महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

धक्कादायक हत्या!

06:11 AM Oct 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्याचे माजी मंत्री, काँग्रेसचे माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष, तीन वेळा निवडून आलेले आमदार आणि सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे नेते असलेल्या आणि मुंबईतील विविध व्यवसायांबरोबरच बॉलीवूडमध्ये वरचष्मा असलेल्या बाबा सिद्दिकी यांचा दसऱ्याच्या रात्री त्यांच्या वांद्रे येथील कार्यालय समोर तीन परप्रांतीय हल्लेखोरांकडून गोळीबार करून खून करण्यात आला आहे. केंद्राची दर्जाची सुरक्षा असताना आणि जीवाला धोका आहे माहीत असताना हा खून झाला आहे. हे मुंबई पोलीस आणि सरकारला नामुष्की आणणारे आहे. 1995 च्या सुमारास भाजपचे आमदार प्रेमकुमार शर्मा, शिवसेनेचे विठ्ठल चव्हाण, नगरसेवक खेमबहादुर थापा, जामसंडेकर आणि अलीकडेच शिवसेनेचे नगरसेवक अभिजीत घोसाळकर यांच्या झालेल्या हत्या या राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणाऱ्या होत्या. अनेक घटना लोकांच्या स्मरणातून गेल्या असल्या तरी गुन्हेगारी क्षेत्रात त्याची चर्चा कायम असते. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत अशी घटना घडली की त्याचे खूप दूरगामी परिणाम होतात. एक तर अंडरवर्ल्ड येथे धनिकांना, उद्योगपतींना, फिल्मस्टार्सना आणि या सगळ्यांच्या मागे लपून पैशाची हेराफेरी करणाऱ्या मंडळींना टार्गेट करत असते. त्यांच्याकडून आता वसुली वाढेल.  छोट्या-मोठ्या गुन्हेगारांना 25, 50 हजारात गोळ्या घालायला लावायच्या आणि आपली दहशत निर्माण करायची हा इथल्या अंडरवर्ल्डचा मोठा व्यवसाय आहे. पन्नास हजार, लाखासाठी असे मरायला आणि मारायला पावला पावलावर मिळतात. याच लोकांच्या जीवावर अंडरवर्ल्ड टिकले आहे. त्यांचा मध्यस्थ बनून पैसेवाले, बिल्डर,  अभिनेत्यांना जिवंत ठेवून संपत्ती वाढवायला मदत करणारे सुद्धा येथे असल्याने हा व्यवहार सुखेनैव सुरू राहतो. पोलिसांना सुद्धा अशा प्रकारचे व्यवहार लाभदायक आणि शांतता प्रस्थापित करणारे असल्याने हवेच असतात. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना सेलिब्रिटींच्या घोळक्यात रमायला आवडते. त्यामुळे सगळेच अशा व्यवहारांना मान्य करून शांतता असल्याच्या खोट्या नंदनवनात वावरत राहतात. सिद्दिकी यांच्या खुनानंतर ही शांतता भंग पावली आहे. वास्तविक अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेला गोळीबार आणि त्या गोळीबारातील आरोपीचे कोठडीत झालेले निधन लक्षात घेतले तर नेमके त्याच काळात बाबा सिद्दिकी यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सरकारला कळवले होते. अर्थात आयुष्यभर सरकारच्या वर्तुळात राहिलेले आणि 2014 नंतर पुन्हा अलीकडेच अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करून पुन्हा स्वत:भोवती सरकारी वलय घेऊन फिरणारे बाबा सिद्दिकी यांचा खून होईल असे कदाचित पोलिसांनाही वाटले नसावे. मात्र दसऱ्याच्या फटाक्याच्या आवाजात वाय दर्जाच्या बंदोबस्ताला आणि खुद्द सिद्दिकी यांच्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेला भेदत हत्या झाली. हे इतके सहज सोपे नाही. वैशिष्ट्या म्हणजे बिश्नोई गॅंगने या हत्येची जबाबदारी सुद्धा स्वीकारली! पोलिसांनी तत्परता दाखवत दोन आरोपींना अटक केली असून तिसरा परागंदा झाला आहे. तिघातील दोघे उत्तर प्रदेशी तर एक हरियाणाचा आहे. महिन्याला पन्नास हजाराच्या बोलीवर गेले 40 दिवस ते मुंबईतील कुर्ला भागात राहत होते. त्यातील एक तर भंगारच्या दुकानात कामाला होता आणि त्यानेच काम देतो म्हणून दुसऱ्याला बोलावून घेतले होते. हे लक्षात घेतले तर सिद्दिकी यांचा खून हा मोठा कट आहे आणि तो पूर्वनियोजित सुपारी आहे. मुख्यमंत्र्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला पुष्टी दिली. शिवाय पहिले काम केले ते सगळ्या मंत्र्यांचे आणि मलबार हीलचे संरक्षण वाढवले! यापूर्वी त्यांना दाऊदने विरोधात ‘एक था एमएलए सिनेमा’ काढायची धमकी दिली होती! बिश्नोई टोळीच्या संदेशात सलमानचा उल्लेख आहे ही सगळी जाहीर झालेली माहिती म्हणजे मुंबईतील पैसेवाल्यांना भीती घालण्याचा नवा उद्योग आहे. आम्ही सत्तेतला माजी मंत्री वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था असताना मारू शकतो तर तुम्ही कुठे पळून जाल? कुणाला शरण जाल? हा या हत्येमागील खरा संदेश आहे. अंडरवर्ल्डचे डोके पुन्हा एकदा वर निघाले आहे असे म्हणावे तर ते जमिनीत तोंड घालून कधी बसले होते? असा प्रश्न निर्माण होतो. सरकारमध्ये तीन-तीन घटक सत्तेत असताना, राज्याची, केंद्राची गुप्तचर यंत्रणा असताना ज्या माजी मंत्र्यांनी आपल्या जीवाला धोका आहे असे पंधरा दिवस आधी सांगितले होते, त्याला जी कुचकामी सुरक्षा व्यवस्था दिली गेली. आता लोकांनी त्या व्यवस्थेवर विश्वास ठेवावा का? हा प्रश्नच आहे. मुळात गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने या वाय दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेचे अगदीच फोलपाट करून टाकले आहे. जरा कोणाची तक्रार आली की त्याला वाय दर्जाची सुरक्षा दिली जाऊ लागल्याने सिद्दिकी यांच्यासारख्या जीव धोक्यात असणाऱ्या व्यक्तीचा हकनाक बळी गेला असे म्हणावे लागेल. वरवर पाहता सिद्दिकी यांचा सर्वच राजकीय पक्षात चांगला वावर होता. अजातशत्रू व्यक्तिमत्व होते. मात्र त्यांच्या हत्येने या क्षेत्रातील अनेकांच्या उरात धडकी भरली असावी. या हत्येच्या कहाण्या दुर्दैवाने भविष्यकाळात चवीने चघळल्या जातील. अलीकडे तर गुन्हेगार आणि गुन्हेगारीवृत्तीचे पोलीस अधिकारी यांच्या हिरोगिरीसाठी अनेक युट्युबर असल्या कथा लोकांना ऐकवून अशा मंडळींबाबत आदरभाव निर्माण करतात! त्यातून ते मोठी कमाई करू लागले आहेत. त्यांच्यासाठी आता ही हत्या भविष्यात बरेच दिवसांची बेगमी ठरेल. राज्याच्या कायदा सुव्यवस्थेबाबत विरोधी पक्षाच्या सर्वच नेत्यांनी विचारला आहे तसा आता जनतेने जाब विचारावा की प्रकाश आंबेडकर यांनी दाखवलेल्या नव्या डायमेन्शन प्रमाणे ही हत्या बिल्डरमुळे की राजकीय कारणातून सुपारी देऊन झाली? हा विषय चघळत रहावा?    सरकार आणि पोलिसांवर ओढवलेल्या या नामुष्कीनंतर आरोपी पकडून त्यांना शिक्षा लागण्यापासून यामागील सूत्रधार शोधण्यापर्यंतचे काम ही यंत्रणा करेल का, हा प्रश्नच आहे. सत्य सात पडद्याच्या आड दडवून भलतेच कथानक जनतेच्या तोंडावर मारण्याचे काम अशा प्रकारात होत असते. मात्र किमान नामुष्की टाळण्यासाठी यातील जास्तीत जास्त सत्यापर्यंत पोलीस जेव्हा लोकांना घेऊन जातील तेव्हाच अशा घटनांना आळा बसेल. निवडणुकीच्या तोंडावर सरकारला हे एक भलतेच प्रकरण भोवले आहे आणि त्यात सिद्दीकी यांचा जीव गेला हे अधिक भयानक आहे.

Advertisement

 

Advertisement

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article