अमेरिकेच्या लॉस एंजिलिसमध्ये गोळीबार, 3 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ लॉस एंजिलिस
अमेरिकेत नव्या वर्षात पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे. लॉस एंजिलिसमध्ये विविध ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या असून यात तीन जण मृत्युमुखी पडले आहेत. शहरातील एका व्यावसायिक भागात नववर्षानिमित्त आयोजित पार्टीत झालेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले तर 8 जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सोमवारी रात्री सुमारे एक वाजता गोळीबाराचा आवाज ऐकू आला होता. ज्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना लोक जीव वाचविण्यासाठी पळत असल्याचे दिसून आले होते. तसेच अनेक जण जखमी अवस्थेत असल्याचे आढळून आले होते. एक पुरुष आणि महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा गोळीबार पार्टीतील भांडणामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर सध्या कुठल्याही संशयिताबद्दल माहिती समोर आलेली नाही.
याचदरम्यान शहराच्या हॉथोर्न भागात झालेल्या गोळीबारात एक महिलेचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.