Kolhapur Crime : गडहिंग्लजमध्ये धक्कादायक घटना; मुलीकडून वृद्ध वडिलांची मारहाण
गडहिंग्लजात कौटुंबिक वादाला हिंसक वळण
गडहिंग्लज : वडिलोपार्जित जमीन वाटणीच्या कारणातून चक्क स्वतःच्या बापाच्या अंगावार दुचाकी घालत लाथाबुक्क्याने मारहाण केली. उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटाचा जोरात चावा घेत तोडूनच टाकले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी शुभांगी सुनिल निकम (वय ४३ रा. बेळगुंदी) यांच्यावर गडहिंग्लज पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
ही घटना शनिवारी सायंकाळी गिजवणे ते गडहिंग्लज रोडवरील पेट्रोलपंपाजवळ गिजवणे गावच्या हद्दीत घडली. गणपतराव विष्णू हाळवणकर (वय ७८ रा. गिजवणे) त्यांची मुलगी शुभांगी निकम हिने वडिलोपार्जीत जमिनीच्या कारणावरून विचारणा करत तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. तसेच बापाच्या अंगावर मोटारसायकल घालून खाली पाडले आणि त्यांच्या छातीवर लाथा मारून शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.
यावेळी बापाच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटाचा जोरात चावा घेऊन पुढील नखापर्यंतचा भाग तोडून टाकत गंभीर जखमी केले आहे. त्यांच्यावर कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटल येथे उपचार करण्यात येत आहेत. गणपतराव हावळणकर यांचा मुलगा उदय हाळवणकर (वय ३६ रा. गडहिंग्लज) यांनी गडहिंग्लज पोलिसात आपली बहीण शुभांगी निकम हिच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. याचा तपास हवालदार डी. एन. पाटील हे करत आहेत.