Sangli News : सांगलीत शोकसागर ; दिल्लीतील छळामुळे विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनवरून उडी मारून दहावीच्या विद्यार्थ्याचा अंत
सांगली : दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेतील प्राचार्या आणि शिक्षिकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या ढवळेश्वर गावातील दहावीतील विद्यार्थी शौर्य पाटील याने आत्महत्या केली आहे. शौर्यने दीड पानांच्या सुसाइड नोटमध्ये “स्कूलवालों ने इतना बोला कि मुझे यह करना पड़ा…” असे लिहित आपले आयुष्य संपवले. या प्रकरणी चार शिक्षिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीच्या राजीव नगर भागात वास्तव्यास असलेला, मूळचा सांगली जिल्ह्यातील ढवळेश्वर गावचा शौर्य प्रदीप पाटील… फक्त १५ वर्षांचा, दहावीचा विद्यार्थी. मंगळवारी दुपारी राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून खाली उडी मारून त्याने आत्महत्या केली.
घटनास्थळी तपास करताना पोलिसांना शौर्यच्या बॅगेत मिळाली दीड पानांची सुसाइड नोट - “स्कूलवालों ने इतना बोला कि मुझे यह करना पड़ा…”“आय अॅम व्हेरी सॉरी…”“मेरे पॅरेंटसने बहुत कुछ किया… सॉरी मम्मी… सॉरी भैय्या…”“यदि किसी को जरूरत हो तो मेरे अंग दान कर देना…”
या नोटच्या आधारावर दिल्ली पोलिसांनी प्राचार्या अपराजिता पाल आणि शिक्षिका मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस यांच्यावर विद्यार्थ्याला मानसिक छळ केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
शौर्यचे वडील प्रदीप पाटील हे अनेक वर्षांपासून दिल्लीत सोन्या-चांदीच्या गलाई व्यवसायात कार्यरत आहेत. कुटुंबीयांसह शौर्य राजीव नगरमध्येच वास्तव्यास होता आणि सेंट कोलंबस विद्यालयात शिक्षण घेत होता.
शौर्यचा मृतदेह बुधवारी शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गुरुवारी सकाळी त्याचे पार्थिव सांगली जिल्ह्यातील ढवळेश्वर येथे आणण्यात आले, जिथे शोकमय वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दहावीच्या विद्यार्थ्याला शाळेत झालेल्या मानसिक छळाची इतकी मोठी किंमत चुकवावी लागली… या प्रकरणी योग्य न्याय मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.