अमेरिकेच्या मॅनहटनमध्ये गोळीबार, 5 ठार
मृतांमध्ये पोलीस अधिकाऱ्याचा समावेश : हाय-प्रोफाइल इमारतीत गोळीबार
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील मिडटाउन मॅनहटनमध्ये सोमवारी संध्याकाळी एका ऑफिस इमारतीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेत कमीतकमी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक ऑफ-ड्युटी न्यूयॉर्क पोलीस अधिकारीही सामील आहे. तर गोळीबार करणाऱ्या आरोपीची ओळख पटली असून तो नेवादा येथील शेन तमुरा असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपीने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. त्याच्या मृतदेहाजवळून लास वेगासचे कन्सील्ड कॅरी परमिट हस्तगत झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मॅनहटनमध्ये गोळीबाराची घटना सोमवारी संध्याकाळी (स्थानिक प्रमाणवेळ) 6.30 वाजता पार्क एव्हेन्यूच्या एका हाय-प्रोफाइल इमारतीत घडली असून यात अमेरिकेच्या दिग्गज वित्तीय कंपन्या आणि एनएफएलची कार्यालये आहेत.
गोळीबारात मृत्युमुखी पडलेले पोलीस अधिकारी दिदारुल इस्लाम यांची पत्नी आणि परिवाराची न्यूयॉर्कचे महापौर एडम्स यांनी सोमवारी रात्री भेट घेतली आहे. महापौर एरिक एडम्स यांनी अधिकारी इस्लाम यांना नायक ठरविले आहे.
इस्लाम यांनी लोकांचा जीव वाचविण्यासाठी स्वत:चा जीव पणाला लावला, ते तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून पोलीस विभागात सेवा बजावत होते, ते या शहरावर प्रेम करत होते असे महापौर एडम्स यांनी म्हटले आहे. नॅशनल लॉ एन्फोर्समेंट ऑफिसर्स मेमोरियल फंडनुसार चालू वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये 43 पोलीस अधिकाऱ्यांचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाला आहे.
मृत अधिकारी मूळचा बांगलादेशचा
गोळीबारात मृत्युमुखी पडलेले 36 वर्षीय पोलीस अधिकारी दिदारुल इस्लाम हे बांगलादेशी स्थलांतरित होते. गोळीबाराच्या घटनेवेळी ते इमारतीत तैनात होते. अधिकारी इस्लाम यांची पत्नी गरोदर असून त्यांना दोन लहान मुलगे देखील आहेत. अधिकारी इस्लाम यांनी लोकांचा जीव वाचविण्यासाठी स्वत:ला धोक्यात टाकले होते. त्यांच्यावर निर्दयीपणे गोळी झाडण्यात आली होती. दिदारुल इस्लाम हे एक पेड सिक्युरिटी ड्युटीवर होते. म्हणजेच कंपनीकडून सुरक्षेसाठी खास स्वरुपात नियुक्त करण्यात आलेले ते अधिकारी होते, अशी माहिती न्यूयॉर्कच्या पोलीस आयुक्त जेसिका टिश यांनी दिली आहे.