरा आणि निशांत रावत यांचा समावेश आहे. त्याच प्रमाणे आर्या बोरसे महिलांच्या एअर रायफल नेमबाजीत सहभागी होत आहे. बोरसेने अलिकडच्या कालावधीत आपल्या कामगिरीत सातत्य राखल्याने तिच्याकडून पदकाची अपेक्षा बाळगली जात आहे. ब्युनोस आयरिस आणि लिमा येथे झालेल्या आयएसएसएफच्या पहिल्या दोन विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आर्या बोरसेने वैयक्तिक गटात अंतिम फेरी गाठली तर मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात दोन रौप्य पदके मिळविली आहेत. यापूर्वी दोनवेळा विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या इलाव्हेनिल त्याच प्रमाणे आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेतील विजेत्या तसेच चारवेळा विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील पदक विजेत्या वरुण तोमर यांच्याकडून या स्पर्धेत भारताला पदकाची अपेक्षा आहे. सोमवारी भारतीय नेमबाजांनी चांगलाच सराव केला असून या स्पर्धेपूर्वी राष्ट्रीय रायफल प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांचे मार्गदर्शनही भारतीय नेमबाजांना मिळाले आहे. आयएसएसएफच्या पहिल्या दोन विश्चषक स्पर्धा द. अमेरिकेत झाल्या होत्या तर ही तिसरी स्पर्धा जर्मनीमध्ये होत आहे. या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व भारतीय नेमबाज पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे राष्ट्रीय नेमबाज प्रशिक्षक समरेश जंग यांनी म्हटले आहे.
महिलांच्या 50 मी. रायफल थ्री पोझिशन या क्रीडा प्रकारात चीनच्या विद्यमान विश्वविजेत्या हेन जियायु तसेच ऑलिम्पिक चॅम्पियन स्वीसची चेरा लिओनी, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्य पदक विजेती सॅगेन मॅडेलिना आणि नॉर्वेची हेग या अव्वल नेमबाजांमध्ये पदकासाठी चुरस राहिल. पुरुषांच्या एअर पिस्तुल नेमबाजीत चीनचा विद्यमान ऑलिम्पिक विजेता यु, इटलीचा माल्डिनी आणि जर्मनीचा ख्रिस्टेन रिझ, जर्मनीचा मिकेक तसेच कोरियाचा वोनहो यांचा सहभाग आहे. पुरुषांच्या पिस्तुल नेमबाजीत एकूण विविध देशांचे 135 नेमबाजांमध्ये 117 पदक विजेत्यांमध्ये चुरस राहिल.