For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ड्रग्स तस्करीचे केंद्र ईशान्य भारत

06:01 AM Nov 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
ड्रग्स तस्करीचे केंद्र ईशान्य भारत
Advertisement

म्यानमारमध्ये सत्तापालट झाल्यावर भारतासमोर एक वेगळेच संकट उभे ठाकले आहे. म्यानमारमधील संकटामुळे ईशान्य भारत आता अमली पदार्थांच्या तस्करीचे केंद्र ठरत आहे. अमली पदार्थांचे तस्कर आता नवनवे मार्ग चोखाळत आहेत. म्यानमारमध्ये सुमारे तीन वर्षांपूर्वी झालेल्या सैन्य सत्तापालटानंतर सीमेपलिकडून ईशान्य भारतात अवैध मार्गाने पोहोचणाऱ्या शरणार्थींच्या मोठ्या संख्येमुळे येथे अमली पदार्थांच्या तस्करीत प्रचंड वृद्धी झाली आहे. विशेषकरून मागील वर्षी मणिपूरमध्ये सुरू झालेल्या हिंसेनंतर ही समस्या अधिकच जटिल झाली आहे. शासकीय आकडेवारीनुसार मागील वर्षी अमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली सुमारे 3 हजार लोकांना अटक करत 7,887 कोटीची किंमत असलेले अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

Advertisement

कित्येक दशके जुनी समस्या आता विक्राळ

अमली पदार्थांचे तस्कर आता तस्करीसाठी नवे मार्ग शोधत आहेत. मणिपूर पोलिसांनी अलिकडेच भोपळ्यात भरून आणले जाणारे साडेतीन कोटी रुपयांचे ब्राउन शुगर जप्त केले होते. याप्रकरणी एका टोळीच्या काही सदस्यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री विरेन सिंह यांनी काही छायाचित्रांसोबत यासंबंधी एक ट्विट केला होता. मणिपूर आणि मिझोरममध्ये अमली पदार्थांची मोठी खेप पकडली जात नाही असा एकही आठवडा राहिला नसावा. मिझोरम सरकारने देखील राज्यात अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीसाठी मणिपूर हिंसेला जबाबदार ठरविले आहे. मणिपूर सरकारने मागील 7 वर्षांदरम्यान सीमेपलिकडून येणारे सुमारे 8 हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. तर याप्रकरणी सुमारे 3 हजार लोकांना अटक करण्यात आली होती. राज्यात हिंसा सुरू झाल्यापासून अमली पदार्थांच्या तस्करीच्या घटना वाढल्या आहेत. राज्य सरकारने मागील वर्षी पर्वतीय भागांमध्ये 16 हजार एकरपेक्षा अधिक भागातील अफूचे पिक नष्ट केले होते. म्यानमारमधून अमली पदार्थांच्या तस्करीचे सत्र तर कित्येक दशके जुने असल्याचे राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले.

Advertisement

पर्वतीय भागांमध्ये अफूची अवैध शेती

मागील वर्षी सुरू झालेल्या हिंसेनंतर सुरक्षेची स्थिती काहीशी कमजोर झाल्याने सीमेपलिकडून होणारी तस्करी अनेक पटीने वाढली आहे. यादरम्यान मणिपूरसोबत शेजारी मिझोरम आणि आसाममध्ये देखील सीमेपलिकडून येणाऱ्या अमली पदार्थांच्या जप्तीत वाढ झाली आहे. 2022-23 दरम्यान पर्वतीय भागांमध्ये 4305 एकरमधील अफूचे पिक नष्ट करण्यात आले होते. 2006 नंतर राज्याच्या म्यानमारला लागून असलेल्या पर्वतीय भागांमध्ये किमान 996 नवी गावे वसविण्यात आली आहेत. यातून सीमेपलिकडून किती मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होतेय हे स्पष्ट होते. सीमेपलिकडून येणाऱ्या या घुसखोरांपैकी बहुतांश लोक अमली पदार्थांची तस्करी किंवा अफूच्या शेतीशी संबंधित असल्याचे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांचे सांगणे आहे.

म्यानमार अफूचा सर्वात मोठा उत्पादक

ईशान्येत सीमेपलिकडून होणारी अमली पदार्थांच्या तस्करीची समस्या कित्येक दशके जुनी आहे. परंतु मागील वर्षी मणिपूरमध्ये सुरू झालेली हिंसा आणि अफगाणिस्तानात अफूच्या शेतीवर तालिबानकडून घालण्यात आलेल्या बंदीमुळे म्यानमारमध्ये अफूची शेती वाढली आहे आणि यातील बहुतांश अफू मणिपूर आणि मिझोरमच्या मार्गे भारतातील अन्य शहरांमध्ये पाठविला जातो. युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राइमच्या (यूएनओडीसी) एका अहवालात अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यापासून तेथील अफूच्या उत्पादनात 95 टक्क्यांची घट झाल्याचे म्हटले गेले आहे. याचमुळे 2023 मध्ये म्यानमार जगातील सर्वात मोठा अफू उत्पादक देश ठरला आहे. म्यानमारमध्ये सत्तापालटानंतर आर्थिक अस्थिरतेमुळे बहुतांश शेतकरी अफूची शेती करू लागले. मणिपूरमध्ये सुरू झालेल्या हिंसेने हे पिक अधिक खपविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याकरता सीमपेलिकडून येणाऱ्या लोकांना माध्यम करण्यात आले. तर दुसरीकडे शेजारी राज्य मिझोरममध्ये सीमेपलिकडून येणाऱ्या शरणार्थींमुळे तेथे देखील मद्य आणि अमली पदार्थांचा अवैध व्यापार वेगाने वाढला आहे. राज्यात मद्यावर बंदी आहे.

शरणार्थींमुळे अवैध दारूची समस्या

सीमेपलिकडून येणारे शरणार्थी अवैध स्वरुपात गावठी दारू तयार करतात आणि ती विकतात. अलिकडेच मिझोरमची राजधानी आइजोलमध्ये एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यात सर्व संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत शक्तिशाली सामाजिक संघटना यंग मिझो असोसिएशनचे नेते देखील सामील झाले. या बैठकीत उत्पादन शुल्क आणि नार्कोटिक्स विभागाचे आयुक्त झेड. लामंगैयाह यांनी अलिकडच्या वर्षांमध्ये गावठी दारूची विक्री वाढल्याची माहिती दिली. सीमेपलिकडून शरणार्थी येण्याचे प्रमाण वाढल्याने राजधानी आइजोल आणि आसपासच्या भागांमध्ये अवैध मद्यनिर्मितीचे काम तीव्र झाले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

मणिपूर हिंसा ठरले कारण

मार्च महिन्यात विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल मिझोरम सरकारने शेजारील मणिपूरमध्ये झालेल्या हिंसेमुळे राज्यात अमली पदार्थांची तस्करी वाढल्याचे सांगितले होते. अन्य देशांमधून मिझोरममार्गे मणिपूर आणि त्रिपुरामध्ये अमली पदार्थांची तस्करी केली जात आहे. या समस्येवर अंकुश लावण्यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था, चर्च आणि जनतेच्या सामूहिक भागिदारीची गरज असल्याचे मंत्र्याने नमूद केले होते. चालू वर्षात मिझोरम उत्पादन शुल्क आणि नार्कोटिक्स विभागाने 15 किलोग्रॅम हेरोइन, 96.5 किलोग्रॅम मेथमफेटामाइन टॅबलेट आणि 238.6 किलोग्रॅम गांजासमवेत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यांच्या तस्करीच्या आरोपाप्रकरणी एकूण 1211 जणांना अटक करण्यात आली आहे. चालू वर्षात आतापर्यंत अमली पदार्थांच्या सेवनामुळे एका महिलेसमवेत 10 जणांचा मिझोरममध्ये मृत्यू झाला आहे. राज्य गृह विभागाच्या आकडेवारीनुसार सीमपेलिकडून आलेले 34 हजारांहून अधिक शरणार्थी सध्या विविध भागांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या शिबिरांमध्ये राहत आहेत.मिझोरममध्ये पोहोचलेल्या या शरणार्थींमध्ये 13 हजारांहून अधिक मुलांचा समावेश आहे.

म्यानमारला लागून असलेली सीमा खुली

आसाम पोलिसांनी चालू आठवड्यात सुमारे 10 किलो हेरॉइन जप्त केले असून ते मिझोरमच्या चंफाई जिल्ह्यातून देशाच्या दुसऱ्या हिस्स्यांमध्ये नेण्यात येत होते. कछारचे पोलीस अधीक्षक नूमल महट्टा यांच्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरोइनची किंमत 105 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हे हेरोइन म्यानमारला लागून असलेल्या मिझोरमच्या चंफाई येथून आणले गेले होते, असा आमचा अनुमान असल्याचे महट्टा यांनी सांगितले आहे. म्यानमारला लागून असलेली 1643 किलोमीटर लांबीची सीमा बहुतांश ठिकाणी खुली आहे. नदी, जंगल आणि पर्वताने वेढलेल्या या भागात सर्वत्र देखरेख ठेवणे देखील शक्य नाही. तस्कर याच स्थितीचा लाभ घेतात आणि सीमेपलिकडून येणाऱ्या शरणार्थींचा याकरता वापर केला जात आहे. हे शरणार्थी सहज उत्पन्नाच्या त्यांच्या आमिषाला बळी पडतात. आता बहुधा सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यात आल्यावर ही समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते. परंतु याकरता अद्याप किमान 5 वर्षांचा कालावधी लागणार आहे. मणिपूरमधील समस्येवर तोडगा निघत नाही तोवर ईशान्येतील अमली पदार्थांच्या तस्करीवर अंकुश लावणे शक्य नसल्याचे विश्लेषकांचे मानणे आहे. म्यानमारला लागून असलेल्या मिझोरममध्ये पर्वतीय भागांमध्ये कुकी समुदायाच्या लोकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. तेथील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कमकुवत आहे. सीमेपलिकडून येणारे लोक किंवा तस्कर तेथेच आश्रय घेत असतात.

गोल्डन ट्राएंगल

2018 मध्ये मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून स्वत:च्या पहिल्या कार्यकाळात विरेन सिंह यांनी अमली पदार्थांच्या विरोधात युद्धाची घोषणा केली होती. म्यानमारला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेनजीकच्या भागांमध्ये हजारो हेक्टर जमिनीचा वापर अफूच्या शेतीसाठी केला जातो. खराब आर्थिक स्थिती, रोजगाराचा अभाव आणि अमली पदार्थांच्या सहज उपलब्धतेमुळे राज्यात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या लोकांची संख्या वाढली असल्याचे त्यांचे सांगणे हेते. मणिपूर हे राज्य कुख्यात ‘गोल्डन ट्राएंगल’नजीक आहे. गोल्डन ट्राएंगल दक्षिणपूर्व आशियातील एक क्षेत्र असून ते गृहयुद्धग्रस्त म्यानमारला व्यापणारे आहे. या क्षेत्राला ‘जगातील सर्वात मोठा अमली पदार्थांच्या तस्करीचा कॉरिडॉर’ म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रातून हेरोइन, अफू आणि मेथमफेटामाइन यासारखे अमली पदार्थ पूर्ण आशिया-प्रशांत क्षेत्रात पोहोचविले जात असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचेच सांगणे आहे.

उमाकांत कुलकर्णी

Advertisement
Tags :

.