जमीन हडप प्रकरणातील शिवशंकर मयेकरला अटक
तब्बल 1200 कोटींचे बळकावले भूखंड
पणजी : जमीन हडपप्रकरणातील मुख्य संशयितांपैकी शिवशंकर मयेकर याला अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पणजी विभागीय कार्यालयाने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक केली आहे. त्याला म्हापसा येथील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले असता 10 ऑक्टोबरपर्यंत नऊ दिवसांची ‘ईडी’ कोठडी ठोठावण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी यशवंत सावंत आणि इतरांविऊद्ध हणजुण कोमुनिदादच्या जमिनीसंदर्भात (सर्वे क्र. 496/1-अ) फसवणूक केल्याप्रकरणी नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे ‘ईडी’ने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या संशयितांनी संबंधित प्राधिकरणांत खोटे दस्तऐवज सादर करून ही जमीन आपल्या नावावर केली होती. त्यानंतर या जमिनीचा काही भाग विकून त्यातून मोठी रक्कम मिळवली होती.
’ईडी’च्या तपासानुसार, या संपूर्ण फसवणुकीमागे शिवशंकर मयेकर हा प्रमुख संशयित असल्याचे उघड झाले आहे. त्याने आपल्या मित्र तसेच नातेवाईकांच्या नावावर गोव्यातील अनेक भूखंड अवैधपणे बळकावले आहेत.नंतर या जमिनींचा काही भाग विकून आलेले पैसे मित्र-नातेवाईकांच्या खात्यात जमा केले आणि त्यानंतर ते सर्व पैसे अखेरीस शिवशंकर मयेकरने स्वत:च्या खात्यात वळवले. यापूर्वी 9 सप्टेंबर 2025 रोजी ‘ईडी’ने केलेल्या शोध मोहिमेत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या होत्या. मयेकर याने हणजुण, आसगाव (बार्देश तालुका) सारख्या प्रमुख पर्यटन स्थळांवर मित्र-नातेवाईकांच्या नावावर लाखो चौरस मीटर पसरलेले अनेक भूखंड अवैधपणे बळकावल्याचे उघड झाले आहे. बळकावलेल्या या जमिनींच्या भूखंडांचे बाजारपेठेतील एकूण मूल्य 1 हजार 200 कोटींहून अधिक असण्याची शक्यता ‘ईडी’ने व्यक्त केली आहे.