डंका...‘मेड इन इंडिया’ शस्त्रांचा !
भारतानं केलेल्या युद्धाच्या वा संघर्षाच्या वेळी एकेकाळी नावं गाजायची ती विदेशातून खास करून तत्कालीन सोविएत युनियननं नि नंतर रशियानं पुरविलेल्या शस्त्रांची. त्यानंतर त्यांची जागा हळूहळू घेतलीय ती अमेरिकेसह अन्य राष्ट्रांनी पुरविलेल्या हत्यांरांनी...हे अवलंबन अजूनही बऱ्याच अंशी कायम असलं, तरी नुकत्याच झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी दिसलेला एक मोठा फरक म्हणजे स्वदेशी शस्त्रांनी पाकिस्तानला दिलेला जबर तडाखा, शत्रूचं कंबरडं मोडण्यात बजावलेली प्रमुख भूमिका. त्याची दखल सारं जग घेतल्याशिवाय राहू शकलेलं नाही..अशाच भेदक ‘मेड इन इंडिया’ शस्त्रांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप...
‘ऑपरेशन सिंदूर’ संपलंय...भारतानं पहलगाममधील पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा जबरदस्त बदला घेतलाय, अतिरेक्यांचे किल्ले व सैन्याचे तळ जमीनदोस्त केलेत...नवी दिल्लीनं इस्लामाबादला अक्षरश: चारही मुंड्या चीत केलंय...भारतानं पाकिस्तानच्या गर्वाचा खात्मा केलाय...परंतु या मोहिमेनं जगाला आश्चर्याचा धक्का दिला तो अन्य एका बाबीमुळं. आपण निर्मिती केलेल्या शस्त्रांच्या कामगिरीनं संपूर्ण विश्वाचे डोळे विस्फारल्याशिवाय राहिले नाहीत...
‘ब्राह्मोस’ या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रानं आणि अन्य भारतनिर्मित शस्त्रांनी पाकिस्तानचे अक्षरश: तीन तेरा वाजविले. भूदलानं सुद्धा ‘आकाश एअर डिफेन्स’ क्षेपणास्त्रं अन् ‘डी4 अँटी-ड्रोन सिस्टम’च्या साहाय्यानं पारंपरिक शत्रूनं केलेला ‘ड्रोन्स’चा वर्षाव देशाची सीमा ओलांडण्याची संधी न देता निष्फळ ठरविला. त्यामुळं अगदीच थोडे ‘ड्रोन्स’ आत घुसू शकले...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मे या दिवशी म्हटलं, ‘या ऑपरेशनच्या वेळी ‘मेड इन इंडिया’ शस्त्रांनी त्यांची क्षमता सिद्ध केलीय. 21 व्या शतकातील युद्धासाठी ‘मेड इन इंडिया’ संरक्षण उपकरणं अगदी सज्ज आहेत व विश्वानं त्यांची दखल घेतलीय’...
मोदी प्रशासनानं गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्यानं भारतानं निर्मिती केलेल्या शस्त्रांचीच संरक्षण दलांसाठी खरेदी केलीय आणि त्यांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिलंय. विशेष म्हणजे आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये नवी दिल्लीनं निर्यात केलीय ती तब्बल 23 हजार 622 कोटी रुपयांच्या शस्त्रांची आणि हा आकडा त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षातील कामगिरीपेक्षा 12 टक्क्यांनी जास्त...
अफलातून ‘ब्राह्मोस’...
? नाव देण्यात आलंय ते ‘ब्रह्मपुत्रा’ व रशियाची ‘मॉस्कव्हा’ यांना एकत्र करून...‘ब्राह्मोस’ची गती ‘मॅक 2.8’ वा ध्वनीहून तीन पटींनी जास्त. या क्षेपणास्त्राला जगातील एक अतिशय वेगवान ‘सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल’ म्हणून ओळखलं जातंय...
? 2019 वर्ष उजाडलं आणि ‘ब्राह्मोस’चा पल्ला 450 किलोमीटर्सपर्यंत वाढविण्यात आला. ते ‘सुखाई-30’वर बसविण्यात आलंय नि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा असा वापर करणारा भारत विश्वातील एकमेव देश...
? ‘ब्राह्मोस’चा मारा करणं शक्य आहे ते पाणबुड्या, जहाजं, विमानांतून वा जमिनीवरून...विशेष म्हणजे भारतानं यशस्वीरीत्या विविध गटांतील ‘ब्राह्मााsस’च्या चाचण्या पूर्ण केल्याहेत. हे क्षेपणास्त्र संयुक्तरीत्या बनविलंय ते ‘ब्राह्मोस एअरोस्पेस प्रा. लि.’, दिल्लीनं. भारतानं 2022 मध्ये ‘ब्राह्मोस’ची फिलिपाईन्सला विक्री केली ती 37.5 कोटी डॉलर्सना...
? सध्या प्रयत्न चाललेत ते या क्षेपणास्त्राची ‘हायपरसॉनिक’ आवृत्ती तयार करण्याचे. त्याला ‘ब्राह्मोस-2’ असं नाव देण्यात येईल. ते आधारलंय ‘हायपरसॉनिक स्क्रॅमजेट’ तंत्रावर. शत्रूच्या प्रदेशांत खोलवर मुसंडी मारणं हा त्यामागचा मुख्य उद्देश. भारताची तिन्ही दलं त्याचा वापर करतील...
? हल्लीच लखनौ इथं ‘ब्राह्मोस’च्या नवीन चाचणी सुविधेचं उद्घाटन करण्यात आलंय. त्यावेळी ‘डीआरडीओ’चे माजी प्रमुख जी. सतीश रेड्डी म्हणाले की, सध्या उद्दिष्ट आहे ते वर्षाला 100 ते 150 क्षेपणास्त्रांचं तिथं उत्पादन करण्याचं. खेरीज हैदराबाद व थिरुवनंतपूरम इथंही ‘ब्राह्मोस’ची निर्मिती करण्यात येतेय...
‘डेडली आकाश’...
? ‘डीआरडीओ’नं विकसित केलेलं ‘आकाश बनविलंय ते भारत डायनेमिक्स लिमिटेडनं. ‘आकाश’ हे जमिनीवरून आकाशात मारा करणारं क्षेपणास्त्र असून त्याचा पल्ला 25 किलोमीटर्स. ते भारताच्या ‘एअर डिफेन्स सिस्टम’चा गाभा म्हटल्यास चुकीचं ठरणार नाहीये. या क्षेपणास्त्रानं पाकला पुरतं नामोहरम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली...
? 25 किलोमीटर्स अंतरावरील चार ‘टार्गेट्स’ना एकाच वेळी नष्ट करणारं जगातील पहिलं क्षेपणास्त्र. ‘आकाश’च्या नव्या आवृत्तीचं नाव ‘आकाश एनजी’ असून त्याचा पल्ला असेल 70 ते 80 किलोमीटर्स...
? या क्षेपणास्त्रात क्षमता आहे ती ‘इलेक्ट्रॉनिक काउंटर-काउंटरमेजर’ची. ‘आकाश सिस्टम’ मोबाईल प्लॅटफॉर्म्ससाठी तयार केलेली असून तिची लवचिकता लाजवाब. त्यामुळं शत्रूवर मारा करण्यासाठी ‘आकाश’ला कुठल्याही प्रदेशात नेणं कठीण नाहीये...
? विश्लेषकांना ‘आकाश’ अतिशय आवडलंय आणि ते त्याची तुलना करतात इस्रायलचं प्रसिद्ध ‘आयर्न डोम क्षेपणास्त्र प्रणाली’शी. परंतु दोन्ही क्षेपणास्त्रांतलं सर्वांत मोठं अंतर म्हणजे ‘आयर्न डोम’ कमी पल्ल्याचं रॉकेट व तोफांनी मारा केलेले गोळे यांच्यापासून रक्षण करतं, तर ‘आकाश’मध्ये क्षमता आहे ती क्षेपणास्त्रांना, ड्रोन्सना आणि विमानांना देखील उद्धवस्त करण्याची...
? भारतानं 2022 मध्ये आर्मेनियाला 15 युनिट्सची निर्यात केली आणि ब्राझील अन् इजिप्त यांना देखील ‘आकाश’ हवंय...त्याची गती ध्वनीहून 2.5 ते 3.5 पटीनं अधिक. हवाई दल व भूदलानं ‘आकाश’चा समावेश केलाय. एका ‘आकाश’ची शत्रूला उद्धवस्त करण्याची क्षमता 88 टक्के, तर दोन ‘आकाश’ची 99 टक्के...
? ‘आकाश-1’ व ‘आकाश-2 सिस्टम’च्या 15 स्क्वॉड्सचा भारतीय हवाई दलानं समावेश केलाय तो 10 हजार 900 कोटी रुपयांच्या साहाय्यानं, तर लष्कराच्या भात्यात 22 हजार 340 कोटी रुपयांच्या चार रेजिमेंट्स...
‘ड्रोन्स’ची कर्दनकाळ...‘डी4’...
? पाकिस्तानच्या ‘ड्रोन्स’चा अक्षरश: सफाया केलाय तो ‘डी4 अँटी-ड्रोन सिस्टम’नं. ते विकसित केलंय ‘डीआरडीओ’नं. त्याच्यात क्षमता आहे ती साध्या ‘ड्रोन्स’ना तसंच ‘इलेक्ट्रॉनिक जॅमिंग’ व ‘स्पूफिंग’ तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं ‘अनमॅन्ड कॉम्बॅट एरियल व्हेईकल्स’ना (यूसीएव्ही) निकामी करण्याची...
? ‘डी4’ म्हणजे ‘ड्रोन-डिटेक्ट-डिटर-डिस्ट्रॉय’...त्याच्यात शत्रूच्या ‘ड्रोन्स’ना नष्ट करणारी लेसर क्षमता असून पाकिस्तानविरुद्ध भारतानं या खासियतीचा उपयोग केलाय की नाही हे स्पष्ट झालेलं नाहीये. ही प्रणाली ‘रडार्स’, ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी सेन्सर्स’ व ‘इलेक्ट्रॉ ऑप्टिकल’ नि ‘इफ्रारेड कॅमेऱ्यां’च्या साहाय्यानं शत्रूच्या आत घुसणाऱ्या ‘ड्रोन्स’ना हुडकून काढते...
? ‘डीआरडीओ’च्या विविध प्रयोगशाळांनी ‘डी4’ बनविलंय. ‘इन्स्ट्रुमेंट रिसर्च अँड डेव्हलमेंट एस्टेब्लिशमेंट’, डेहराहून यांचाही ते विकसित करण्यास हातभार लागलाय...
भारत-इस्रायलनं केलीय शिकार...
? अतिशय यशस्वी ठरलेलं ‘बराक-8’ क्षेपणास्त्र आणि ‘स्कायस्ट्रायकर’ ड्रोन्स यांना संयुक्तरीत्या विकसित केलंय ते भारत व इस्रायलनं. त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी फार मोलाची कामगिरी बजावलीय...
? ‘बराक-8’ हे मध्यम पल्ल्याचं जमिनीवरून आकाशात मारा करणारं क्षेपणास्त्र असून ते ‘डीआरडीओ’ व इस्रायलची ‘एअरोस्पेस इंडस्ट्रिज’ यांनी मिळून विकसित केलंय आणि एप्रिल महिन्यातच चाचणी घेण्यात आली होती...
? ‘बराक-8’ मोबाईल लॉचर्सच्या साहाय्यानं जमिनीवरून वा एखाद्या जहाजावरून सोडता येतं. त्याच्यात क्षमता आहे ती शत्रूच्या 70 किलोमीटर्स अंतरावरील लक्ष्याला भेदण्याची...
? ते विकसित करण्यासाठी खर्च आलाय तो सुमारे 30 हजार कोटी रुपये. भारताच्या तिन्ही दलांनी त्याचा मोठ्या प्रमाणात समावेश केलाय. भारतात ‘बराक-8’ ‘बीडीएल कल्याणी राफेल अॅडव्हान्स सिस्टम्स’ आणि ‘टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स’ यांनी बनविलंय...
? ‘स्कायस्ट्रायकर’ हे आकाशात घिरट्या घालणारं ‘ड्रोन’ असून त्याची निर्मिती केलीय ती इस्रायलची ‘एल्बिट सिस्टम्स’ व भारताच्या ‘अदानी ग्रुप अल्फा डिझाईन टेक्नोलॉजिस’नं...ते ड्रोन असलं, तरी अचूक मारा करणारं शस्त्र म्हणून त्याचा वापर करणं शक्य आहे...
? ते लक्ष्याच्या परिसरात फिरत राहतं आणि स्वत:च्याच निर्णयानं हल्ला करतं वा त्याच्यावर देखरेख करणारी व्यक्ती हल्ला घडवून आणू शकते...
अन्य देशांवरचं अवलंबन...
भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी ‘मेड इन इंडिया’ शस्त्रांचं यशस्वीरीत्या दर्शन घडविलेलं असलं, तरी अजूनही नवी दिल्लीला अतिशय आधुनिक शस्त्रांसाठी अवलंबून राहावं लागतंय ते अन्य राष्ट्रांवर...सध्या शस्त्रांची आयात करणाऱ्या देशांमध्ये युक्रेनपाठोपाठ भारत दुसऱ्या क्रमांकावर असून 2020 ते 2024 दरम्यानच्या कालावधीत जागतिक आयातीत आपला वाटा 8.3 टक्के इतका राहिलाय...अजूनही रशिया नवी दिल्लीला 36 टक्के शस्त्रांची निर्यात करतेय. 2010 ते 2014 या कालावधीत ती तब्बल 72 टक्के इतकी होती, तर 2015 ते 2019 दरम्यान 55 टक्के...परंतु हल्ली फ्रान्स, इस्रायल नि अमेरिका यानी मुसंडी मारल्यानं रशियाचं भारतावरील वर्चस्व कमी झालंय...
संकलन : राजू प्रभू