व्हाईट हाऊसजवळ गोळीबाराची घटना
अफगाण हल्लेखोराला अटक : दोन सुरक्षासैनिक जखमी
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात दोन राष्ट्रीय सुरक्षासैनिक जखमी झाले आहेत. या घटनेसंदर्भात एका अफगाण निर्वासिताला ताब्यात घेण्यात आले आहे. हल्ल्यातील संशयिताची ओळख पटली असून 29 वर्षीय रहमानउल्लाह लकनवाल याने हा गोळीबार केल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही दहशतवादी घटना घोषित केली आहे. संबंधित हल्लेखोराला या गोळीबाराची मोठी किंमत मोजावी लागेल असे जाहीर करतानाच त्यांनी अमेरिकेत अफगाण निर्वासितांच्या प्रवेशावर तात्काळ बंदी घालण्याची घोषणा केली आहे.
व्हाईट हाऊसजवळ गोळीबार करणारा रहमानउल्लाह लकनवाल हा ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानातून अमेरिकेत आला होता. त्याने 2024 मध्ये निर्वासित दर्जासाठी अर्ज केल्यानंतर 2025 मध्ये तो मंजूर झाला होता. शुक्रवारी झालेला हल्ला फरागुट वेस्ट मेट्रो स्टेशनजवळ अमेरिकन वेळेनुसार दुपारी 2:15 च्या सुमारास झाला. न्यूयॉर्क पोस्टनुसार, हल्लेखोराने प्रथम एका महिला रक्षकाच्या छातीत आणि नंतर डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्याने दुसऱ्या रक्षकावर गोळीबार केला. जवळच असलेल्या तिसऱ्या रक्षकाने लकनवालवर चार गोळ्या झाडत जखमी केले. त्यानंतर इतर सैनिकांनी त्याच्यावर ताबा मिळवत जखमी अवस्थेत रुग्णवाहिकेतून नेण्यात आले.
लकनवाल हा अफगाणिस्तानातील खोस्त प्रांतात वाढला. तो चार वर्षांपूर्वी अमेरिकेत आल्यापासून पत्नी आणि पाच मुलांसह वॉशिंग्टनमधील बेलिंगहॅम येथे राहत होता. अमेरिकेत येण्यापूर्वी लकनवालने 10 वर्षे अफगाण सैन्यात सेवा बजावली होती. तसेच सेवाकाळात त्याने अमेरिकन स्पेशल फोर्सेससोबतच्या मोहीमेतही सहभाग घेतला होता. त्याच्या लष्करी सेवेदरम्यान लकनवाल कंधारमधील एका तळावर तैनात होता. त्याठिकाणी तो अमेरिकन सैनिकांना मदत करत होता, अशी माहिती निकटवर्तीयांकडून उपलब्ध झाली आहे.