जेरूसलेममध्ये हमासच्या दहशतवाद्यांकडून गोळीबार
3 जणांचा मृत्यू : शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याचे इस्रायलचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ जेरूसलेम
इस्रायलची राजधानी जेरूसलेममध्ये गुरुवारी एका बसस्टॉपनजीक गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात 3 इस्रायली नागरिक मारले गेले आहेत. हमासच्या दोन दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याने घटनास्थळीच दोन जणांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. तर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत दोन्ही दहशतवादी मारले गेले आहेत.
या हल्ल्याची जबाबदारी हमासने स्वीकारली आहे. जेरूसलेममध्ये बसस्टॉपवर हल्ला करणारे पॅलेस्टिनी हमासचे सदस्य होते. दोघेही भाऊ होते, मुराद आणि इब्राहिम यांनी हा हल्ला घडवून आणला. 29 नोव्हेंबर रोजी वेस्ट बँकेत झालेल्या दोन मुलांच्या हत्येचा आम्ही सूड उगवला असल्याचे हमासकडून म्हटले गेले आहे. 29 नोव्हेंबर रोजी रात्री वेस्ट बँकेत छापे टाकताना इस्रायली सैनिकांनी केलेल्या गोळीबारात 9 वर्षीय अणि 15 वर्षीय मुलगा मारला गेला होता.
तर हमासने शस्त्रसंधीच्या 6 व्या दिवशी 13 वर्षीय गॅली तर्शांस्कीची मुक्तता केली आहे. दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर रोजी गॅलीच्या घराला आग लावून तिला आणि तिच्या वडिलांचे अपहरण केले होते.
इस्रायल-हमास यांच्यातील शस्त्रसंधी संपण्याच्या 8 मिनिटांपूर्वी 1 दिवसाने याची मुदत वाढविण्यात आली. इस्रायल आणि कतारच्या अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे. हमासने मुक्तता केल्या जाणाऱ्या 10 ओलिसांची यादी दिल्यावर इस्रायलने याला संमती दर्शविली आहे.
शस्त्रसंधी अंतर्गत हमास दर दिनी 10 ओलिसांची मुक्तता करणार आहे. याच्या बदल्यात इस्रायल 30 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणार आहे. शस्त्रसंधीच्या अन्य अटींवर अद्याप चर्चा सुरू असल्याचे इस्रायलच्या सैन्याकडून सांगण्यात आले. यापूर्वी शस्त्रसंधीच्या 6 व्या दिवशी हमासने 5 मुलांसमवेत एकूण 16 जणांची मुक्तता केली होती. प्रथम दोन रशियन-इस्रायली महिलांची मुक्तता करण्यात आली. मग 10 इस्रायली आणि 4 थाई नागरिकांना सोडण्यात आले. आयडीएफनुसार हमासकडे अद्याप 159 ओलीस आहेत. तर दुसरीकडे इस्रायलने सुमारे 30 पॅलेस्टिनींची मुक्तता केली असून यात 22 वर्षीय पॅलेस्टिनी कार्यकर्ती अहद तमीमी सामील आहे.