डेहराडुनमध्ये नेमबाजी चाचणी जूनअखेरीस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रायफल व पिस्तुल इव्हेंटसाठी गट अ नेमबाजांची राष्ट्रीय निवड चाचणी 3 व 4 जून 24 ते 30 या कालावधीत डेहराडून येथे आयोजित करण्यात आली असल्याचे भारतीय नेमबाजी फेडरेशनने मंगळवारी सांगितले.
त्रिशुल शूटिंग रेंजवर या निवडचाचणी घेतल्या जातील. येत्या ऑगस्टमध्ये कझाकस्तानमध्ये 16 वी आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप व या वर्षाच्या उत्तरार्धात चीन व इजिप्तमध्ये होणाऱ्या आयएसएसएफ वर्ल्ड कपसाठी या निवडचाचणी घेतल्या जाणार आहेत. दक्षिण अमेरिका आयएसएसएफ वर्ल्ड कप टूरवरील दोन टप्प्यात भारताच्या रायफल व पिस्तुल नेमबाजांनी आश्वासक कामगिरी केल्याने या अव्वल नेमबाजांची निवड चाचणी घेण्याचे ठरविण्यात आले.
अर्जेन्टिना व पेरू येथे झालेल्या दोन टप्प्यातील स्पर्धेत 32 भारतीय नेमबाजांनी अंतिम फेरी गाठली, त्यात मिश्र सांघिक पदकाच्या फेरीचाही समावेश आहे आणि भारताने 6 सुवर्णांसह एकूण 15 पदकांची कमाई केली. राष्ट्रीय रायफल संघटनेच्या निवडचाचणी निकषानुसार फक्त गट अ मधील पात्र नेमबाजांनाच भाग घेता येणार आहे. निवडचाचणी 3 व 4 मध्ये ऑलिम्पिकमधील सर्व रायफल व पिस्तुल प्रकारांचा समावेश असेल. त्यात अव्वल नेमबाजांनाच निवडले जाणार आहे. यात एकूण 50 स्लॉट्स 10 मी. एअर रायफल (पुरुष व महिला), 10 मी. एअर पिस्तुल (पुरुष व महिला), 30 स्लॉट्स 50 मी. रायफल 3 पी (पुरुष व महिला), 20 स्लॉट्स 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल (पुरुष), 30 स्लॉट्स 25 मी. स्पोर्ट्स पिस्तुल (महिला) यांच्यासाठी असतील.
चाचणीच्या पहिल्या दिवशी पात्रता फेरी व फायनल फेरी 10 मी. एअर रायफल पुरुषांसाठी, 25 मी. पिस्तुल महिलांसाठी, 50 मी. 3 पी महिलांसाठी, दुसऱ्या दिवशी पात्रता फेरी व अतिम फेरी याच प्रकारांसाठी होईल.