‘शोले’ची ‘पन्नाशी’ ! ‘शोले’
‘मिनर्व्हा’मध्ये ‘70 एमएम’ पडद्यावर ‘स्टिरिओफोनिक साऊंड’मध्ये झळकल्यानंतर पहिल्याच आठवड्यात मुंबईत चर्चा सुरू झाली होती ती चित्रपट पडल्याची. त्यामुळं खुद्द दिग्दर्शक रमेश सिप्पी नि त्यांची टीम देखील हादरून गेली...सलीम-जावेद यांच्या मते त्याचं प्रमुख कारण लपलं होतं ते सिनेमाच्या चार तास इतक्या लांबीत. त्यामुळं पहिला खेळ सकाळी 9 वा. सुरू व्हायचा, तर शेवटचा रात्री 2 वा. संपायचा...परंतु हा ‘पडेल शिक्का’ पुसून टाकण्यास फिल्मला वेळ लागला नाही अन् ‘माऊथ पब्लिसिटी’च्या जोरावर लोकांचं कुतूहल असं काही जागं झालं की, ‘शोले’ नुसता नावासारखा पडद्यावर धगधगू लागला, इतिहास घडवून गेला...गेल्या महिन्यात ‘शोले’नं 50 व्या वर्षात पदार्पण केलं. त्याच्याविषयी लिहिलं तितकं कमीच असलं, तरी यानिमित्तानं त्याच्या काही महत्त्वाच्या पैलूंवर टाकलेला हा प्रकाशझोत...
शोले...रमेश सिप्पी यांचा अजरामर चित्रपट...15 ऑगस्ट, 1975 या दिवशी तो पडद्यावर झळकला तेव्हा भारतीय सिनेमाच्या अन् खास करून हिंदी चित्रपट जगताच्या विश्वातील सर्वांत मोलाच्या टप्प्यांपैकी तो एक ठरेल याची कुणीही कल्पना देखील केलेली नसेल...पण बघता बघता या फिल्मनं असं काही गारूड केलं की, आज 50 व्या वर्षात प्रवेश केल्यानंतर सुद्धा सिनेरसिकांच्या मनावर त्याच्याकडून अधिराज्य गाजविणं तसूभरही कमी झालेलं नाहीये...
अनेक चित्रपटांवरून प्रभावित होऊन जुळविलेली पाश्चात्य शैलीतील कथानकाची ‘पर्फेक्ट’ भट्टी व दृष्यं, त्यावेळचा विचार करता तुफानी अॅक्शन, अजरामर संवाद, छोट्या-छोट्या भूमिकांत देखील कलाकारांचा जबरदस्त अभिनय, आर. डी. बर्मनचं ‘टायटल म्युझिक’सह प्रभावी संगीत अन् त्याहून अफलातून पार्श्वसंगीत तसंच मनात कायमची घर करून बसलेली पात्रं...मग तो अमिताभचा शांत ‘जय’, धर्मेंद्रचा उत्साह भरभरून वाहणारा ‘वीरू’, संजीव कुमारचा सुडानं पेटलेला ‘ठाकूर’ असो किंवा अमजद खानला इतिहासात स्थान देणारा क्रूर ‘गब्बर’, सतत वटवट करणारी हेमा मालिनीची ‘बसंती’, खदखदून हसविणारा जगदीपचा ‘सुरमा भोपाली’ वा ‘अंग्रेजो के जमाने’का जेलरच्या भूमिकेतील असरानी...
‘शोले’तील ‘जय’नं बसंतीला ‘वीरू’साठी मागणी घालण्याकरिता तिच्या आईची घेतलेली भेट असो वा वीरूला वाचविण्याच्या भरात ‘जय’नं मृत्यूला कवटाळण्याचा क्षण, ‘वीरू’नं बसंतीसाठी टाकीवर चढून केलेली ‘नौटंकी’ असो किंवा अखेरीस ‘हीरो’पेक्षा जास्त वजनदार ठरलेल्या गब्बर सिंगचा प्रख्यात ‘ओ सांबा’ संवादाचा प्रसंग...असे सीन नि त्यातील संवाद तोंडपाठ झालेले रसिक क्वचितच कुठल्याही चित्रपटाच्या बाबतीत आढळतील...म्हणून ‘शोले हा नुसता इतिहासाचा एक अध्याय नाही, तो स्वत:च एक इतिहास बनलाय !...
‘कास्टिंग’मागील रंगतदार कहाण्या...
‘शोले’च्या यशातील एक मोठा घटक म्हणजे त्याचं ‘कास्टिंग’, भूमिकांसाठी झालेली कलाकारांची चपखल निवड...पण इतिहासात डोकावून पाहिल्यास काही पात्रं रंगविलेल्या कलाकारांना भलत्याच भूमिकेची ओढ होती, तर काही कलाकारांच्या वाट्याला सुरुवातीला ती पात्रंच आलेली नव्हती...
? उदाहरणार्थ वीरूची भूमिका करणाऱ्या धर्मेंद्रला मुळात इच्छा होती ती संजीव कुमारनं रंगविलेला ठाकूर साकारण्याची...कथानकात ठाकूरच्या भूमिकेला अधिक महत्त्व लपलंय असं त्याला वाटत होतं. तथापि, तोवर धर्मेंद्र हेमा मालिनीच्या प्रेमात पडलेला असल्यानं तो वीरूची भूमिका करण्यास राजी झाला...
? खरं तर ‘शोले’च्या निर्मितीदरम्यान धर्मेंद्र आणि संजीव कुमार या दोघांवरही हेमा मालिनीची मोहिनी पडली होती. संजीव कुमारनं तिला ‘प्रपोज’ देखील केलं, पण तिनं प्रतिसाद दिला नाही...धर्मेंद्रनं ठाकूरची भूमिका रंगविण्याची इच्छा दिग्दर्शक रमेश सिप्पींकडे व्यक्त केल्यानंतर वीरूची भूमिका संजीव कुमारकडे जाईल अन् हेमा मालिनीसमवेत जोडी जमेल ती त्याची याचा त्याला साक्षात्कार झाला. मग त्यानं आपला पवित्रा फिरविण्यास जराही वेळ घेतला नाही...
? ‘ठाकूर’ नि ‘गब्बर’ या दोन्ही भूमिकांसाठी अनुक्रमे संजीव कुमार व अमजद खान ही पहिली पसंती नव्हती हे आता कुणाला खरं वाटणार नाही. पण सुऊवातीला ठाकूर रंगविण्यासाठी दिलीप कुमारशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र त्यांनी भूमिका नाकारली ती अनेक कलाकारांच्या फौजेत आपण हरवून जाणार असा विचार करून...तर ‘गब्बर’साठी सर्वांत आधी विचार करण्यात आला होता प्रेमनाथ यांचा. त्यानंतर डॅनीचं नाव पुढं आलं. परंतु त्याला ‘शोल’ करणं जमलं नाही. कारण डॅनीनं फिरोझ खानचा ‘धर्मात्मा’ आधीच स्वीकारला होता अन् त्याचं चित्रीकरण होणार होतं ते अफगाणिस्तानमध्ये...
म्हणून ‘जय’ आला अमिताभच्या वाट्याला...
अनेक अडथळ्यांचा सामना केलेली आणखी एक भूमिका ती जयची. तिथं आज अमिताभ बच्चनशिवाय इतर कोणाची कल्पनाही करणं शक्य नसलं, तरी ‘शोले’ हाती घेण्यात आला तेव्हा नुकताच अमिताभला ‘अँग्री यंग मॅन’ बनविणाऱ्या ‘जंजीर’ला रसिकानी उचलून धरलं होतं. या पार्श्वभूमीवर ‘जंजीर’प्रमाणंच ‘शोले’तील ‘जय’ची भूमिकाही गंभीर नि अबोल असल्यानं तो त्यात व्यवस्थित शोभेल असा विचार करून कथा-पटकथा-संवाद लेखकाची प्रख्यात जोडी सलीम-जावेदपैकी सलीम खान (सलमान खानचे वडील) यांनी त्याची निवड केली...पण ‘जंजीर’पूर्वी अमिताभच्या पडेल चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर रांग लागली होती. त्यामुळं वितरक त्याला ‘शोले’मध्ये झळकविण्यास फारसे इच्छुक नव्हते. मात्र सलीम नि धर्मेंद्र या दोघांचाही बच्चनवर विश्वास होता...
अमजद खानला असा मिळाला ‘गब्बर’...
? प्रत्येकानं गब्बरची भूमिका नाकारल्यानंतर सलीम-जावेद यांनी एखाद्या नवीन चेहऱ्याला त्या भूमिकेत बसविण्याचं ठरविलं आणि निवड केली ती चरित्र अभिनेता जयंत यांचा मुलगा अमजदची. रमेश सिप्पींच्या खार इथं असलेल्या कचेरीच्या कॉरिडॉरमध्येच अमजदची ‘क्रीन टेस्ट’ घेण्यात आली आणि त्याला हिरवा कंदील मिळून लगेच त्यानं चित्रीकरण चाललेल्या बेंगळूरच्या दिशेनं प्रस्थान केलं सुद्धा...
? मात्र पहिलं शेड्यूल संपल्यानंतर युनिट मुंबईला परतेपर्यंत चित्र पालटलं. काही लोकांनी आक्षेप घेतला तो अमजदच्या पातळ आवाजाला. त्यामुळं खलनायक म्हणून त्याचा ठसा उमटणार नाही नि गब्बरची व्यक्तिरेखा फिकी पडेल असं त्यांचं म्हणणं होतं...असं मत व्यक्त करणाऱ्यांची संख्या मोठी असल्यानं अमजदच्या हातून ही भूमिका निसटतेय की काय असं सलीम-जावेदना वाटू लागलं होतं. परंतु तसं घडलं नाही अन् ‘जो डर गया समझो वो मर गया’ म्हणणाऱ्या अमजदचा आवाज हाच अक्षरश: ‘मास्टर स्ट्रोक’ ठरला. अजूनही अंगावर काटा आणणारे त्या आवाजातील ‘डायलॉग’ कानात गुंजताहेत...
? ‘शोले’वर वास्तविक जीवनातील अनेक गोष्टींचा प्रभाव पडलाय. गब्बर हे देखील त्याचंच सणसणीत उदाहरण...चाळीसच्या दशकात गब्बर नावाच्या अतिशय खतरनाक दरोडेखोरानं धुमाकूळ घातला होता अन् तो चंबळच्या खोऱ्यात दरोडे टाकायचा. जे पोलीस त्याच्या तावडीत सापडत त्यांचं तो नाक कापायचा...तेच नाव चित्रपटातील खलनायकाला देण्याचं सलीम-जावेदनी ठरविलं...
प्रचंड मेहनत...
? रमेश सिप्पीनी ‘शोले’वर प्रचंड मेहनत घेतली अन् ती प्रत्येक सीनमध्ये जाणवते. त्यामुळंच तब्बल तीन वर्षं त्याचं चित्रीकरण चाललं...ज्या दृश्यात गब्बर ठाकूरच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या करतो तो चित्रीत करण्यासाठी 23 दिवस लागले...
? राधा दिवा विझवितेय अन् जय तिला हार्मोनिका वाजवताना पाहतोय हे दृष्य सूर्यास्त आणि रात्रीच्या दरम्यानचा काही मिनिटांचा तो परिपूर्ण क्षण पकडण्याच्या भरात रमेश सिप्पी नि छायाचित्रण करणारे द्वारका दिवेचा यांना चक्क 20 दिवस लागले...‘कितने आदमी थे’ या गब्बरनं ‘कालिया’ला विचारलेल्या अन् जबरदस्त गाजलेल्या प्रश्नाचे तब्बल 40 ‘रिटेक’ लागले...
? आज विदेशी तंत्रज्ञ हे बॉलीवुडमध्ये सर्रास दिसतात...पण त्यावेळी ‘शोले’ला परिपूर्ण बनविण्यासाठी विदेशी तंत्रज्ञांचा आधार घेण्यात आला होता...
? शेवट वगळता रमेश सिप्पीनी कोणतीही तडजोड करण्यास नकार दिला. शोलेचा मूळ शेवट वेगळा आणि हिंसक होता. तिथं गब्बरला ठाकूर ठेचून मारतो असं दाखविण्यात आलं होतं. पण सेन्सॉर बोर्डनं त्याला आक्षेप घेतला. जर गब्बर मारला गेल्याचं दाखवायचं असेल तर चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र मिळेल, असं बजावण्यात आलं. त्यामुळं सिप्पीनी चित्रपटाचा शेवट बदलण्यास सहमती दर्शविली, कारण त्यांना प्रदर्शनाला उशीर करायचा नव्हता...
‘बॉक्स ऑफिस’वर धूमशान...
? ‘शोले’ यशस्वी झाल्यानंतर मुंबईतील ‘मिनर्व्हा’ थिएटरपासून ताडदेव ब्रिजपर्यंत सिनेरसिकांच्या अॅडव्हान्स बूकिंगसाठी रांगा लागायच्या. त्यावेळी खरं तर बाल्कनीचं तिकीट 15 रुपयांना मिळायचं. पण ‘शोले’च्या बाबतीत त्याचे दर चक्क 200 रुपये असे गगनाला भिडले...
? 1975 ते 1980 अशी तब्बल पाच वर्षं ‘शोले’ मुंबईच्या ‘मिनर्व्हा’मध्ये ठाण मांडून बसला होता. हा सर्वाधिक काळ चालण्याचा विक्रम मोडला शाहरूख खानच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’नं...2.5 कोटी रुपये खर्चून बनविलेल्या ‘शोले’नं प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातीला कमाई केली होती ती 35 कोटींची. हा उच्चांक 19 वर्षांनी सलीमपुत्र सलमान खानच्या 1994 सालच्या ‘हम आपके हैं कौन’नं मागं टाकला...
‘शोले’वर प्रभाव टाकणारे चित्रपट...
? ‘गार्डन ऑफ एव्हिल’ (1954)...
? ‘सेव्हन समुराई’ (1954)...
? ‘दि मॅग्निफिसंट सेव्हन’ (1960)...
?‘दि डर्टी डझन’ (1967)...
? ‘वन्स अपॉन अ टाईम इन दि वेस्ट (1968)...
? ‘फाईव्ह मॅन आर्मी’ (1969)...
? ‘बूच कॅसिडी अँड दि सनडान्स किड’ (1969)
संकलन : राजू प्रभू