For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवतीर्थ : शिवरायांच्या पराक्रमाची गाथा प्रेरणादायी ठरेल

12:47 PM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
शिवतीर्थ   शिवरायांच्या पराक्रमाची गाथा प्रेरणादायी ठरेल
Advertisement

डॉ. किरण ठाकुर यांचे प्रतिपादन : मिलिटरी महादेव परिसरात उभारण्यात आलेल्या शिवतीर्थचे उद्घाटन : मान्यवरांची उपस्थिती

Advertisement

बेळगाव : लोकमान्य सोसायटीच्या पुढाकाराने मराठा लाईट इन्फंट्रीच्या सहकार्याने मिलिटरी महादेव परिसरात उभारण्यात आलेल्या शिवतीर्थचे उद्घाटन मंगळवारी एका छोटेखानी समारंभात साधेपणाने करण्यात आले. या शिवतीर्थच्या नूतनीकरणाचे व सुशोभीकरणाचे काम लोकमान्य सोसायटीने हाती घेतले होते. या कामाची पूर्तता झाल्यानंतर मंगळवारी मराठा लाईट इन्फंट्रीचे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते व लोकमान्य सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या उपस्थितीत शिवतीर्थचे उद्घाटन करण्यात आले.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही निवडक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती शिवतीर्थमध्ये उभारण्यात आल्या आहेत. यामुळे शिवरायांच्या पराक्रमाची गाथा अधोरेखित होऊन अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. मराठा लाईट इन्फंट्री व लोकमान्य सोसायटीतर्फे हा सोहळा अत्यंत भव्य, शानदारपणे अनेक निमंत्रितांच्या उपस्थितीत करावयाचा होता. मात्र, देशावर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याने हा सोहळा साधेपणाने करण्यात आला.   प्रारंभी मराठा लाईट इन्फंट्रीचे पुरोहित सुभेदार मेजर श्रीकृष्ण पाठक यांनी वेदमंत्र म्हणून पौरोहित्य केले. त्यानंतर ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते शिवतीर्थच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. किरण ठाकुर यांच्या हस्ते भव्य भगवा ध्वज फडकविण्यात आला.

Advertisement

याप्रसंगी ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी म्हणाले, आजचा हा कार्यक्रम आमच्या हृदयाच्या जवळचा आहे. शिवतीर्थकडे काही काळ दुर्लक्ष झाले. परंतु लोकमान्य सोसायटीने याचे सुशोभीकरण व नूतनीकरण करण्याची जबाबदारी आनंदाने स्वीकारली. यासाठी डॉ. किरण ठाकुर यांचे सहकार्य व अजित गरगट्टी यांचे प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत. ज्या तरुणांनी हे शिवतीर्थ उभारण्यासाठी तहान-भूक विसरून अखंड परिश्रम केले त्यांचे खरोखर कौतुक आहे. लोकमान्यच्या या सहकार्याबद्दल आम्ही आजीवन डॉ. किरण ठाकुर व सोसायटीचे कृतज्ञ राहू, असे सांगतानाच आता शिवतीर्थचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी बेळगावकरांची आहे, असे ते म्हणाले. यावेळी डॉ. किरण ठाकुर म्हणाले, आम्ही शिवप्रभूंच्या हिंदवी राष्ट्रात जन्मलो, हे आमचे भाग्य आहे. छत्रपती शिवराय हे राष्ट्राचे दैवत आहे. अनेक गुणांचा समुच्चय त्यांच्यामध्ये होता. राष्ट्र कसे चालवावे, याचा वस्तुपाठच घालून देणाऱ्या छत्रपती शिवरायांसारखा राजा जगात नाही, याचा आम्हाला गर्व आहे.

बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्री असल्याचाही आम्हाला गर्व आहे. इन्फंट्रीच्या जवानांनी अनेक युद्धांमध्ये पराक्रम गाजवला आहे. आजही युद्धाच्या वेळी व मोहिमेच्या वेळी आपले जवान हर हर महादेव व जय शिवाजी अशाच घोषणा देतात. लोकमान्य सोसायटी नेहमीच सैनिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे. येथे संग्रहालय उभारण्यासाठी सोसायटीने देणगी दिली. मिलिटरी हॉस्पिटलला रुग्णवाहिका दिली, भोसला मिलिटरी स्कूललाही देणगी दिली असून सैनिकांच्या त्यागाची जाणीव सोसायटीने ठेवली आहे, असेही डॉ. किरण ठाकुर यांनी नमूद केले. डॉ. किरण ठाकुर यांच्या हस्ते डेप्युटी कमांडर कर्नल चंद्रनील रामनाथकर, कर्नल छत्रपती बुरुडे, लेफ्टनंट कर्नल जयभारत राव, लेफ्टनंट कर्नल अवी वेज, लेफ्टनंट कर्नल स्टॅलीन, लेफ्टनंट कर्नल अरुण अभय मॅथ्यू, लेफ्टनंट कर्नल रोहन श्रीकांत, लेफ्टनंट कर्नल विद्याधर सिन्हा, लेफ्टनंट कर्नल प्रदीप कुमार, मेजर संदीपकुमार, मेजर अल्ताफ सिन्हा, कॅप्टन अमरनाथ, लेफ्टनंट मोहम्मद इक्बाल खान, सुभेदार मेजर संदीप खुट या लष्करी अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते शिवतीर्थ येथे गड-किल्ले उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या शिवप्रेमींचा सत्कार झाला. संदीप सुणकंद, सुमित राघोजी, सोहम शिंत्रे, मंथन यळ्ळूरकर, प्रसाद भांदुर्गे, आकाश मुतगेकर, नंदू बर्डे, शुभम कोल्हे, नरेश पाटील, मनोज मुंगळे, विष्णू पिंगट, ओमकार सुतार, आकाश हुंदरे, सूरज चौगुले, सचिन मांगले, लक्ष्मण दळवी, किसन लाड, प्रतिक खाडे यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक पंढरी परब, गजानन धामणेकर, डॉ. दामोदर वागळे, सुबोध गावडे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे, दिनेश ओऊळकर, सुभाष ओऊळकर, उद्योजक अविनाश पोतदार, उद्योजक शिरीष गोगटे, अजित सिद्दण्णावर, नितीन कपिलेश्वरकर यासह शिवप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीआरओ राजू नाईक यांनी केले. दीपक गुरुंग यांनी ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांचा परिचय करून देऊन आभार मानले.

Advertisement
Tags :

.